भारतीय तटरक्षक दलाची अक्षर, ही अदम्य श्रेणीच्या मालिकेतील दुसरी गस्ती नौका काल पुद्दुचेरीत कराईकल येथे तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी पद्धतीने तयार केलेली ही नौका 51 मीटर लांब आहे. 60%पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असलेली आयसीजीएस ‘अक्षर’, ही केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारताच्या वाढत्या सागरी क्षमतेचे प्रतीक आहे.
या जहाजाचे जलविस्थापन सुमारे 320 टन आहे. 3000 किलोवॉट डिझेल इंजिनाच्या मदतीने ती 27 नॉट्स इतक्या कमाल वेगाने प्रवास करू शकते. कमीतकमी वेगाने 1500 सागरी मैल कापण्याची या नौकेची क्षमता आहे. तिच्यावर स्वदेशी बनावटीचे दोन नियंत्रणक्षम पिच प्रोपेलर्स आणि गिअरबॉक्स बसवले आहेत, ज्यामुळे समुद्रात अतिशय उत्तम पद्धतीने विहार करण्याची क्षमता आणि कार्यक्षम लवचिकता असलेली ही नौका आहे. त्याबरोबरच ती 30 मिमी सीआरएन 91 गन आणि दोन 12.7 मिमी स्टॅबिलाइज्ड रिमोटनियंत्रित गन यासारख्या एकात्मिक शस्त्रप्रणालीने सुसज्ज आहे. नौकेच्या परिचालनात्मक कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी यात इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टीम, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम आणि ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट सिस्टीमसारख्या स्वयंचलित प्रणालींचा समावेश आहे. ‘आयसीजीएस अक्षर’ हे जहाज कराईकल, पुदुच्चेरी येथे तैनात असेल. संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव दीप्ती मोहिल चावला यांच्या हस्ते आयसीजीएस अक्षर तैनात करण्यात आली. अक्षर, या शब्दाचा अर्थ अविनाशी असा आहे.