महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने सारा देश हादरला. बारामती येथे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच कोसळले, काही क्षणातच मोठा स्फोट झाला, आगीचा मोठा लोळ उसळला आणि अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक, अटेंडंट यांचाही मृत्यू झाला. विमान अपघातात राजकीय नेत्याचा बळी घेणारी ही काही पहिलीच घटना नव्हे. संजय गांधी (१९८०), माधवराव शिंदे (२००१), वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९), विजय रूपाणी (२०२५) आदी नेत्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही देश हळहळला होता. विमान अपघातात मृत्यूंची मालिका आणखी किती काळ चालू राहणार आहे?
भारतीय राजकारणात विमान प्रवास ही काही चैनीची बाब राहिलेली नाही. कार्यक्रम, दौरे, सभा, निवडणूक प्रचार यासाठी देशभर सर्वच पक्षाचे प्रमुख व उच्चपदस्थ विशेषत: सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री विमानाने सतत प्रवास करीत असतात. जोपर्यंत काही अनुचित घडत नाही तोपर्यंत नेत्यांचे विमानप्रवास नित्यनेमाने चालू असतात. अचानक दुर्घटना घडली की गमावलेला नेता किंवा त्याच्याबरोबर प्रवास करणारे सहकारी परत येत नाहीत. अजितदादांच्या पार्थिवावार बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात लक्षावधींच्या साक्षीने अंत्यसंस्कार चालू असताना, परत या परत या, अजितदादा परत या, असा आक्रोश चोहोबाजूने प्रकट होत होता. लोकांच्या त्यांच्याविषयी भावना प्रेमाच्या व आदराच्या असल्या तरी ते खरंच परत येऊ शकणार आहेत काय? आपली विमानप्रवास व्यवस्था सदोष आहे की मानवी चुकांमुळे विमान अपघात होत आहेत? प्रत्येकवेळी ब्लॅकबॉक्सची तपासणी झाली की विमान अपघाताचे नेमके कारण समजेल असे सांगण्यात येते.
आजवर लहानमोठे असंख्य विमान अपघात झाले. त्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तिंचे बळी गेले. विमान अपघात झाल्यावर सर्व सारखेच असतात. प्रसिद्धी केवळ नेते, राजकारणी, सेलेब्रेटींना मिळते. इतर प्रवासी किंवा क्रू मेंबर्स तर दुर्लक्षित राहतात. अजितदादांच्या मृत्यूनंतर हाच अनुभव आला. फ्लाईट अटेंडंट २९ वर्षांची पिंकी माली ही मुंबईची. तिचाही विमान अपघातात मृत्यू झाला. तिच्यावर शिवाजीपार्क येथे अंत्यस्कार झाला. अजितदादांच्या अंत्यसंस्काराचे सर्वच वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशी व्हिव्हिआयपी नेत्यांची तेथे गर्दी होती. मात्र पिंकीच्या मृत्यूनंतर विमान कंपनीने किंवा सरकारकडून तिच्या कुटुंबियांशी कोणीही संपर्कही साधला नाही म्हणून तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात आणि अन्य राज्यात अनेक नेते आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी, राजधानीत पोहोचण्यासाठी विमानप्रवास करीत असतात. प्रवासी विमानतून जाण्याऐवजी नेत्यांना आता खाजगी छोटी विमाने अधिक पसंत असतात. आपल्या सोयीनुसार निघता येते. खाजगी विमानात मोजकेच सहकारी असतात व प्रायव्हसी मिळते. शिवाय प्रवासाच्या वेळेत बचत होते. एकाच दिवसात चार-पाच ठिकाणी जाता येते. निवडणुकीच्या काळात तर खाजगी छोट्या विमानांना, हेलिकॉप्टर्स, चार्टर्ड फ्लाइट्सना राजकीय नेत्यांकडून मोठी मागणी असते. विमानाची देखभाल, नियमित तांत्रिक तपासणी, सुरक्षितता, हवामान, वैमानिकांचा अनुभव, खाजगी कंपनीचे अगोदरचे रेकॉर्ड, नागरी विमान सेवा संचालनालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र, कंपनीची सेवा, असे अनेक मुद्दे महत्त्वाचे असतात. विमान अपघात कुठे ना कुठे होत असतात. पण त्यातून आपण काही बोध घेऊन सुधारणा करणार की नाही? मानवी चुकांमुळे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान अपघात होतात हे प्रमुख कारण नंतर ऐकायला मिळते. अनुभवी व उत्तम प्रशिक्षित वैमानिक असणे महत्त्वाचे आहे. सतत उड्डाणामुळे वैमानिकाला पुरेशी विश्रांती मिळाली आहे काय हेसुद्धा तेव्हढेच महत्त्वाचे आहे.

बारामतीत कोसळलेले विमान व्हीआरएस एव्हीएशन या खाजगी कंपनीचे होते. गेली सोळा वर्षं ते सेवेत होते. या लिएरजेट विमानाला २०२३मध्ये मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार पाऊस व कमी व्हिजिब्लिटी असताना धावपट्टीवर उतरताना विमान घसरले होते. पण त्यावेळी विमानातील आठही प्रवाशांचे जीव वाचले होते. लोकसभेचे माजी अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांचा ३ मार्च २००२ रोजी आंध्र प्रदेशात हेलिकॉपटर कोसळून मृत्यू झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचे एनडीए सरकार असताना ते लोकसभा अध्यक्ष होते. तेलगु देसमचे बॉस एन. चंद्राबाबू नायडू यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात असत. ३१ मार्च २००५ रोजी उद्योगपती व राजकारणी ओ. पी. जिंदाल यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्याच विमानात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंग होते. त्यांचाही मृत्यू झाला. जिंदाल काँग्रेस सरकारमध्ये उर्जामंत्री तर सुरेंद्र सिंग कृषीमंत्री होते. चंदिगडहून दिल्लीला परतताना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अपघात झाला.
अरूणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खंडू यांचा ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. इटानगरहून तवांगला जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. मोठ्या शोधमोहिमेनंतर पाच दिवसांनी त्याचे अवशेष पाच हजार मीटर उंचीवर बर्फाच्छादीत पर्वतावर सापडले. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा २ सप्टेंबर २००९ रोजी हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला. चित्तूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी ते निघाले होते. लष्कराच्या मदतीने हेलिकॉप्टरचे अवशेष दाट जंगलात सापडले. काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे यांचा ३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात मृत्यू झाला. ते कानपूरला सभेसाठी जात होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा २३ जून १९८० रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळावर मृत्यू झाला. ते स्वत:च खाजगी विमान चालवत होते. त्यांच्यासोबत सुभाष सक्सेना सहवैमानिक होते. विमान कोसळून झालेल्या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावर विमान कोसळून झालेल्या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी होते. त्यांचाही मृत्यू झाला. ऑगस्ट २०१६मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रूपाणी मुख्यमंत्री झाले. सन २०२१च्या मध्यापर्यंत ते या पदावर होते. अहमदाबादच्या दुर्घटनेत भारतीय वंशाचा एक ब्रिटीश प्रवासी मात्र बचावला.
गेल्या वर्षीच्या दीपावली विशेषांकात सिद्धेश्वर मारटकर यांचा ज्योतिष ज्ञान मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६मध्ये राजकीय व सामाजिक घडामोडींविषयी भविष्य वर्तवताना प्रमुख व्यक्तिंसाठी प्रतिकूल काळ, घात, अपघात, मृत्यूची शक्यता वर्तवली आहे. या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्ष किंवा महायुतीला चांगले यश मिळेल. दशमात राहू असल्याने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे सत्ताधारी पक्षावर आरोप होतील, असे म्हटले आहे. बुध-मंगळ योगामुळे या काळात होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे मोठे नेते, व्यक्ती अडचणीत येतील. वादग्रस्त वक्तव्यांमुळे धार्मिक व जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख, धर्मप्रमुख, प्रमुख पदावरील व्यक्ती यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तिंचे अपघात, घातपात किंवा मृत्यूच्या घटना संभवतात… असेही त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. हे भविष्य वाचल्यावर नियतीने बोलावल्यावर जावेच लागते, हे अजितदादांचेच वाक्य आठवते.
(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक आहेत.)

