AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला. बारामतीचा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) आणि मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला.
AI आणि सॅटेलाइट इमेजिंगच्या मदतीने पिकांची वाढ, पाण्याची गरज, रोग, हवामान याचा अचूक अंदाज घेतला जातो. त्यामुळे पाणी वापर 50%ने कमी होतो. प्रति एकर उत्पादन 73 टनांवरून 150 टनांपर्यंत वाढू शकते आणि साखरेचा उतारा 10%पेक्षा जास्त मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा नफा आणि साखर कारखान्यांचा कार्यकालही वाढतो.
AI परिणामकारकता कशी मोजली गेली?
– तुलनात्मक प्रयोग: दोन वेगवेगळ्या प्लॉट्सवर – एकावर पारंपरिक पद्धतीने आणि दुसऱ्यावर AI तंत्रज्ञान वापरून ऊसाची लागवड केली गेली.

– मोजमापाचे निकष: प्रति एकर उत्पादन (टनमध्ये)
– साखरेचा उतारा (सुक्रोज कंटेंट)
– पाण्याचा वापर
– खत आणि कीटकनाशकांचा वापर
– खर्च आणि नफा
– पीकवाढीचा कालावधी (महिन्यांत)
– डेटा संकलन: IoT सेन्सर्स, सॅटेलाइट इमेजिंग, हवामान केंद्र, जमिनीचे परीक्षण, आणि मोबाइल ॲपद्वारे रिअल-टाइम डेटा गोळा केला गेला.
– प्रमुख वाण: CO 86032, CO M 265, MS 10001, PDN 15012, CO VSI 8005, CO VSI 18121. यापैकी CO M 265 वाणाने 150.10 टन प्रति एकर, PDN 15012 ने 120.40 टन/एकर, CO VSI 8005 ने 104.78 टन/एकर उत्पादन दिले.
– शेतकऱ्यांचा सहभाग: पहिल्या टप्प्यात 1,000 शेतकरी सहभागी; पुढील टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तार.
– सेंद्रिय कर्ब: AI तंत्रज्ञानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब 1.0% राखला गेला, पारंपरिक शेतीत तो 0.68% होता.
या प्रयोगातील पूरक डेटा आणि तुलनात्मक निकाल हे महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.