एक चित्र जे सांगू शकेल ते हजार शब्दही व्यवस्थित सांगू शकणार नाहीत, अशी एक चिनी म्हण आहे आणि ती अनेकदा आपल्या प्रत्ययालासुद्धा येत असते. जे ऐकले त्याचा जेवढा परिणाम होत नाही तितका परिणाम तेच पाहिले तर अधिक होतो हेही आपल्याला ठाऊक आहे. अलीकडेच पॅरिस येथे संपन्न झालेल्या दिव्यांग ऑलिम्पिकचा विचार केला तर त्याचे जे चित्र होते ते आपल्या कायम लक्षात राहील असे आहे.
या आयोजनामधून दिव्यांग व्यक्तींना एक नवे व्यासपीठ तर मिळाले आहेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे यामधून त्यांच्याबद्दल अथवा त्यांच्या दिव्यांग होण्याबद्दल अधिक माहिती गोळा करून ती इतरांपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता काही प्रमाणात निश्चितपणे वाढली आहे असे लक्षात आले. यानिमित्ताने अनेक नव्या खेळांची माहिती आपल्याला मिळाली. पाय अधू झाले असतील तर व्हीलचेअरचा उपयोग होतो हे आपल्याला माहिती होते. परंतु याच व्हीलचेअरवर बसून धडधाकट खेळाडूंसारखेच आपणही वेगेवेगळ्या देशाच्या संघांशी अटीतटीचा बास्केटबॉल सामना खेळू शकतो ही या दिव्यांग खेळाडूंची जिद्द आणि त्यांना बघणाऱ्या जगभरातील लाखो प्रेक्षकांच्या स्तब्ध नजरा हेच सांगतात की या खेळाडूंमध्ये आता लोकांचा विश्वास वाढू लागला आहे. त्यांच्या जिद्दीची आज तारीफ केली जात आहे.
आता या जागतिक दिव्यांग खेळ म्हणजे दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये जे नवीन खेळ आले आहेत ते तर खरोखर धडधाकट असणाऱ्यांना नुसते खेळायलाही धडकी भरवणारे आहेत असे म्हणता येईल. यात व्हीलचेअरवरील आणखी एका खेळाचा समावेश आहे आणि त्याचे नाव बोट-चा असे आहे. यात व्हीलचेअरवर बसून एक चेंडू अचूकपणे काही अंतरावर ठेवलेल्या एका चेंडूला स्पर्श करेल असा फेकायचा असतो. बघा की यात स्नायूंची शक्ती महत्त्वाची असते. त्यासोबतच स्वत:चा तोल संभाळणेही महत्त्वाचे असते. यात सेरेब्रल पाल्सी या मेंदूच्या रोगाने ग्रस्त दिव्यांग भाग घेत असतात. यात अवयवांचे चलनवलन नियंत्रित होऊ शकत नसते.
हा खेळ प्राचीन ग्रीस आणि इजिप्त या देशात खेळला जात असे. हा खेळ मुळात सेरेब्रल पाल्सी या रोगाने ग्रस्त लोकांसाठी असला तरी आता यात इतर काही प्रकारचे दिव्यांग भाग घेऊ शकतात. आज हा खेळ जगातील ५० देशांमध्ये खेळला जात असून तो आज जगातील सर्वाधिक महत्त्वाचा असा दिव्यांग खेळ मानला जातो. १९८४मधील जागतिक दिव्यांग ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश केला गेला होता. विशिष्ट शारीरिक, संवेदनांच्या अथवा काहीही समजण्याच्या अडचणी असतील तर अशा स्पर्धकाला (अर्थातच येथे पोहोचेपर्यन्त्च्या) सर्व कसोट्या पार करून यावे लागते आणि त्यानंतर येथे त्यांच्या कौशल्याची कसोटी लागते.
तर असे हे दिव्यांग ऑलिम्पिकचे चित्र हजार शब्दांच्या भावना व्यक्त करणारे…