Homeब्लॅक अँड व्हाईटवाचनीय ऐतिहासिक कादंबरीः...

वाचनीय ऐतिहासिक कादंबरीः कोणार्क!

एखाद्या ऐतिहासिक विषयावरील कादंबरी वाचायला लोकांना अजूनही आवडतं. कोणार्क, ही अशाच एका कादंबरीचा मराठी अनुवाद आहे जी ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९२मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीचा परिचय आज करून देत आहे. कोणार्क… उडिया भाषेतील प्रतिभासंपन्न लेखिका डॉ. प्रतिभा राय यांची मूळ उडिया कादंबरी ‘शिलापद्म’ला ओरिसाच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार १९८६मध्ये देण्यात आला होता. त्या कादंबरीचा हिंदी अनुवाद ‘कोणार्क’ या नावाने प्रसिद्ध झाला. त्याच कादंबरीचा हा मराठी अनुवाद पद्माकर जोशी यांनी ओघवत्या भाषेत सादर केला आहे. ही कादंबरी आहे, हा काही इतिहास नाही. येथे ऐतिहासिक दृष्टीदेखील प्रमुख नाही. या कादंबरीच्या अणू-रेणूत साहित्यिक दृष्टीच व्यापलेली आहे. या कलाकृतीत केवळ दगडात कोरलेल्या कलाकृतींचच मार्मिक चित्रण नाही, तर शूर उडिया समाजाच्या कलाप्रियतेचं आणि कलात्मक उत्तुंगतेचं चित्रण करीत-करीत लेखिकेनं हे कोणार्क मंदिर या कादंबरीत उभारलं आहे. शिल्पकार कमल महाराणा आणि चंद्रभागाचा त्याग, निष्ठा, बलिदान, विरहाची अमरगाथा या कादंबरीत वाचावयास मिळेल.

लेखिका डॉ. प्रतिभा राय लिहितात- मुखशाला आहे. मंदिर नाही! यालाच सर्वजण कोणार्क मंदिर म्हणतात.

प‌द्मक्षेत्र म्हणजेच अर्कक्षेत्र कोणार्क एक तीर्थस्थान आहे. बंगालच्या उपसागराच्या काठावर पुण्यशील नरसिंह देवांनी धार्मिक भावनेने प्रेरित होऊन सूर्यदेवाच्या पूजेसाठी हे विश्वविख्यात मंदिर निर्माण केलं. कोणार्क ओडिया समाजाच्या केवळ धार्मिक भावनेचं प्रतीक नाही, तर उडिया शिल्पकलेच्या उत्तुंग प्रतिभेचा अक्षय स्मृतिस्तंभ आहे. स्थापत्याच्या इतिहासात कोणार्क मंदिर अद्वितीय आहे. भग्नावशेषांमध्येदेखील भास्कर्यनैपुण्य प्रत्येक शिळेवर साऱ्या जगाला स्तिमित करून सोडतं! परंतु आता कोणार्क पाहण्यासाठी जे लोक येत असतात, त्यांच्यात धार्मिक भावनेपेक्षा आणि कलाप्रेमापेक्षा चैन, मनोरंजन, केवळ मजा करणे हीच ‘वासना’ प्रकर्षाने जाणवते! हे लोक कोणार्कला तीर्थ किंवा कलेचे पीठ मानत नाहीत, तर केवळ मौज करण्याचे ठिकाण समजतात. एक पिकनिक स्पॉट! कोणार्क मंदिर जीवनचक्राची एक मनोवेधक चित्रशाळा तर आहेच, पण त्याचबरोबर येथे कोरलेल्या सृष्टिचक्राचं प्रतीक शृंगारिक मैथुनमूर्तीचं विशेषकरून लोकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र झालं आहे. काही विद्वानांचं तर असं मत आहे की, मिथुन मूर्ती कोणार्क कलेचा कलंक आहेत. काहींना या दृश्यांविषयी वितृष्णा वाटते. काहींच्या मते मंदिराचे निर्माते, तत्कालीन सामाजिक जीवन आणि कलिंग शिल्पकारांची वैचारिक अभिरुची अतिशय हीन पातळीची आहे. परंतु ज्यांनी मिथुन मूर्ती इतक्या कौशल्याने निर्मिल्या आहेत, जे आपल्या जीवनात सतत बारा-चौदा वर्षं संयमाचं पालन करीत राहिले, त्यांच्याविषयी किती लोकांना माहिती आहे? भग्न कोणार्कच्या पहिल्याच दर्शनानं माझ्या मनात अनेक स्पंदनं निर्माण झाली.

त्यानंतर मी अनेकवेळा कोणार्कला गेले आहे. मी ज्या-ज्या वेळी कोणार्क पाहिला, त्या-त्या वेळी मनात एक विलक्षण करुण भाव उत्पन्न झाला. तो भाव कुणासाठी आहे, ते मात्र मला सांगता येत नाही! प्रत्येकवेळी कोणार्क पाहून परततेवेळी नवनिर्मितीच्या वेदनेने अगदी व्याकुळ होते. कोणार्क मला अस्वस्थ करून टाकतो. इतका की माझी विचारशक्तीच कुंठित होते. लेखणी अडखळते. वाटतं- भग्नावशेषांमध्ये जे एवढं उत्तुंग आहे, महान आहे त्याची सुरुवात तरी कोठून करू? त्याचा शेवट कुठे होईल? कादंबरीलेखनापूर्वी अनेकवेळा कोणार्कला जावं लागलं. जवळपासची गावं, रामचंडी मंदिर, गंगेश्वरी मंदिर, दक्षिणेश्वरी मंदिर, कोणार्क मठ वगैरे ठिकाणी बरेच दिवस घालवले. तरीही कोणार्कचा आदि-अंत हाती लागत नाही. प्रत्येकवेळी कोणार्कची कला पाहिली. प्रत्येकवेळी कोणार्कच्या शिल्पकाराने माझ्यासमोर विस्मयाचं एक नवंच दालन उघडलं. कोणार्क नाट्यमंदिराच्या दक्षिणेकडे प्रतीक्षारत ती शाश्वत मूर्ती विस्मयचकित करते. ती तर अनन्यसाधारण आहे. हीच माझी नायिका आहे.

कोणार्क जीवनचित्रांचं एक विशाल ग्रंथभांडार आहे. जीवनसत्याचं एक व्यापक संशोधन केंद्र आहे. आणि म्हणून कोणार्कचं अध्ययन आणि संशोधन कोणत्याही प्रकारे केलं, तरी त्याचे पैलू रहस्यमय, अनाविष्कृत अप्रकटच राहतात! त्यामुळे ‘कोणार्क’ कोणार्ककलेच्या सहस्र पाकळ्यांमधील केवळ चार-दोन पाकळ्या आहेत. ‘कोणार्क’ परिपूर्ण करण्याच्या हव्यासात पुस्तकाची पानं वाढली असती. पण कोणार्ककन्या मात्र चिर-रहस्यमयीच राहिली असती. म्हणून ‘कोणार्क’ लिहून पूर्ण झाल्यावरही सृजनाच्या कळा शमल्या नाहीत. ‘कोणार्क’मध्ये इतिहास आहे. दंतकथा आहेत. लोककथा आहेत. इतिहास राजा-राण्यांच्या, मंत्री-सेनापती यांच्या कथा सांगतो. कोणार्कच्या इतिहासात महाराज नरसिंहदेव, महाराणी सीतादेवी, निर्माण विभाग मंत्री सदाशिव सामंतराय ही नावं उल्लेखनीय आहेत. बाराशे शिल्पकार! यापैकी एकाचाही उल्लेख इतिहासात नाही. त्यामुळे शिल्पकार कमल महाराणा आणि त्याची पत्नी चंद्रभागा यांच्या त्यागाला, निष्ठेला, प्रेम आणि विरहाच्या अमर कथेला इतिहासात कुठेही स्थान मिळालं नाही. परंतु असं असलं तरी त्यांची कहाणी कपोलकल्पित म्हणता येणार नाही. बारा वर्षांत त्यांच्या मनातील कितीतरी आशा-आकांक्षांचे, वासना-विकारांचे, जीवनाविषयीच्या स्वप्नांचे कोणार्क ढासळले असतील! त्यांच्या वेदना कुणाला समजणार?

सातशे वर्षांपूर्वीचा काळ! कल्पनेच्या डोळ्यांना जसा दिसला तसा रेखाटला! मला काही तो खोटा वाटला नाही! त्यात सत्यांश निश्चितच आहे! कोणार्क सत्य आहे. कोणार्क शिल्पकाराची कठोर साधना आणि अढळ निष्ठा सत्य आहे! कोणार्कचं कलानैपुण्य सत्य आहे! आणि अखेर उत्कलीय व भारतीय सांस्कृतिक परंपरांचा महिमा सत्य आहे! त्यांची महात्मता सत्य आहे! त्याच सत्याच्या चरणी ‘कोणार्क’ अर्पण करून ही अक्षरपूजा बांधली आहे!

कोणार्क

लेखिका: डॉ. प्रतिभा राय

प्रकाशक: स्नेहल प्रकाशन

मूल्य- १२० ₹. / पृष्ठे- २४७

कुरिअर खर्च- ४० ₹.

कोणार्क

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वाचा मार्क्स आणि विवेकानंद, एकाचवेळी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श वस्तुपाठ ठरेल, असे हे पुस्तक.. पी. परमेश्वरन यांनी लिहिलेलं 'मार्क्स आणि विवेकानंद' हे पुस्तक. या...

ग्रामीण भागातल्या भयावह परिस्थिती मांडणारी ‘गोष्ट नर्मदालयाची’!

देशाने स्वातंत्र्य मिळवलं, त्याला आता ७८ वर्षं पूर्ण झाली. पण आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शिक्षणाचं तर विचारुच नका. हे पुस्तक वाचताना वाचकांच्या डोळ्यांतून अश्रू आपोआपच कधी झिरपतील, हे लक्षातच येणार नाही. हे पुस्तक शहरातील प्रत्येक कुटूंब सदस्यांसमोर...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट देण्यासारखे पुस्तक ‘छत्रपती शिवाजीमहाराज’!

छत्रपती शिवाजीमहाराज. प्रस्तुत चरित्र विद्यार्थ्यांकरिता लिहिले असून ते संशोधकीय पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवले आहे. एकूण १२ प्रकरणांतून महाराजांचे हे वाचनीय चरित्र मांडण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांनी अत्युत्कृष्ट प्रशासक आणि धडाडीचे...
Skip to content