Homeटॉप स्टोरीप्रवाशाला अवैधरित्या सूट...

प्रवाशाला अवैधरित्या सूट देणारा अभियंता निलंबित!

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन चुकीच्या व अवैध पद्धतीने सूट देणाऱ्या दुय्यम अभियंत्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे.

या प्रकाराची तातडीने चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यासह एकूण तीन जणांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने पोलिसात फिर्याददेखील दाखल केली आहे.

ब्रिटन (यूके)मध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा फैलाव रोखण्यासाठी सजगता म्हणून राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती २१ डिसेंबर २०२०पासून लागू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून युकेसह, इटली, दक्षिण आफ्रिका, युरोप व मध्य-पूर्व देशांमधून हवाईमार्गे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यासाठी विमानतळावर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची तीन पाळ्यांमध्ये नियुक्तीदेखील केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, बेस्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेही कर्मचारी मदतीला नेमण्यात आले आहेत.

मुंबई विमानतळावर उपरोक्त ठिकाणांहून आतापर्यंत सुमारे ४९ हजार ३६२ प्रवासी दाखल झाले आहेत. या प्रवाशांचे योग्यरित्या संस्थात्मक विलगीकरणदेखील करण्यात आले आहे. विलगीकरणातून सूट देण्याबाबतच्या नियमांचे पालन करताना काही अयोग्य घडत असल्याची बाब लक्षात आल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्वतःहून विमानतळ प्रशासनासह संबंधिताना बारकाईने देखरेख करण्याबाबत गोपनीय पत्र दिले. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)लादेखील सतर्क करण्यात आले. त्यानंतर हा गैरप्रकार उजेडात आला.

विमानतळावर कर्तव्यार्थ नेमलेल्या महानगरपालिकेच्या सेवेतील दुय्यम अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) दिनेश एस. गावंडे हा विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चुकीच्या व अवैध पद्धतीने संस्थात्मक विलगीकरणातून सूट देत असल्याची, तसेच त्याला अन्य दोघे मदत करत असल्याची बाब केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) यांनी हेरली. हा प्रकार त्यांनी रात्रपाळीवर कर्तव्यार्थ असलेले सत्रप्रमुख तथा महानगरपालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हफिझ यांनी दिनेश गावंडे यांना विचारणा केली. तसेच सीआयएसएफच्या मदतीने झडती घेऊन त्याच्याकडून बनावट शिक्के व रक्कम जप्त केली. यामध्ये अन्य आस्थापनांचे दोघेदेखील संशयित म्हणून आढळले आहेत. गावंडे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत घटनास्थळी पंचनामा करुन, साक्षी नोंदवून प्राथमिक अहवाल हा महानगरपालिकेचे उपायुक्त (भूसंपादन) तथा विमानतळ उपाययोजनांचे प्रमुख अनिल वानखेडे यांना सुपूर्द करण्यात आला.

घडल्या प्रकाराची तीव्रता पाहता तसेच प्राथमिक अहवाल आणि उपलब्ध पुरावे, तसेच साक्षीदारांचे लिखित यांच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाने दिनेश गावंडे यास काल तत्काळ प्रभावाने निलंबित केले. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने गावंडे याच्यासह एकूण ३ जणांविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात फिर्याद (क्रमांक ०१३५०१२)देखील नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी गावंडेसह तिन्ही संशयितांना अटक केली आहे.

हवाईमार्गे प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. नियमांची कठोर अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे, असे आवाहन यानिमित्ताने प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content