Friday, September 20, 2024
Homeमाय व्हॉईसमान गये उद्धव...

मान गये उद्धव उस्ताद!!

मराठा आरक्षण आंदोलनाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कंटाळले होते. कारण, या आंदोलनाने त्यांना फार छळले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या मराठा आरक्षण आंदोलनाचा, मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या समस्त नेत्यांनी केवळ बुजगावण्याची भूमिका घेतली आणि आंदोलन बऱ्यापैकी थंडावले. कारण जे हे आंदोलन भडकवणारे होते तेच महाआघाडीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असल्याने त्यांनी मराठा आंदोलनाची केवळ वात तेवत ठेवलेली आहे. अजिबात भडका उडू न देण्याची त्यांची स्पष्ट भूमिका आहे.

आणखी एक आतली बातमी म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी अतिशय बेरकी व बुद्धिमान नेते उद्धव ठाकरे यांनी वेगळी शक्कल लढवून या आंदोलनाला शह देण्यासाठी एक नवा पर्याय उभा केला. आणि तो पर्याय होता, आहे श्रीमान विजय वडेट्टीवार, ठाकरे यांचे सहकारी मंत्री. वास्तविक ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व पूर्वी छगन भुजबळ यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी, यावेळी या ओबीसी आंदोलनाचे नेतृत्त्व भुजबळ यांच्याकडे देणे अत्यावश्यक होते. पण ज्या भुजबळ यांची उद्धव यांच्याशी कमालीची जवळीक वाढलेली आहे, म्हणजे उद्या जर भुजबळ यांना राष्ट्रवादी सोडण्याची इच्छा झाली तर मागलापुढला कोणताही विचार न करता ते उठतील आणि थेट शिवसेनेत पुन्हा सामील होतील. किंबहुना, महाआघाडी सत्तेत येण्यापूर्वीच भुजबळ शिवसेनेत चाललेच होते. पण दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच त्यांना तसे न कारण्याचा म्हणजे राष्ट्रवादीतच थांबण्याचा मोलाचा सल्ला दिल्याने भुजबळ यांचे पक्षांतर लांबले ही वस्तुस्थिती आहे.

उद्धव यांच्याशी एवढी सलगी असतानादेखील मराठा आंदोलनाला पर्याय उभा करताना उद्धव यांनी भुजबळ यांच्या हाती अजिबात नेतृत्त्वाची धुरा न सोपविता त्यासाठी काँग्रेसतर्फे मंत्री झालेले विजय वडेट्टीवार यांना पुढे केले. वास्तविक मनासारखे वीज खाते त्या नितीन राऊत यांनी स्वतःकडे हिसकावून घेतल्यानंतर विजय वडेट्टीवार हे कमी महत्त्वाच्या मिळालेल्या खात्यांमुळे कमालीचे म्हणाल तर नाराज, म्हणाल तर अस्वस्थ होते. आहेत. किंबहुना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा त्यांचा अनेकदा विचारदेखील झाला होता. पण संपूर्ण राज्याचे ओबीसी नेतृत्त्व भुजबळ यांच्याऐवजी त्यांच्याकडे चालून आल्याने आता त्यांचा अख्ख्या मंत्रिमंडळावर मोठा दबाव निर्माण झाल्याने ते खूश आहेत.

मनासारखी महत्त्वाची कामे होत असल्याने, अत्यंत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या चंद्रपूर परिसरात उद्धव यांनी वडेट्टीवार यांना जवळ घेऊन आणि भाजपाची मोठी नाराजी पत्करून जी जिल्हा दारूबंदी उठवली, त्यातून विजयबाबू जाम खूश झाले. त्यांची मनासारखे खाते न मिळण्याची नाराजीदेखील त्यातून कुठल्या कुठे पळाली आणि आता ते उद्धव यांचे म्हणाल तर खन्दे समर्थक म्हणून ओळखले जातात. म्हणाल तर त्यांचे एक विश्वासू सहकारी मंत्री म्हणूनदेखील गणले जातात.

उद्धव

वास्तविक वडेट्टीवारऐवजी ओबीसी नेतृत्त्व छगन भुजबळ यांच्याकडे चालून येणे फारसे अवघड नव्हते. किंवा खरे तर तेच हक्कदार होते. पण होते काय की, भुजबळ नेमके ओबीसी नॉर्म्स विसरतात आणि केवळ जातील तेथे त्यांच्या माळी समाजाला ज्ञातीला तेवढे बिलगून, जवळ करून मोकळे होतात. त्याहीपुढे महत्त्वाचे असे की, भुजबळांनी ज्या भानगडी करून ते तुरुंगात गेले, त्यातील आरोपातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी त्यांना मराठ्यांची, विशेषतः शरद पवार यांची नाराजी ओढवून घेणे शक्य नव्हते. आणि परवडणारे तर अजिबात नव्हते. उद्धव यांच्या ते नेमके लक्षात आल्याने त्यांनी भुजबळ यांच्याऐवजी खमक्या लढाऊ आणि प्रसंगी कोणाच्याही अंगावर धावून जाण्याची ताकद ठेवणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना ओबीसी आरक्षण मोर्चाचे व आंदोलनाचे नेते म्हणून पुढे केले..

एक किस्सा मला आठवला की, माझ्या दूरच्या ओळखीच्या एका तरुणीला ती विधवा झाल्यानंतर दिवस गेले. तिच्या घरी एक तरुण कायम यायचा. त्याचेच हे प्रताप आहेत असेच गावकऱ्यांना वाटायचे. कारण हा तरुण तिच्या घरी दिवसा कमी, पण रात्रीच अधिक मुक्कामाला असायचा. पण गावकऱ्यांना वस्तुस्थिती माहित नव्हती की तो तरुण तिला सख्ख्या बहिणीच्या जागी मानायचा आणि तिला त्या तरुणामुळे नव्हे तर ती ज्याठिकाणी नोकरी करायची तिथल्या बॉसपासून दिवस गेले होते. ओबीसी आंदोलनाबाबत बहुतेकांचा तोच गैरसमज आहे की, हे आंदोलन देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाला शह देण्यासाठी उभे केले आहे. पण, अजिबात ती वस्तुस्थिती नाही. हे आंदोलन उभे करण्यामागे, या आंदोलनाला मोठी ताकद देण्यामागे खुद्द उद्धव व त्यांचे काही विश्वासू मित्र अधिक जबाबदार आहेत.

तेच या आंदोलनामागे उभे आहेत. विशेष म्हणजे, तुम्ही हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या फार मोठ्या प्रभावी नेत्याला, म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांना सोबतीला घ्या, त्यांना विश्वासात घ्या.. असा सल्लादेखील वडेट्टीवार यांना याच नेत्यांनी दिला आहे, अशी माझी पक्की माहिती आहे. हेही खरे आहे की, ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यापूर्वी बावनकुळे यांनी तशी रीतसर परवानगी व अनुमती, त्यांचे लाडके नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघांकडून मिळविली होती. ओबीसी आंदोलनाचे जनक, पाठीराखे देवेंद्र फडणवीस आहेत किंवा होते ही केवळ अफवा आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला शह देण्यात ओबीसी आंदोलन ही नामी युक्ती दीर्घकाळासाठी शंभर टक्के यशस्वी ठरली आहे. मान गये उद्धव उस्ताद..

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...
error: Content is protected !!
Skip to content