Homeब्लॅक अँड व्हाईटवाढलेल्या गवतामुळे ऑस्ट्रेलिया...

वाढलेल्या गवतामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला ८० कोटींचा फटका!

कसोटी क्रिकेट विश्वात १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा मोठा इतिहास असलेल्या प्रतिष्ठेच्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघात ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत जगप्रसिद्ध मेलबर्न स्टेडियममध्ये झालेला चौथा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला आणि क्रिकेटविश्वात कसोटी‌ सामन्यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरु झाली. या मालिकेतील दोन्ही संघातील पर्थ येथे झालेला पहिला सामनादेखील दोन दिवसात संपला होता. त्यामुळे मेलबर्न स्टेडियममध्ये त्याची पुनरावृत्ती झाल्यामुळे क्रिकेटप्रेमीमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला. एक तर वाढत्या टी-१० आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे दिवसेंदिवस कसोटी सामन्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. प्रेक्षकदेखील कसोटी सामन्यांपासून दुरावत चालला आहे. त्यातच जर खराब खेळपट्टीमुळे दोन-दोन दिवसांतच कसोटी सामने संपायला लागले तर क्रिकेटप्रेमींनी करायचे काय? त्याला चेंडू-फळीत रंगणारे द्वंद्व बघायचे असेल, त्यासाठी ५ दिवसांचे त्याने पैसे मोजले असतील तर असे दोन दिवसांत सामने संपले तर तो सामने बघण्याचा नक्की फेरविचार करेल. तीच गोष्ट सामन्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या चॅनलचीदेखील होऊ शकते. त्यांनीदेखील मोठी रक्कम देऊन प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले असतात. मग सामना दोन दिवसांत संपला तर त्यांचेही जाहीरातींचे मोठे उत्पन बुडते. तीच बाब सामना आयोजित करणाऱ्या यजमान संघटनेला, तसेच त्यांच्या सर्वोच शिखर संघटनेला लागू पडते. त्या दोन्ही संघटनांना अशावेळी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आता हे दोन सामने अवघ्या दोन दिवसात संपल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला किमान ७० ते ८० कोटी रुपयांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मेलबर्न स्टेडियममध्ये पहिले दोन दिवस ९० हजारपेक्षा जास्त चाहत्यांनी गर्दी केली होती. पण त्यांच्या पदरी केवळ‌ निराशाच पडली. त्यात यजमान संघ पराभूत झाल्याने त्यांचे चाहते आणखी दुखावले गेले. त्यातच मालिकेत ३-० अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अशी दाणादाण उडेल अशी कल्पनादेखील त्यांनी केली नसेल. पण दोन दिवसांत खेळ खल्लास झाल्याने ते रसिकांसाठी काही विपरीत घडल्यासारखे होते. कसोटीत ५ दिवस संघर्ष, थरार, चुरस अपेक्षित असते ते सारे गणित कोलमडले. अवघ्या ९८ षटकांत सामना निकाली ठरला. पहिल्या दिवशी‌ २० तर दुसऱ्या दिवशी १६ फलंदाज बाद झाले. एकाही संघाला २०० धावा करता आल्या नाहीत अथवा एकाही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आली नाही. इंग्लंडच्या ब्रुक्सने या सामन्यात सर्वाधिक ४१ धावा केल्या. या सामन्यात तेज गोलंदाजांचा बोलबाला राहिला. दोन दिवसांत फिरकी गोलंदाजाने एकही चेंडू टाकला नाही. बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या दिवशी २० फलंदाज बाद होण्याचा विक्रम ७४ वर्षांनंतर पुन्हा झाला तर तब्बल १२९ वर्षांनतर पुन्हा एकदा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. ५ सामन्यांच्या या मालिकेत ४ सामने एकूण १३ दिवसांत संपले. त्यावरुन क्रिकेटचाहत्यांना या मालिकेने कितपत आनंद दिला हा मोठा प्रश्नच आहे.

मेलबर्नच्या खराब खेळपट्टीवर आजी-माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघात समतोल राखणारी ही खेळपट्टी नव्हती. गोलंदाजाला जेव्हा चेंडू टाकण्यासाठी फारसे प्रयास पडत नाहीत आणि फलंदाजाला मात्र चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो कुठून कुठे, कसा जाईल याचा अंदाज येत नाही, तेव्हा तो खेळ कसोटी दर्जाचा नसतो तर केवळ नशिबाचा भाग असतो असे म्हणावे लागेल. कसोटी सामने फलंदाज, गोलंदाज यांच्यासाठी संयमाचे प्रतिक असते. पण मेलबर्न कसोटीत त्याच्या बरोबर उलटा प्रकार बघायला मिळाला. मेलबर्न कसोटीत खरं म्हणजे खेळाडू, प्रेक्षक, प्रसारक या सर्वांची फसवणूक झाली आहे. सर्वसाधारणपणे खेळपट्टीवर ७ मिलीमीटर उंच गवत ठेवले जाते. पण मेलबर्न कसोटीत ते १० मिलीमीटर ऊंच ठेवले गेले. वाढीव ३ मिलीमीटर गवताने सामन्याची वाट लावली. आता खेळपट्टी तयार करणारे मॅट पेन आणि त्यांच्या सहाय्यकांची चौकशी होईल. पण मुख्य प्रश्न हा आहे की सामन्याच्या आदल्या दिवशी पंच, सामनाधिकारी, दोन्ही संघाचे कप्तान, मुख्य प्रशिक्षक खेळपट्टीची पाहणी करतात. त्यांच्या कोणाच्याही लक्षात गवताच्या वाढीव उंचीचा प्रश्न कसा आला नाही? ते वेळीच लक्षात आले असते तर गवताची छाटणी होऊ शकली असती आणि पुढचे सारे रामायण-महाभारत टळले असते. असा प्रकार अन्य देशात झाला असता तर त्यावरुन मोठे वादळ उठले असते.

तब्बल १५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर इंग्लंडने बॉक्सिंग डे कसोटीत ऐतिहासिक विजयाची नाेंद केली. ५४६८ दिवसांच्या कालावधीनंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियात परत विजय साकारला. पण या ऐतिहासिक विजयाला खराब खेळपट्टीची किनार लागल्यामुळे हा त्यांचा विजय काळवडंला. आता भविष्यात आयसीसीने त्रयस्थ पंचांप्रमाणे त्रयस्थ क्युरेटरची एक चांगली टिम तयार करुन ती विविध देशात पाठवण्याची वेळ आली आहे. अशा खराब खेळपट्टयांमुळे कसोटी सामने वाचवण्याच्या प्रयत्नांना खिळ बसू शकते. पारंपरीक कसोटी लढती टिकल्या पाहिजेत असा सूर आळवणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याप्रकरणी आता किती गंभीर पावले टाकते ते बघायचे.

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार तसेच समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भारतीय फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी फक्त खुर्चीच्या राजकारणात!

‌विश्व चषक फुटबाॅल स्पर्धेसाठी अवघ्या दीड लाखाची लोकसंख्या असलेला कुराकाओ हा छोटा देश पात्र ठरतो आणि या स्पर्धेच्या इतिहासात नव्या विक्रमाला गवसणी घालतो. त्याउलट आज महासत्तेकडे झेप घेण्याची स्वप्न बघणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा भारताचा फुटबाॅल संघ २०२६मध्ये...

.. आणि भारतीय स्क्वॉश संघाने घातली विश्वविजेतेपदाला गवसणी

चेन्नई येथे आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारतीय संघाने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना चक्क विश्वचषकाला पहिल्यांदा गवसणी घालून एकच खळबळ माजवली. याअगोदर या स्पर्धेत भारताची मजल कांस्यपदकाच्या पुढे कधी गेली नव्हती. भारताने यंदा पहिल्यांदाच या...

जर्मन हॉकी लिगमध्ये ज्युनियर खेळाडूंना मिळते पूर्ण स्वातंत्र्य!

चेन्नई येथे राधाकृष्ण मेयर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या १४व्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय हॉकी संघाने जोरदार कमबॅक करताना तब्बल ९ वर्षांनंतर आपला पदकाचा दुष्काळ संपवला. कांस्यपदकाच्या लढतीत माजी विजेत्या अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या सत्रापर्यंत भारतीय संघ २-० गोलांनी...
Skip to content