विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक फॉरेस्ट, ह्या लघुपटला मिळाला. हर हसबंड, ह्या लघुपटला चौथा क्रमांक मिळाला. दुसर्या क्रमांकाला दहा हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह, तर तिसर्या आणि चौथ्या क्रमांकाला साडेसात हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांखालील वयोगटात आरोह, ह्या लघुपटला पहिले आणि ओरखडा ह्या लघुपटला दुसरे परितोषिक मिळाले. विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या लघुपट स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
ह्या स्पर्धेसाठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक पूरुषोत्तम बेर्डे, लेखिका रोहिणी निनावे, दिग्दर्शक आणि संकलक राजन वाघधरे, संकलक भक्ती मायाळू आणि एडगुरु भारत दाभोळकर ह्यांनी परीक्षक म्हणून कांम पाहिले. पुरस्कार वितरणासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव, एडगुरू भरत दाभोळकर, अभिनेते जयवंत वाडकर, विजय पाटकर आणि साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे उपस्थित होते. सगळ्यांनीच विनय आपटे ह्यांच्या आठवणी जागविल्या. माझ्यासारख्या अनेक कलावंतांना विनय आपटे ह्यांनी घडविले, नव्या संधी दिल्या, मार्गदर्शन केले, असे पुष्कर श्रोत्री म्हणाले. परीक्षकांच्या वतीने बोलताना पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की, पुढील वर्षी लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी लघुपट बनविण्यावर एक कार्यशाळा घेण्यात येईल. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि नंतरच लघुपट बनवावेत.
प्राचार्य माधव राजवाडे ह्यांनी अशाप्रकारच्या कलाप्रकारांचे आयोजन करण्यासाठी साठ्ये महाविद्यालय नेहमीच सहकार्य करते, असे सांगितले. प्रतिष्ठानबद्दलची माहिती देताना विश्वस्त वैजयंती आपटे म्हणल्या की, नव्या कलाकारांना संधी देणे, नवीन मुलांना घडविणे हे विनय आपटे ह्यांचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही चालवत आहोत. प्रतिष्ठानतर्फे नेहमीच अभिनय, सूत्रसंचालन, डबिंग अशा विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. लघुपट स्पर्धेला दिलेल्या चांगल्या प्रतिसदाबद्दल त्यांनी सगळ्यांना धन्यवाद दिले.

