दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या खमंग खाद्यपदार्थांचा आस्वाद मिळावा या हेतूने राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात येत्या 12 ते 14 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी दिली आहे. कस्तुरबा मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे.
या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागांतले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर परिसरातले सावजी चिकन, मटण रस्सा, तर्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाई; पुणे परिसरातली मिसळ-पाव, वडा पाव आणि पुरणपोळी, जळगावातली शेव भाजी, वांग्याचे भरित आणि केळीशी संबंधित पदार्थ; मालवणातले मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोलकडी; छत्रपती संभाजी नगरमधली नान कालिया, डालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणी; कोल्हापुरी नॉन-व्हेजमधला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील. या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव, पुणे, अमरावती, रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदांतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडच्या रुचकर पदार्थांचादेखील आस्वाद घेता येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर काही..
हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित केले जाणार आहेत. लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणून ‘करमणूकीचे’चे खेळ आणि जादूचे प्रयोग याचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विशेष माहिती स्टॉलदेखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटनस्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे निवासी आयुक्त विमला यांनी सांगितले.

