मुंबईच्या नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने टपालसेवा पुरविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने एका पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील पाच टपाल कार्यालयातील पोस्टमनना 200हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. चकाला एमआयडीसी टपाल कार्यालयामधून उद्या, 4 डिसेंबरला याचा शुभारंभ होणार आहे.
भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने हा एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्सची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी टपाल खात्याने पायी पत्रे पोहोचवण्यापेक्षा नवीन स्मार्ट पर्याय अंगिकारण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाअंतर्गत टीव्हीएस व्हीएमएसच्या सहयोगाने पोस्टमन/पोस्टवुमनसाठी इलेक्ट्रिक दुचाकी दिली जाणार असून त्याद्वारे समग्र सेवा पुरवली जाणार आहे. चकाला, मुंबई जीपीओ, सायन, दादर व काळबादेवीसहित मुंबईत नव्याने सुरु झालेल्या वितरण केंद्रांमधील पोस्टमन/पोस्टवुमनना टपाल वितरणासाठी टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक दुचाकी दिल्या जाणार आहेत. रोज येणारी पत्रे, पार्सल व अकौंट्स टपालसारख्या सर्व प्रकारच्या टपालाचे वितरण करण्यासाठी पोस्टमन/पोस्टवूमन या वाहनांचा वापर करतील.
या उपक्रमाअंतर्गत 211 दुचाकी देण्यात येणार असून त्यांचे संचालन सुरळीत, पर्यावरणस्नेही व रास्त दरात होण्यासाठी टपाल कार्यालयाजवळ विशेष चार्जिंग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हा पथदर्शी प्रकल्प उद्या सकाळी 10 वाजता चकाला एमआयडीसी टपाल कार्यालयातून सुरु होणार आहे. महाराष्ट्र व गोवा मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग , भारतीय टपालच्या मुंबई क्षेत्राच्या टपाल सेवा संचालक काईया अरोरा तसेच टीव्हीएस व्हीएमएसचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित असतील.

