Homeमाय व्हॉईस४२ पिढ्यांचा उद्धार...

४२ पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कशाला हवाय सन्मान?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवाभाऊंनी एका सरकारी निर्णयाद्वारे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागण्याचा आदेश जारी केल्याचे सर्व वर्तमानपत्रे आणि माध्यमांनी जाहीर केले होते. अद्यापी याबाबत सरकारने काहीही खुलासा न केल्याने तो निर्णय खराच असल्याचे मानून दोन शब्द लिहिण्याचे धाडस करत आहे. सरकारने जर असा काही निर्णयच झाला नव्हता, असे जाहीर केल्यास आम्हीही यावर काही लिहिल्याचे आठवत नाही, असे म्हणण्यास मोकळे आहोत! आमच्या थोड्याबहुत अनुभवाने आम्ही खात्रीने सांगू शकतो की, महाराष्ट्रातील सनदी व पोलीस दलातील अधिकारी लोकप्रतिनिधी, मग तो पंचायत समितीचा सदस्य असो वा खासदार, प्रत्येकाचा मान ठेवूनच त्यांच्याशी बोलत असतो, यात शंका घेण्याचे मुळीच कारण नाही. अपवाद म्हणून कधीकधी आवाज चढतही असेल तर तो पलीकडून आवाज वाढल्यावरच याची मुख्यमंत्र्यांनी खात्री करून घ्यावी. कारण हल्ली सरकारी कार्यालयात अगदी प्रवेशापासून तो अधिकाऱ्यांच्या केबिनमधील सर्वांचेच वागणे-बोलणे, इतकेच नव्हे तर त्यांचे ‘हातवारे’ही चित्रबद्ध केलेले असतात, हे लोकप्रतिनिधी विसरलेले दिसतात. या हातवाऱ्यात केवळ भाषणाचे चित्रण नसते तर अपशब्दांचेही दृश्य परिणाम दिसून येतात हे कुणाच्याच कसे लक्षात येत नाही.

गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधीचे आवाज ‘तसे’ही वाढू लागले आहेत. यांचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मतदारसंघातील नेमक्या उणिवा यांना माहीतच नसतात. यांचे पंटर्स यांना जितकी माहिती देतात तितकेच त्यांच्या कानावर असते. माहिती घेऊन नेमकी समस्या विचारात घेऊन त्याचा पाठपुरावा करणे कुणाच्या गावीही नसते. आपली मागणी नेमकी कुठल्या खात्याशी (विभागाशी – माहित असलेले खाते नव्हे) संबंधित आहे हेच यांच्या गावी नसते. खरंतर या राज्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी शांतच आहेत. गडबड-गोंधळ करणारे फारच कमी आहेत. परंतु कसाही आवाज मोठा करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे कसब मात्र त्यांच्याकडे जरूर आहे. काही तरुण आमदारही आवाज चढवण्यात आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत वाढलेले काही आमदारही या मार्गावर चालू लागल्याचे दुर्दैवी चित्रही पाहण्यास मिळत आहे. विरोधी पक्षाचे वा अधिकाऱ्यांचे म्हणणे शांतपणे कसे ऐकून घ्यावे याचे शिक्षण देणारे क्लासेस ज्येष्ठ पवार यांनी काढावेत असे सुचवावेसे वाटते. कारण, आपल्याला पटो वा ना पटो पवारांनी आपला आवाज कधी वाढवलेला आठवत नाही. सर्वांसमोर तर नाहीच नाही!! बंद दरवाजा आड अत्यन्त मृदू शब्दांत अधिकाऱ्यांची ‘वाजवता’ येते हे त्यांच्याकडूनच शिकावे लागेल.

एका तरुण आमदाराने एका जिल्हास्तरीय दरबारात जनतेसमोर नाही नाही त्या भाषेत एका अधिकाऱ्याला सुनावले तेव्हा दुःखी झालो. अधिकाऱ्याला बोलले म्हणून दुःखी नाही, ती पद्धत अत्यंत चुकीची होती. ‘माझ्यासमोर खिशात हात काय घालता? नीट उभे राहा’ ही भाषा पवारांच्या घरातील नाही, फर्ग्युसनच्या चौकातील वाटते! आणि गमंत अशी की हा व्हिडीओ पक्षाने प्रसारित केला आहे. तसेच हल्ली निवडणुकांचा मोसम असल्याने सत्तारूढ तसेच विरोधी पक्षातील काही अतिउत्साही नेते अधिकऱ्यांना कसे फैलावर घेतले व जनता जनार्दनरुपी मतदारराजाप्रती आपणच कसे बांधील आहोत हे दाखवण्याच्या रेसमध्ये सर्व शिष्टाचार पायदळी तुडवत आहेत. सत्तारूढ पक्षातील एक आमदार जनता दरबारात सर्वांसमोर महापालिका अधिकाऱ्यांचा पाणउतारा करण्यात धन्यता मानतो. पश्चिम उपनगरातील हा आमदार उघडउघड शिष्टाचाराचे उल्लंघन करताना दिसत आहे. संतापाची बाब म्हणजे हे लोकप्रतिनिधी ज्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्या समस्या तेथे कित्येक वर्षांपासून एकाच जागी आहेत. केवळ निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत म्हणूनच यांचे तेवर वेगळे झाले आहेत.

मुख्यमंत्री व मुख्य सचिव महोदय, हे केवळ एक-दोनच नमुने वानगीदाखल लिहिले आहेत. अजून किमान १०/ १५ तरी पोतडीत आहेत. असे असताना तुम्ही मानभावीपणे हा सरकारी निर्णय प्रसारित केलात तरी कसा? आपल्या अधिकाऱ्यांचा मान तुम्ही नाही राखणार तर कर्नाटकचे मुख्यमंत्री राखणार काय? लोकप्रतिनिधींचे न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांची बाजू घ्यायचा प्रश्न नाही. एखादी गोष्ट खटकत असेल तर मुख्यमंत्र्यांशी बोलता येते. संवादाने किचकट प्रश्नही सुटू शकतात याची साधी जाणही आपल्या लोकप्रतिनिधीना नसावी का? लोकप्रतिनिधींना इतकी सूट दिली आहे की अधिकाऱ्यांनी जर टिपण लिहिलं की सरकारी निर्णयानुसार लोकप्रतिनिधीचा मान ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला तर काय अवस्था होईल याचा कधी विचार केला आहे काय? “Leadership is not about being popular, its about being effective” नेमकं हेच सूत्र आपल्याकडे विसरतात. तसंच “True leaders always practice the three R. Respect for self, Respect for others, and Respect is for there actions” आपल्याकडील अनेक नेत्यांकडे नेमकं हेच नाही. स्वतःच्या मानाकडे /आदराकडे / ते जितक्या आत्मीयतेने पाहतात तितकाच ते समोरच्याचा अपमान करण्यात वाकबगार असतात. मान द्या आणि मान घ्या हे तत्त्व बहुतेक त्यांच्या गावीही नसेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पुणे ते मध्य प्रदेशातले पिस्तुलाचे कारखाने.. अडचणीत कोण?

पूर्वीच्या काँग्रेस राजवटीत गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळेच मुंबई व आसपासच्या परिसरात गुन्हेगारी वाढली होती, असा आरोप जवळजवळ सर्वच भाजप नेते करत असतात. परंतु गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी शेजारच्या मध्य प्रदेश राज्यात तगडा छापा घालून पिस्तूले व कोयता-विळे बनवणाऱ्या...

मोदीजी.. हे बाबू आपले मान्य करतील?

दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत एका व्याख्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंग्रजाळलेली' शिक्षणपद्धती येत्या दहा वर्षांत संपूर्णपणे गाडून टाका, असे आवाहन विद्वानांना व समाजाला केले आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहातर्फे आयोजित केलेल्या रामनाथ गोयंका स्मृती व्याख्यानात पंतप्रधान बोलत होते. समाजमनावर व शिक्षणक्षेत्रात...

ठाण्यात रात्री-बेरात्री फटाके वाजवताय? सावधान!

ठाणे राज्यातील असे शहर आहे की, या शहरात दिवाळी असो-नसो बाराही महिने रात्री-अपरात्री फटाके वाजतच असतात. गेल्या काही दिवसांतील मध्यरात्रीनंतरच्या फटाके वाजवण्याच्या प्रकाराची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यापुढे फटाके आणि बँडबाजा रात्री दहा वाजल्यानंतर...
Skip to content