
बहर कांचनचा… मुंबईकरांना सृष्टीकडून मिळालेली दिवाळीची अनोखी भेट.. मुंबई महापालिकेच्या आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व) येथील वीर अब्दुल हमीद उद्यानात सध्या एक अप्रतिम दृश्य खुललं आहे. उद्यानातील कांचन वृक्षांना असा बहर आला आहे की, संपूर्ण परिसराचे सौंदर्य जणू नव्या तेजाने उजळून निघाले आहे. फुलांनी नटलेली झाडं, त्यावर रेंगाळणारा कोवळा सूर्यप्रकाश आणि मंद वाऱ्याच्या झुळुकीत दरवळणारा सुगंध… जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला आहे. कार्तिक ऋतूतील कदाचित हा पहिलाच बहर असेल. मुंबई महापालिकेच्या उद्यान

विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाकडून जोपासण्यात आलेल्या या उद्यानातला कांचन बहर म्हणजे वृक्ष तसेच पर्यावरणप्रेमींसाठी सृष्टीकडून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर निसर्गाकडून मिळालेली एक अप्रतिम भेट आहे. या फुललेल्या कांचनांनी उद्यानातच नव्हे तर मनातही उत्सव फुलवला आहे. आनंदाचा, सौंदर्याचा आणि निसर्गाशी नातं घट्ट करण्याचा…



