१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले विचार, मते आणि सूचना देण्याचे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले. सामाजिक, शैक्षणिक आणि कौशल्य विकासावरील सूचना या माध्यमातून मागविल्या जाणार आहेत. या धोरणात लिंग, धर्म, जात, भाषा, उत्पन्न, ग्रामीण-नागरी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय सर्व गटांचा विचार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
युवकांनी भारतीय संविधानाचे पालन, शांतता-सामाजिक बांधिलकी, हिंसा व भेदभावापासून दूर राहणे, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रसेवेचा स्वीकार करणे अपेक्षित आहे. हे धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिला व बाल विकास, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास इत्यादी विभागांच्या समन्वयातून नाविन्यपूर्ण युवा योजना सुरू केल्या जाणार आहेत. युवा धोरणात मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, शिक्षण, रोजगार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा व डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या नव्या आव्हानांचाही समावेश असेल, असेही कोकाटे यांनी सांगितले.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, MY भारत, NSS, NCC तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करत आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाच्यावतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ८-१० किमी अंतराच्या जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमापूर्वी निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम हे उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.