नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजे मान्सूनचा प्रवास गेला आठवडाभर खोळंबलेलाच आहे. गेल्या सात दिवसांपासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या परतीच्या रेषेवर एकाच जागी मान्सून अडकून पडला आहे. 14 सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी गुजरात, राजस्थानच्या आणखी काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. त्यानंतर मात्र हा परतीचा प्रवास मंदावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील नव्या हवामान प्रणालीमुळे येते काही दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ, तसेच मराठवाड्याच्या काही भागात आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

12 ऑक्टोबरनंतरच मान्सून महाराष्ट्रातून परतणार
सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल होऊन त्याचे ‘शक्ती’ चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. मुंबईपासून 800 सागरी मैलांवर गुजरातच्या पश्चिम-दक्षिण दिशेला हे वादळ आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत या वादळाचा जोर कमी होऊन ते गुजरातकडे सरकेल. त्यामुळे गुजरातमध्ये लवकरच परतीचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यभरात पुन्हा पाऊस राहू शकेल. महाराष्ट्र राज्यातून मान्सूनचा पाऊस 12 ऑक्टोबरनंतरच परतण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सध्याच्या अपेक्षित वाटचालीनुसार तरी शक्ती चक्री वादळाचा मुंबईला फारसा काही धोका नाही.

विदर्भात तापमानाचा पारा चढतोय
परतीचा मान्सून अडकून पडलेला असताना ऑक्टोबर सुरू होताच विदर्भातील तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक 34.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अकोला येथे 33.8, नागपूर 33.4 आणि चंद्रपूर-वर्धा येथे 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपुढे नोंदला गेला आहे. अर्थात “आयएमडी”च्या अंदाजानुसार, यंदा ऑक्टोबर हीटचा त्रास फारसा जाणवणार नाही. मुंबईत यावर्षी कमाल तापमान 32-33 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसे सामान्यतः ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान 36-37 अंश नोंदविण्यात येते.