परवा ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता मोबाईल वाजला. दचकून जागा झालो आणि फोनवरचे बोलणे ऐकल्यावर कानावर विश्वासच बसला नाही. माझा परममित्र आणि ग्रंथ संवाद डिजिटल साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक जितेंद्र जैन तथा पप्पू याचे निधन झाले होते. दोनच दिवसांपूर्वी माझे आणि त्याचे आपला दिवाळी अंक कसा काढायचा, यावर तासभर चर्चा झाली. नवनवीन गोष्टी त्याच्या आणि माझ्या डोक्यातून येत होत्या.. त्यातील काहींवर आमचे शिक्कामोर्तब झाले. परवा जेव्हा त्याच्या हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी ऐकली आणि मी स्तब्ध झालो. काय करू हेच सूचत नव्हते. शेवटी मनावर दगड ठेवून छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीच तो सेवानिवृत्त झाला होता. त्यावेळी मी त्याच्यावर चार शब्द लिहिले होते. ते खाली देत आहे. त्यात मी त्याने शंभरी गाठावी, असे चिंतीले होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. एका वर्षातच तो आम्हाला सोडून गेला.
एक आनंदयात्री
जितेंद्र भटुलाल जैन ऊर्फ पप्पू याची ओळख श्रीरंग प्रिंटर्स प्रा. लि.मध्ये १९८४मध्ये झाली. मी डीटीपी ऑपरेटर म्हणून तर पप्पू पेस्टअप आर्टिस्ट म्हणून कामाला होतो. तेथे असलेल्या बहुतेक कर्मचाऱ्यांचा एकत्र येण्याचा दुवा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणे. मी, पप्पू, मिलिंद चाळके, बाबा कदम आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश सिन्नरकर असे सगळे स्वयंसेवकच होतो. त्यात आम्ही मुंबई तरुण भारतचे काम करीत असल्याने स्वयंसेवकांची जंत्रीच होती. पप्पू, मी, मिलिंद, रवींद्र लाड सगळे समवयस्क असल्याने आमचे जरा जास्तच जमले. श्रीरंगमध्ये एकापेक्षा एक फास्ट डीटीपी ऑपरेटर तयार होत होते. त्यामुळे एक-दोघे इथून बाहेर पडल्यावर आम्हाला आमची किंमत समजली आणि हळूहळू श्रीरंगमध्ये ऑपरेटरांची कमतरता भासू लागली आणि विभागप्रमुख म्हणून मी, पप्पू आणि लाड यास माझ्या विभागात घेतले आणि ते दोघेही उत्तम ऑपरेटर झाले. पुढील आयुष्यासाठी चांगली तजवीज म्हणून आम्ही तिघेही काही महिन्यांचा अवधी घेऊन १९९१ला श्रीरंग सोडून लोकसत्तात भरती झालो. आज पप्पूचा वाढदिवस आणि आज तो ५८ वर्षांचा झाला. निवृत्त झाला, म्हणून त्याला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.

त्याला आम्ही कधी जितेंद्र म्हणून हाक मारलीच नाही. (आज पप्पू म्हणणे काहीजणांना शिवी वाटेल.) पप्पूला मी तरी कधी दुःखीकष्टी झालेला पाहिला नाही. म्हणजे आमच्यासमोर तरी तो तसा कधी सामोरा आला नाही. कुठलीही गोष्ट करूया म्हणून कायम तयार असतो. त्याचे लग्न आम्ही श्रीरंगमध्ये असतानाच जमले होते. आम्ही लोकसत्तात लागल्यावर मी त्याच्या होणाऱ्या सासुरवाडीला वरोऱ्याला गेलो होतो. त्यावेळी त्या कारणाने मलासुद्धा थोडा खान्देश बघता आला. बरोबर आजच्या दिवशीच आम्ही तेथे होतो. कारण, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही तेथे गेलो होतो. सासरची माणसेही खूप चांगली होती. एवढी की आजही मी त्यांच्या कुटुंबातील एक आहे.
आम्ही एकत्र असे खूप उद्योग केले. त्यात ‘आपला विद्यार्थी’ हे विद्यार्थ्यांसाठी मासिक चालविले. सात वर्षे ते मासिक चालविले. आज मी डिजिटल साप्ताहिक ‘ग्रंथ-संवाद’ काढतो. ते काढण्याची कल्पनाही त्याचीच. त्याच्यामुळेच मी संपादक म्हणून बिरूद लावतो. आजच मी त्याला शुभेच्छा देताना ‘ग्रंथ-संवाद’चा कार्यकारी संपादकपद दिले. येणाऱ्या अंकात त्याचा हा उल्लेख असेलच. त्याबद्दलही त्याला शुभेच्छा. आमच्या ऑफिसमधून तेव्हाच्या औरंगाबादला बदली झाल्यानंतर काहीजणांनी व्हीआरएस घेतली. पण पप्पू तेथून आज अठरा वर्षांनी सेवानिवृत्त झाला. त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. औरंगाबादमध्येही त्याने स्वतःला तर जुळवून घेतलेच. पण आपल्या कुटुंबालाही तेथलेच करून टाकले. रीनाभाभी फोन केला तर आवर्जून घरी येण्याचे आमंत्रण देतात. आनंदही आता तिथलाच झाला आहे. दर एक-दोन दिवसांनी एखादातरी प्रवासी संघ स्वयंसेवक त्याच्या घरी जेवायला असतो. त्याला ते तृप्त करूनच पाठवतात. तर असा हा आमचा पप्पू आता सेवानिवृत्त झाला आहे आणि आताप्रमाणे आनंदयात्रीसारखे वयाची शंभरी गाठो…
वाढदिवसादिवशी दिलेल्या या शुभेच्छांची आज अक्षरशः माती झाली. परमेश्वर पप्पूच्या आत्म्याला शांती देवो..
I express my deep condolences on his untimely death. I pray to the almighty to give courage and strength to his bereaved family to sustain this irreplaceable loss.
May his soul rest in peace.
Anilkumar Somji