उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नान करणाऱ्या तसेच स्नानानंतर कपडे बदलणाऱ्या महिलांचे लपतछपत व्हिडिओ काढून विकणाऱ्या तीन महाभागांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली असून त्यात महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे. व्रज पाटील आणि प्रज्वल तेली अशा महाराष्ट्रातल्या दोन आरोपींची नावं आहेत. यातील व्रज सांगलीचा तर प्रज्वल लातूरचा आहे. या दोघांबरोबर आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्र प्रकाश फुलचंद असे त्याचे नाव असून तो प्रयागराजचा निवासी आहे. हे तिघे गेल्या काही दिवसांपासून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभामध्ये पवित्र स्नान करणाऱ्या महिलांचे लपूनछपून फोटो आणि व्हिडिओ काढून आंबटशौकिनांना विकून पैसे कमवायचे, असा त्यांच्यावर आरोप आहे.

यासाठी आरोपींनी विशिष्ट अशी कार्यशैली अवलंबिली होती. ते महाकुंभात पवित्र स्नान करणाऱ्या तसेच नंतर कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढायचे. नंतर ते इंस्टाग्राम, युट्यूब तसेच फेसबुकवर बोगस अकाउंट तयार करून त्यामार्फत अपलोड करायचे. अपलोड करताना त्यातल्या महिलांचे चेहरे ब्लर केले जायचे. ज्यांना हे चेहरे ब्लर पाहायचे नसतील म्हणजेच स्पष्ट पाहायचे असतील त्यांनी ते व्हिडिओ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध असायची. अनेक आंबटशौकीन मग हे व्हिडिओ त्यांच्याकडून विकत घ्यायचे. साधारण पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत हे व्हिडिओ विकले जायचे. दोन दिवस त्या अकाउंटवरून धंदा केल्यानंतर आरोपी ते अकाउंट बंद करून टाकायचे आणि मग दुसरे अकाउंट ओपन करून त्या माध्यमातून धंदा करायचा, अशी त्यांची कार्यपद्धती होती असे सूत्रांनी सांगितले.

या आरोपींनी रोमानिया आणि जॉर्जिया या राष्ट्रांमधल्या हॅकर्सबरोबरपण संधान बांधले होते. अनेक भाविक स्वतःहून पवित्र स्नानाचे कौटुंबिक फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करतात. असे फोटो किंवा व्हिडिओ हॅक करण्याचे काम हे रोमानिया आणि जॉर्जियामधले हॅकर्स करायचे आणि ते व्हिडिओ या आरोपींना विकायचे. आरोपी पुढे त्यांच्यावर पैसे कमवत असत. पोलिसांच्या चौकशीत असे आढळून आले की, या आरोपींनी फक्त महाकुंभमधल्या स्नान करणाऱ्या महिलांचेच व्हिडिओ तयार केले नाहीत तर मॉलमध्ये कपड्यांच्या दुकानात ट्रायल रूममध्ये कपडे बदलणाऱ्या महिलांचे, सार्वजनिक प्रसाधनगृह, रेल्वेस्थानकांवरील प्रसाधनगृहं, इतकेच नव्हे तर रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या महिलां रूग्णांचेही कपडे बदलताना किंवा इंजेक्शन घेतानाची सीसीटीव्हीत कैद झालेली दृष्यं हॅकर्सच्या माध्यमातून मिळवून तीसुद्धा आंबटशौकिनांना विकण्याचे काम हे आरोपी करत होते. गेल्या सहा महिन्यांत अशा माध्यमांतून आरोपींनी तब्बल आठ लाख रुपये मिळवल्याचे समजते. बारावीपर्यंत शिकलेल्या या आरोपींनी आतापर्यंत दोन हजारांहून जास्त व्हिडिओ विकल्याचे आणि यासाठी २२ बोगस अकाउंट वापरल्याचे आढळून आले आहे.

१४४ वर्षांनंतर होत असलेल्या या महाकुंभाचा आता अखेरचा टप्पा सुरू आहे. येत्या २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभाची समाप्ती होणार आहे. आणि या शेवटच्या टप्प्यातच महाकुंभात गंगास्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढण्याचे कृत्य उघड झाल्यानंतर प्रयागराजमध्ये आता पोलिसांनी त्रिवेणी संगम तसेच इतर घाटांवर फोटो तसेच व्हिडिओ काढण्यास सर्वांनाच मनाई केली आहे. जे कोणी फोटो काढताना किंवा व्हिडिओ करताना आढळून येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, तशा आशयाच्या अनाउन्समेंट पोलीस तिथे करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १३ गुन्हे दाखल केले असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम तसेच युट्यूबवर असलेले १७ अकाऊंट्स पोलिसांनी बंद केले आहेत. गर्ल्स लाईव्ह, कपिल टीव्ही, देसी भाभीजी, रूपोला रोज अशा काही अकाउंट्सचा यात समावेश आहे. या आरोपींनी पवित्र स्नान करणाऱ्या म्हाताऱ्या महिलांनाही सोडले नाही. त्यांचेही व्हिडिओ बनवून त्यांनी ते विकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
