Friday, February 7, 2025
Homeबॅक पेजआगळीवेगळी कादंबरी 'बलुचिस्तानचे...

आगळीवेगळी कादंबरी ‘बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका’!

‘बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका’ लेखक नंदकुमार येवले यांची एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ऐतिहासिक विषयांवर लिहिताना संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. तसा तो या पुस्तकासाठी लेखकाने घेतला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. विकास आडनावे यांनी लिहिली आहे. त्यातील काही भाग इथे देत आहे.

१४ जानेवारी १७६१ रोजी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दाली यांच्यामध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले. या युद्धात अहमदशहा अब्दाली याने विजय मिळविला असला तरी प्रत्यक्षात अब्दालीच्या हाती नगद पैसा, खजिना असे काहीच लागले नाही. काही घोडे, हत्ती आणि तोफा त्याला मिळाल्या. याशिवाय ४२,००० युद्धकैदी त्याने ताब्यात घेतले. हे सारे सैनिक नव्हते तर बाराबलुते, अठरापगड जातीही त्यामध्ये होत्या. यातील काहीजण काशीविश्वेश्वराच्या दर्शनाच्या आशेने सैन्याबरोबर आले होते. याचा उल्लेख काही लेखकांनी ‘बाजार बुणगे’ असा केला आहे. अब्दाली या सर्वांसोबत बलुचिस्तानाकडे जायला निघाला. यामधील काही जणांची सुटका शीखबांधवांनी केली. शीखबांधवांच्या मराठी प्रेमाचे कारण शिखांच्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहिबा’मध्ये संत नामदेवांचे काही अभंग समाविष्ट केलेले आहेत. हरियाणात या मुक्त केलेल्या युद्धकैद्यांची ओळख ‘रोड मराठा’ अशी आहे.

पानिपतपासून ‘डेराबुग्ती’पर्यंत हे मराठी युद्धकैदी अहमदशहा अब्दालीसोबत होते. डेराबुग्ती येथे बलुचिस्तानचा शासक मीर नाझीरखान नुरी याच्याकडे त्यांना गुलाम म्हणून सुपूर्द केल्यावर ही मराठी माणसे अक्षरशः नरकयातना भोगत राहिले. भारतातील कोणत्याही इतिहासकाराने पानिपत युद्धानंतर एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या युद्धकैद्यांचे काय झाले याचा धांडोळा घेण्याचा कधीही प्रयत्न केल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही. प्रतिकूल हवामान, भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न धर्म, भिन्न खाद्यसंस्कृती असे असतानाही केवळ जगण्याची दुर्दम्य इच्छा, तग धरण्याच्या प्रचंड मनोबलातून तयार झालेली मानसिकता, अंगात असलेले हुन्नर आणि मातृ‌भूमीला परत जाता येणार नाही, याची स्पष्ट झालेली जाणीव याचा परिपाक म्हणून गुलाम म्हणून जगण्याचा पर्याय त्यांनी निवडला. ठरलेल्या करारानुसार कलातला पैसा देता आला नाही म्हणून अब्दालीने या लोकांना गुलाम म्हणून मीर नाझीरखान नुरीच्या हाती सोपविले.

या गुलामांना सक्तीने मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला. या गुलामांपैकी तालेवार सरदारांना बलुचिस्तानातील दुय्यम दर्जाच्या सरदारांशी रोटीबेटी व्यवहार झाला; परंतु बाकीच्या गुलामांना मात्र त्यांनी कष्टकऱ्यांचा दर्जा दिला. जे पदरी पडले ते पवित्र मानून हे गुलाम शेती, कृषी अवजारे तयार करणे, गाय-बैल, शेळ्या-कोंबड्या पाळणे या पूर्वानुभवी जीवनाचा आधार घेत जीवनसंघर्षात तग धरू शकले. त्यांच्या वेदनामय गुलामगिरीची वस्तुस्थिती लेखक नंदकुमार येवले यांनी अत्यंत सुंदर, ओघवत्या आणि मनोवेधक शैलीमध्ये शब्दबद्ध केली आहे. यासाठी त्यांनी अनेक संदर्भग्रंथ, संशोधन प्रबंध, रस्त्यांचे नकाशे यांच्या साहाय्याने एक इतिहास शिक्षक नात्याने हे काम मोठ्या कौशल्याने आणि बिनचूकपणे केले आहे. मानवी शरीर हे चिवट असते, जीवनसंघर्षात मनुष्य सहजासहजी हार पत्करत नाही आणि माणूस सजग असेल तर नियतीच्या दुष्टचक्रात सापडला तरी आपल्या विजिगीषू वृत्तीने परिस्थितीवर मात करत टिच्चून उभा राहतो. मानवामधल्या या सोशिक आत्मसंघर्षाची कथा आणि व्यथा लेखक नंदकुमार येवले यांनी वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

माणूस कुठेही गेला तरी त्याच्या मूलभूत संवेदना संस्कारवृद्धी आणि परंपरा जोपासण्याचा अट्टाहास कधीच लोप पावत नाही. गुलामगिरीत राहतानादेखील या समुहाने महाराष्ट्रातील आपल्या चालीरिती, रूढीपरंपरा, विवाह परंपरा, अत्यंविधी काही प्रमाणात का होईना जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. याचे बारकाव्यासहित वर्णन लेखकाने केले आहे. यातूनच त्यांची समाजाबद्दलची आत्मियता आणि लेखनातील सच्चेपणा प्रकट होतो. वाङ्मयाचे खरे मूल्य हे जीवनमूल्यांची प्रतिष्ठा राखणे हे असते. अशा वाङ्मयाला ‘अक्षर वाङ्मय’ म्हणतात. या निकषावर ही कादंबरी पुरेपूर उतरते.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईपासून ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम पर्वापर्यंत अडीच शतकांचा कालावधी एकत्रित आणणे हे शिवधनुष्य नंदकुमार येवले यांनी सहजगत्या पेलले आहे. हिंदी भाषेवरील असलेले प्रभुत्व सुखावणारे आहे. उत्कृष्ट छपाई, मुखपृष्ठ, संदर्भग्रंथांची सूची यामुळे कादंबरीचे मूळचे सौंदर्य उत्तमरीत्या प्रकट झाले आहे. मराठी वाचक आणि समीक्षक या आगळ्यावेगळ्या विषयावरील कादंबरीचे स्वागत करतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका

लेखक: नंदकुमार येवले

प्रकाशक: प्रफुल्लता प्रकाशन

पृष्ठे- ४०८ मूल्य: ४८० ₹.

बलुचिस्तान

पुस्तकासाठी संपर्क: ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भगवान महावीरांचे जीवन प्रत्यक्ष आचरणात आणण्याजोगे..

भगवान महावीरांनी सांगितलेली अहिंसा जगाला तारेल, असे वाक्य अनेकजण बोलतात. महापुरुषाच्या जन्मदिनी किंवा निर्वाणदिनी असेच बोलायचे असते; परंतु हे वाक्य जर प्रत्यक्षात यायचे असेल तर काय केले पाहिजे, याचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. भगवान महावीरांचे जीवनचरित्र आपण या पुस्तकात...

भारतीय गणिताचा रंजक इतिहास सांगतो ‘अविनाशी बीज’!

हिंदू संस्कृतीतील गणिताची परंपरा अत्यंत दीर्घ आहे आणि या विषयावर उपलब्ध साहित्य त्यानुसार विशाल आहे. डॉ. भास्कर कांबळे यांनी आपल्या लेखणीतून भारतीय गणित आणि त्याच्या विश्वसंचाराचा रंजक इतिहास त्यांच्या अविनाशी बीज, या पुस्तकातून मांडला आहे. डॉ. भास्कर कांबळे हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ...

ऐतिहासिक पुस्तक ‘तंजावरचे मराठे’!

डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर यांनी लिहिलेल्या 'तंजावरचे मराठे', या पुस्तकातून दुर्लक्षित इतिहासाची ओळख करून देण्यात आली आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संशोधक अरुणचंद्र पाठक यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. रवींद्र गोळे यांनी या पुस्तकाची जी भूमिका लिहिली आहे, त्यातील हा...
Skip to content