शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली असून पक्षाला लागलेली गळती मोठ्या प्रमाणात वाढल्यास पुन्हा महाविकास आघाडीत निवडणुकांना सामोरे जायचे ठरवले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या सिल्वर ओक, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पवारांबरोबर झालेल्या चर्चेनंतर ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी आपली ही नवी भूमिका अप्रत्यक्षपणे जाहीर केली. आठवड्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि रोज सकाळी न चुकता माध्यमांशी बोलणारे एकमेव प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी शिवसैनिकांची भावना असल्याचे सांगितले होते. लोकसभेच्या निवडणुका इंडिया आघाडीतर्फे, विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र पक्षवाढीसाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या गेल्या पाहिजेत, असे पक्षाच्या नेत्यांचेही मत असल्याचे राऊत म्हणाले.
राऊत यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचे खापर समन्वयाच्या अभावावर फोडून ठाकरेंच्या शिवसेनेवर दुगाण्या झाडल्या. राऊत यांनीही त्याला प्रत्त्युत्तर देत काँग्रेसवर टीका केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी चालवली. मात्र या सर्व प्रक्रियेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कोणतीही भूमिका मांडली नव्हती. चार दिवसांपूर्वी दुपारी अचानक संजय राऊत शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांची पवारांबरोबर तासभर चर्चा झाली. त्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांची भेट घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेही पवारांच्या घरी पोहोचले आणि पवारांबरोबर तब्बल दीड तास चर्चा केली.
लोकसभेतल्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने महाविकास आघाडीचे नेते फार जोमात होते. परंतु विधानसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर त्यांचे अवसान गळले. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्यामुळे काठावर असलेले अनेक शिवसैनिक शिंदेंकडे वळू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्त्वाचे आजही शिंदेंना भक्कम पाठबळ आहे. त्यामुळेच ठाकरेंचे अनेक शिलेदार त्यांना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत स्वबळाचा नारा देऊन आताच स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यापेक्षा ठाकरेंनी आस्ते कदमची भूमिका घेतली. त्यामुळेच त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश देतानाच तुमच्या भावनांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे बोलले जाते.