Homeन्यूज अँड व्ह्यूजजाणून घ्या आनंदाश्रम...

जाणून घ्या आनंदाश्रम परिसरातल्या देवीचे मनोगत..

काल होती नवरात्र सुरु होण्याआधीची रात्र.. आधीची म्हणजे आदल्या दिवशीची! रात्र म्हणजे मध्यरात्र होत आलेली आहे. सर्व ठाणे बरेचसे शांत आणि झोपेत असले तरी कोर्टनाका व आनंदाश्रम परिसरात मात्र बरीच लगबग सुरु आहे. मोठाले आवाज घुमत आहेत. स्टेजची रचना सांगता सांगता आवाज अजून वाढत आहे. सर्व गेट्स तपासले जात आहेत. लाईटीचा स्पेशल इफेक्ट ‘डोळे फाडू’ आहे. एक कार्यकर्ता म्हणतो, लाईट तर बेस्टच आहे भाऊ.. पण अजून जरा भपका हवा. विरोधकांचे डोळे दिपले पाहिजेत. एक हळू आवाजात म्हणाला- छट मिटलेच पाहिजेत! तेवढ्यात एक मोठा आवाज आला- अरे काय फालतू बकवास चाललीय. एकदम गप्प, हात चालवा.. सर्व एकदम गप्प, कामात मग्न. तेथील टपरीवरून कटिंग चहा आणि तलावपाळीच्या गाडीवरून वडापाव आणि पावभाजीची पार्सल्स आली आहेत असे ऐकताच कल्ला वाढला. त्यातून एक आवाज आला- ‘भाय, आजपासून सर्व बंद, अगदी घासफूस, बायको पण बोललीय. आता दहा दिवस काय नाय, फकत डाळ, भात, भाजी..’. आपण प्रत्येक टायमाला असंच करतो. गणपती अन् देवी आपण लय मानतो भाई!

कोर्टनाका परिसरातीलच दगडी शाळेच्या गल्लीत ठेवलेल्या गाडीवर देवींची मूर्ती बसवून ती गाडी आता स्टेजच्या मधल्या भागात बरोबर अड्जस्ट केली गेली आहे. सकाळी मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करणार आहेत. म्हणून तर सर्वांची व साध्या वेशातील पोलिसांची लगबग सुरु आहे. देवीच्या मूर्तीसमोरील दृश्यांची मनोहारी सजावट केली जात आहे. पहिले दोन-तीन दिवस ही सजावट अधिक आकर्षक केली जाईलच. पण माझे लक्ष त्या सजावटीकडे वा बाहेरच्या गडबडीकडे मुळीच नव्हते. मला केवळ देवीच्या मूर्तीजवळ जायचे होते. त्यावेळच्या घडीला तरी मूर्तीला झाकून ठेवलेले होते. मध्यरात्रीनंतरच्या सुमारास कधीतरी मूर्ती उघड केली जाईल असे सांगण्यात आले व कुजबुजीतूनही समजले. मूर्तीच्या आसपासाची गर्दी कमी होण्याची मी वाट पाहत होतो.. मोठा जरबेचा आवाजही आला (प्रथम मला वाटले कुणी वागळे वरूनच आवाज देत आहे. पण तो भासच होता) चला सर्वांनी बाहेर पडा. अहो काका तुम्ही अजून येथे कसे, घरी जायचे नाही काय? चला.. पण मी ऐकतोय थोडाच. बाहेर जाण्यासाठी वळलो तो थेट पडद्यातच घुसलो. तशी अंगकाठी अगदी काठी असल्याने मी कुठेही अड्जस्ट होतो बर का!

मी घडाळ्यात पाहिले पहाटेची तीनची वेळ असावी. म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा सुरुही झाली होती.

“अंबा बैसली सिंहासनी हो|

प्रतिपदेपासुनी घटस्थापना करुनी हो|

मूलमंत्रजप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो|”

आता ठाण्यातील नंबर एकची देवी असल्याने सभोवती कडेकोट बंदोबस्त असणारच ना! (आणि सोबतीला तो गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट) पण तरीही मूर्तीच्या बाजूला त्यामानाने शुकशुककाट होता. सुरक्षा इतकी की काय बिशाद कोणी आत घुसेल.. मीही घरी जाण्यासाठी पाय वळवले. मनात म्हटले दिघे साहेबांच्या पुतळ्यापर्यंत जाईन आणि रिक्षा घेईन. दोन पावले फिरवलीही..

तोच एकदम आईसारखा एक मृदू आवाज कानावर पडला. “निघालास का रे.. पडदा होता तरी तो झिरमिरी असल्याने सर्व पाहात होते बर का.. मी.. किती वेळ उभा होतास, इकडून तिकडे करत होतास! अरे आता लवकरच पांढरे होईल. नाक्यावरचा काय ते.. तुमच्या हल्लीच्या भाषेत बोलतात कटिंग की काहीतरी.. तसले दोन कटिंग मार. बरोबर खारीपण घे. बघू नकोस. काही होणार नाही. अरे इथल्या गरिबांचा हाच नाश्ता असतो. त्यांना कुठे ब्रेडबटर किंवा उपमा वा पोहे मिळणार!

मी रोज पाहते ना.. अरे हा मार्केट परिसर. येणारे सर्व गरीबच आणि बायाबापड्या तर उपाशीपोटी भाजी व फुलांच्या टपऱ्या घेऊन येतात. ती तुमची लालपरी.. त्यांच्याशिवाय या गरीबांना काय परवडतंय? तीही वेळेवर येत नाही आणि आली तर मध्येच बंद पडते. आणि हो रे.. त्या लालपरीतील वाहक-चालक असतात. गरीबपण भाषा वंगाळ! आणि हो एक सांगायचं राहीलं, त्या कोण तुझ्या त्या सायबाला सांग. अरे त्या लालपरीच्या गाडयांना कधीतरी धुवा लेको, झाडाही कधीतरी.. या गरीब देशातील माणसं बोलत नाहीत यावर जाऊ नका. बघतील बघतील आणि कधीतरी तुम्हालाच ‘धुतील..’

माझ्याच आरतीत तुम्ही म्हणता-

“घेऊनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो|

कवडी एक अर्पिता देसी हरी मुक्ताफळा हो”

अरे या आरतीत तुम्ही सांगता तसे गोधळही घातले जातात. पण ते अगदी कमी. सावळागोंधळ मात्र सर्वत्र जोरदार सुरु आहे. अरे.. या शेजारीच असलेल्या जिल्हा न्यायालयात तर सावळागोंधळ या शब्दाला मागे टाकेल असे गोंधळ दररोज सुरु असतात. हजारो केसेस प्रलंबित आहेत. अनेक खटले तर असे आहेत की ते सुनावणीसाठी कधी येतच नाहीत तरी त्यांना नियमित तारीख मात्र मिळतच असते. जमिनास पात्र गुन्हेगारांनाही तारीख पे तारीख दिली जाते हे विशेष. शिवाय हे न्यायालय आहे की मासळीबाजार आहे हेच समजत नाही. कारण रेल्वेस्थानकापेक्षाही येथे गर्दी असते.

गेल्या वर्षभरात माझ्या इतके जवळ कुणी आलेलेच नव्हते. आले होते ते सर्वजण काहीतरी मागणे घेऊन आणि ‘नणंदेचे कार्टे टूर टूर करते, खरूज होऊ दे त्याला..’ अशा टाईपची माणसे येतात. तुझ्याकडे मी तू आल्यापासून पाहत होते. तू काही मागायला आला नाहीस हे मला जाणवले. म्हणूनच तुला आश्वासक साद घातली…

“दिशांची अफरातफर करून

बिलोरी मंत्रिमंडळ पिकवते

अप्रछन प्रतिबोंब” (अरुण)

असा हल्ली जमाना आहे. कुणावर विश्वास ठेवावा हेच मुळी कळत नाही.

ठाण्यातील प्रचंड वाहतूककोंडीची समस्या आहे माजिवडा नाका आणि घोडबंदर रोड हा त्यातील कळीचा मुद्दा आहे. पण दोन दिवसांपूर्वी घाईगर्दीत आयुक्त म्हणाले की, घोडबंदर रोडवरील कोंडी सुटली आहे. माझे भक्त तेथेही असतातच. ते म्हणाले की, तसे काहीच नाही. तो वरवरचा मुलामा आहे. शनिवारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत म्हणून सर्व यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी त्या परिसरात येजा करत असतात. म्हणूनच तेथे सध्या काही होत नाही. अरे हा कोर्टनाका परिसर तरी स्वच्छ ठेवावा ना? तेही या प्रशासन यंत्रणेला जमत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व काही आलबेल असल्यासारखे भासवले जात आहे.

तेथील पदपथावर अवघ्या दहा टाईल्स लावायच्या आहेत. त्याही तीन वर्षांत लागलेल्या नाहीत. आतील परिसरात गाड्या किती आहेत वा असतात याचा पत्ताही कुणाला नसतो. नियोजन भवनाबाहेरील पदपथावर अगदी अंगाला अंग टेकून उभे असल्यासारखे दोन स्टॉल्स उगाचच उभे केले गेले आहेत. त्याच्यापुढील बसस्टॉपजवळ एक व्यापारी टपरी हल्लीच कुणीतरी घुसवलेली आहे. तो कोर्टनाक्याचा अरुंद बोळवजा रस्ता म्हणजे तमाम ठाणेकरांची मोठी डोकेदुखी आहे. याच रस्त्यावर एक इमारत कोसळून दहा वर्षे झाली तरी त्याचा राडारोडा अजून तेथेच ठाण मांडून बसलेला आहे.

“आम्ही द्रव्यदास| मनाचे मवाळ

देतसे गोपाळ| दूध लोणी

वैकुंठीची पेठ| हवा पैका रोख

किरकोळ ठोक| मिळेल मोक्ष”

अशी एकूण ठाण्याचीच काय सर्व राज्याचीच परिस्थिती असल्याने मी हल्ली काहीही न बोलायचेच ठरवले आहे. परंतु तू विश्वासाचा वाटलास म्हणून तुझ्याशी बोलले. तू तरी या सरकारला कळीव रे लेकरा!

अरे सोन्या, या ठाण्यात किती कारखाने होते. फॅक्टऱ्या होत्या. त्या सर्व बंद पडल्या. काहींनी त्या बंद केल्या. पण तेथे काम करणाऱ्या माझ्या गरीब कामगारांना 20/20 वर्षे झाली तरी एक छदाम हाती मिळालेला नाही. गादीवर बसलेल्या माणसांना माहित नाही का? अरे यातील अनेकांनीच या कारखान्यांना टाळी लावलेली आहेत व कामगारांना भिकेला लावले आहे. “सज्जनाचे बळ| पायामध्ये लुळे” अशी समाजमनाची अवस्था असल्याने कुठलीच यंत्रणा कामाची नाही, अशी भावना जनतेच्या मनात बळावत आहे.

मध्यंतरी एक नवीनच गोष्ट (तशी ती जुनीच आहे) कानावर आली. माझ्याच ठाण्यातील एक लोकप्रतिनिधी म्हणाल तर प्रभावशाली.. त्याने घोडबंदर येथील गायमुख परिसरात एक स्वप्नवत वाटणारा परंतु प्रत्यक्षात येऊ घातलेला एक मोठा प्रकल्प घोषित करून कामाला सुरुवातही झोकात केली आहे. त्या परिसरातील रस्ते रुंद करण्याचे काम लगोलग हाती घेण्यात आले. त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण हीच तत्परता ठाण्यातील इतर भागातही दाखवली गेली पाहिजे अशी तक्रार कुणीतरी केली. लोकप्रतिधी प्रभावशाली असल्याने तक्रारदार सापडणे कठीण गेले नाही. झाले. त्याच्या दरबारात त्याला हजर केले गेले. त्याचा उद्धार केला गेला व माफियाच्या दरबारात जसं नाक रगडणे होते अगदी तसेच करून माफीनामाही घेण्यात आला.

आता मला तू सांग. मी जरी बोलू शकत नसले तरी पाहू शकते हे या नेत्यांना कुणी सांगत का नाही? माझ्या कानावर तर असंख्य गोष्टी भक्तच घालत असतात. पण मी निराकार तर आहेच. शिवाय निर्जीव ही!! म्हणजे थोडक्यात असूननसून सारखीच. आता देवीच इतकं बोलत होती ते पाहून मी चान्स घ्यायचा ठरवले. बोलण्यासाठी तोंड उघडतातच माता म्हणाली- तेव्हडं राजकारण सोडून सर्व बोल, कारण राजकारणावर बोलायचे आता काहीही राहिलेले नाही. आणि आता तर तीन-चार महिने केवळ राजकारणच चालणार आहे, असे बोलून देवीमातेने मला निघण्याची खूण केली..

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content