पुस्तक परिचयासाठी ‘स्वप्नामधील गावां…’, हे पुस्तक हाती घेतले आणि वाचायला सुरुवात केली. दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी यांचे हे अनुभवकथन वाचताना एक वेगळ्याच भावविश्वात आपण वावरतो. त्यांच्यासारखं जीवन आपण जगू शकतो का, असा प्रश्न आपल्या मनात येतो. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्यासारखं जगणं कठीण आहे, असे मला वाटते. निसर्गाशी एकरूप झालेल्या या दांपत्याची जीवनगाथा मांडणारे हे पुस्तक आहे.
या पुस्तकाची मांडणी पाच विभागात करण्यात आली आहे.
विभाग १ः जडणघडण
विभाग २ः अनुभव
विभाग ३ः विश्लेषण
विभाग ४ः कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक बाबी
विभाग ५ः उद्या
या दोघांनी प्रत्येक विभागामध्ये आपले मनोगत स्वतंत्रपणे मांडले आहे. त्यामुळे वाचायची उत्सुकता वाढते. सामाजिक कार्य करणाऱ्या दांपत्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.
काय आहे या पुस्तकात?
‘केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही, आपण तसं जगायलाही हवं..’ असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी हे जोडपं ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ जगण्यासाठी २५ वर्षांपूर्वी पुण्यातून बाहेर पडून कोकणातल्या एका खेड्यात जाऊन स्थायिक झालं. त्यांच्या २५ वर्षांच्या अशा जगण्याचं हे आत्मकथन. त्यांचं हे जगणं जितकं सजगतेनं आहे, तितकंच उत्कटतेनंही. जितकं विचारपूर्वक आहे, तितकंच भावपूर्णही. परिपूर्णतेचा ध्यास आहे; पण, मर्यादांचं भानही. त्यामुळेच, हे दांपत्य ‘असामान्य’ न वाटता, चारचौघांसारखं वाटतं. त्यांची ध्येयंही आपल्यालाही आपल्या आवाक्यातली वाटतात. त्यांच्यासारखाच प्रयत्न आपणही करावा, अशी प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे.
लेखकाची अन्य पुस्तकांची नावे-
१} निसर्गायण: पर्यावरणाचा मूलगामी आणि एकात्म विचार.
२} हसरे पर्यावरण: शालेय विद्यार्थ्यांसाठी संवाद-शैलीतलं पुस्तक.
३} दैनंदिन पर्यावरण: खुसखुशीत शैलीतील १०१ कृति-कणिका.
४} अणु-विवेक: अण्वस्त्रं, अणुचाचण्या आणि अणुवीज यांच्या महाभयंकर, विनाशकारी वास्तवाची पुराव्यांसह माहिती.
५} सम्यक विकास: मानवजातीला खऱ्या विकासाकडे नेणाऱ्या मार्गाचा शोध.
६} वेगळ्या विकासाचे वाटाडे: विकासाचा सुयोग्य मार्ग दाखविणाऱ्या पाच विचारवंतांच्या विचारांचा परिचय.
७} बदलू या जीवनशैली (भाग १-२): ‘गतिमान संतुलन’ या मासिकाच्या १२ वर्षांतील निवडक संपादकीयांचं संकलन.
८} हरित साधक: स्वास्थ्य, आंतरिक विकास आणि पर्यावरण संतुलन यासाठी जीवनशैलीत परिवर्तन केलेल्या असामान्य सामान्यांचा परिचय.
९} भूतान आणि क्यूबा: सम्यक विकासाच्या दिशेने: या दोन देशांच्या आगळ्यावेगळ्या विकासनीतीचा परिचय.
पर्यावरण क्षेत्रात काम करणारे, आवड असणारे यांनी वाचावीत अशी ही पुस्तकं आहेत.
निसर्गस्नेही जीवनशैलीकडे
दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी
मूल्य- 200 ₹./पृष्ठ-212
पुस्तक खरेदीसाठी संपर्कः
ग्रंथ संवाद वितरण- 8383888148 कुरिअर खर्च- 50 ₹.