Friday, October 18, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूज50 खोल्यांच्या या...

50 खोल्यांच्या या ‘नॅपकिन’ हॉटेलवर वरदहस्त तरी कोणाचा?

50 खोल्यांच्या या प्रस्तावित नॅपकिन हॉटेलवर वरदहस्त तरी कोणाचा?

“कॉम्रेड,

ही लोकशाही नाहीहे

ही विटंबना सतरा पिढ्यांची मूग गिळून पोसलेली

हा प्रकाश नाहीहे

हा पिंजर पिळवणुकीचा…

लोकशाहीत सात्विकतेने जन्म दिला जातो त्यांना

पायाखाल्ली भूमी चोरून” (नामदेव ढसाळ)

नामदेवरावांच्या या जळजळीत ओळी आठवण्याचं कारणही तसंच आहे. कालपरवापर्यंत मुंबईतल्या गोरेगावच्या पूर्व परिसरात अगदी रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या गोगटेवाडीत ‘पायाखाल्लील’ जमीन चोरून सुमारे 15 हजार चौरस फुटांत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत माहिती मिळाली आणि या ओळी आठवल्या. लोकशाहीचा कितीही गजर करीत असले तरी ही लोकशाही नाही असेच हे सर्व नियमांना धाब्यावर बसवून केलेले पक्के बांधकाम पाहून मनात आले.

गोगटेवाडी आणि आजूबाजूचा परिसर ज्यांना माहित आहे त्यांना हेही माहित असेल की या परिसरात बऱ्यापैकी मोकळी जागा होती. या अनधिकृत बांधकामाशेजारीच सन्मित्र नावाची शाळाही आहे. संताप आणणारी गोष्ट म्हणजे या मोकळ्या जागेवर सुमारे 50 खोल्यांचे बैठे निवासी हॉटेल बांधायचा संबंधितांचा विचार दिसतो. यासाठी त्यांच्याकडे नाही महापालिकेची परवानगी, ना वस्तूविशारदाचा आराखडा.. फक्त असलाच तर तो अदृश्य ‘देवपित्याचा’ आशीर्वाद! आजकालचा हा ‘देवपिता’ म्हणजे कोणी शक्तिमान राजकारणी किंवा धंदेवाईक माफियाच असावा, असा संशय या परिसरासतील नागरिक व्यक्त करत आहेत. सर्वसाधारणपणे रीतसर परवानगी घेऊन जर बांधकाम करण्यात येत असेल तर बिल्डरच्या नावाची पाटी, वस्तूविशारदाचे नाव आदी तपशील बांधकामस्थळावर दिलेला असतो.

महापालिका व सरकारी यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या कामात दंग असताना सुमारे साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पक्क्या 50 खोल्या उभ्या राहिल्या आहेत. संतापजनक माहिती अजून पुढेच आहे. बांधकाम सुरू केले तेव्हा उन्हाळा असल्याने पाण्याची जोडणी मिळणे कठीणच असणार आणि आता कुठे पावसाळा सुरु झाला असताना या महाशयांनी प्रत्येकी दहा हजार लिटर्स क्षमतेच्या सहा टाक्या छतावर बसवल्या आहेत. खबरदारी म्हणून पाणी चोरून खेचण्यासाठी सुमारे तीन पम्पही बसविण्यात आल्याचे समजते.

अधिक माहिती मिळवत असताना आणखी धक्कादायक माहिती हाती आली. ती म्हणजे या 50 खोल्यांचा  शॉर्ट टाइम हॉटेल्ससारखा वापर केला जाणार आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावरून जाणाऱ्या खासगी बसेसच्या प्रवाशांच्या सोयीसाठी हे असल्याचे साळसूदपणे सांगण्यात येत असले तरी ही वेगळ्या प्रकारची ‘नॅपकिन’ हॉटेल्सच असल्याचे जाणकार सांगतात. या परिसरातील हजारो नागरिकांना याचा त्रास होणार आहेच. समजा हे जर रीतसर हॉटेल असेल तर अन्न व औषध प्रशासनाचीही परवानगी लागणार, अग्नीशमन यंत्रणेचा परवानाही गरजेचा आहे. पोलिसांचेही ना हरकत प्रमाणपत्र लागणार. या सर्वांतील एकही प्रमाणपत्र वा बांधकाम परवाना नसताना इतके उघड धाडस सत्ताधिशांचा वरदहस्त असल्याशिवाय कुणी करणारच नाही असे आता त्या परिसरात उघड बोलले जात आहे.

लाखो रुपयांचा मलिदा चारल्याशिवाय असे काम होणारच नाही असे बोलले जात आहे. पक्के बांधकाम कशाप्रकारे करण्यात आले आहे त्याचा व्हिडीओही सोबत देत आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अनधिकृत बांधकामांची गय केली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. आता समजा कारवाईचा बडगा उचलला तर मालक पावसाचे कारण पुढे करणार हे नक्कीच.. परंतु तेथे कुणीच राहत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणले तर कोर्ट कारवाईस परवानगी देईलच. मात्र महापालिकेचा वकील तगडा हवा, नवा लल्लू नको!!

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू 'आहेरा'सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार...

बाबा सिद्दीकींची हत्त्या दीड एकराच्या भूखंडासाठी?   

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्त्या राजकीय वा टोळीयुद्धाचा प्रकार नसून सर्व काही मुंबईतल्या दीड एकराच्या भूखंडासाठीच झाल्याचा संशय बळावतोय. सांताक्रूझ-अंधेरीच्या (पू.)च्या एका टोकाला असलेल्या साकीनाका विभागातील झोपड्या व छोट्या कारखाने तसेच गॅरेजनी किचाट झालेला सुमारे...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येमागे बिष्णोई गँग की एसआरए? 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर असताना अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या वांद्रे विधानसभा मतदारसंघात गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात येतो ही खरोखरच लाजिरवाणी घटना आहे. त्याहीपेक्षा संतापजनक गोष्ट म्हणजे तपास होण्याआधीच खून...
Skip to content