भारतातील फूड-ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म, झोमॅटोने डिलिव्हरी पार्टनर्सना जीवन वाचवणारी महत्त्वपूर्ण कौशल्ये शिकवण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद घेतली आहे.
सर्वात मोठ्या प्रमाणात प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम एकाच छताखाली एकाच वेळी केल्याचा हा कार्यक्रम मुंबईतल्या नेस्को, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. 4300हून अधिक वितरण भागीदार जगातील सर्वात मोठ्या प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका छताखाली एकत्र आले होते. पोषण भागीदार फीडिंग इंडिया आणि प्रशिक्षण भागीदार मेड्युलन्ससह राफ्ट कॉस्मिकद्वारे प्रायोजित, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश भागीदारांना वैद्यकीय प्रथमोपचार आणि कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशनमध्ये व्यावसायिक आणि प्रमाणित प्रशिक्षण प्रदान करणे हा होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल कुंबळे होते.
कार्यक्रमाबाबत भाष्य करताना, झोमॅटोचे फूड डिलिव्हरीचे सीईओ राकेश रंजन म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत, आमच्या पहिल्या प्रतिसादक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत, आम्ही ४५ शहरांमधील ३ हजारपेक्षा अधिक वितरण भागीदारांना वैद्यकीय मदतीसाठी प्रशिक्षण दिले आहे. आज ४ हजार ३००हून अधिक वितरण भागीदारांची उपस्थिती आमच्या प्रयत्नांना साक्ष देते आणि आमच्या वितरण भागीदार समुदायाचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही डिलिव्हरी व्यावसायिक आणि ते सेवा देत असलेल्या समुदायांच्या फायद्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास वचनबद्ध आहोत.
प्रमुख पाहुणे अनिल कुंबळे यांनी त्यांच्या अनुभवांसह आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितता आणि प्रथमोपचार प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले. कुंबळे यांनी स्वाक्षरी केलेल्या प्रथमोपचार किट आणि विशेष हेल्मेटसह झोमॅटोचे प्रमाणपत्र डिलिव्हरी भागीदारांना देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.
गेल्या काही वर्षांत, झोमॅटोने त्याच्या वितरण भागीदारांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी अनेक मोहिमा सुरू केल्या आहेत. झोमॅटोने आपले अन्न वितरण कार्य सुरू केल्यापासून आतापर्यंत 27000हून अधिक महिला आणि 300हून अधिक शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसह देशातील सर्व राज्यांमधील 2.4 दशलक्ष (24 लाख) गिग कामगारांना उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कंपनी सर्व पात्र वितरण भागीदारांना अपघात विमा आणि रु. 10 लाखांपर्यंतचे कव्हरेज देते.