Saturday, July 6, 2024
Homeमुंबई स्पेशलआज पहाटे बीडीडी...

आज पहाटे बीडीडी चाळ, करी रोड भागात पाणी नाही!

महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कार्यरत राहून ही गळती थोपवून धरली आणि पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत केला आहे. त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात काल गुरुवारी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला गेला. मात्र, या गळती दुरुस्तीचे काम काल रात्री १० वाजता हाती घेण्यात आले आहे. हे काम आज दुपारपर्यंत पूर्ण होईल. परिणामी, आज शुक्रवारी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० दरम्यानचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून २२ मे रोजी रात्री मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. खालच्या बाजूचा लीड जॉइंट पूर्णपणे बाहेर आल्याचे निदर्शनास आले.

पाणी

जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली. सदर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम काल रात्री युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यापूर्वी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात काल दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला गेला आहे.

पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार गळती दुरुस्तीचे काम काल रात्री १० वाजता हाती घेण्यात आले आहे. पाण्याच्या उच्च दाबामुळे व्हॉल्वच्या सांध्यामध्ये शिसे (लीड जॉइंट) ओतणे शक्य नाही. त्यासाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. हे काम आज दुपारपर्यंत पूर्ण होईल. परिणामी शुक्रवारी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाला पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत नियमित दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Continue reading

आनंद घ्या नंदिनी वर्माच्या ‘फ्लो ऑफ लाईफ’चा!

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ लाईफ' हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.

मुंबईत फेरीवाल्यांकडून होत असलेली वीजचोरी उजेडात

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध चाललेल्या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी केलेली वीजचोरी उजेडात आली आहे. विजेच्या खांबांवरून वीजचोरी करणाऱ्या दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना काल पालिकेने अनेक अनधिकृत वीजजोडण्या खंडित...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू मंदिरांचे जतन होणार?

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक...
error: Content is protected !!