मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि नृत्य, यांच्या प्रगत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या कलाकार विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम येत्या शनिवारी, ११ मे आणि रविवारी, १२ मे रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
यात सहभागी होणाऱ्या गायकांना केंद्राचे शिष्यवृत्तीधारक निनाद कुणकवळेकर तबल्याची साथ करणार असून हार्मोनियमची साथ ओमकार अग्निहोत्री यांची असेल. शनिवारी, ११ मे रोजी सकाळी १० वाजता सावनी पारेकर (गुरु – पल्लवी जोशी), अदिश्री पोटे (गुरु – पल्लवी पोटे), प्राजक्ता शेंद्रे (गुरु – पल्लवी जोशी), सावनी गोगटे (गुरु पं. शुभदा पराडकर) यांच्या गायनाचे सादरीकरण होईल तर रविवारी, १२ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य ( गुरु – स्नेहल फाटक- कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितूत – गायन (गुरु- वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर) आपली कला सादर करतील
सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून सर्व युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.