Homeटॉप स्टोरीनारायण राणे पहिले...

नारायण राणे पहिले केंद्रीय सहकार मंत्री?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यता असून त्यांच्याकडे नव्याने तयार करण्यात आलेल्या सहकार खाते सोपविले जाण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांच्याबरोबरच महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांनाही मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी सरकारमधल्या ४३ संभाव्य मंत्र्यांना शपथ देणार आहेत. गेल्या महिन्यापासून पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह, राजनाथ सिंह तसेच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. मोदी यांना त्यांच्यासह जास्तीतजास्त ८१ मंत्री ठेवता येऊ शकतात. सध्या मंत्रिमंडळात ५१ सदस्य होते. काही मंत्र्यांचे निधन झाल्यानंतरही मोदी यांनी त्यांच्या जागी नवीन मंत्री न नेमता त्या खात्यांचा कार्यभार इतर सहकाऱ्यांकडे सोपविला होता. आज ही सर्व कमतरता दूर करताना नव्याने मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाची ही पुनर्रचना करण्याआधीच मंत्रिमंडळातील सदस्य सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आल्याने ते पद रिकामे झाले. आज त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्याशिवाय मंत्रिमंडळातल्या १२ अन्य मंत्र्यांनीही आपापले राजीनामे दिले. प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्ष वर्धन, रतनलाल कटारिया, संतोष गंगवार, रमेश पोखरियाल (निशंक), सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी यांनी आपापले राजीनामे सादर केले आहेत.

मंत्रिमंडळातल्या सात राज्यमंत्र्यांना कॅबिनेट दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. किरेन रिजिजू, जी. किशन रेड्डी, मनसुख मांडवीय, पुरषोत्तम रूपाला, अनुराग ठाकूर व हरदीप पुरी यांच्या नावांचा त्यात समावेश असल्याचे कळते. मंत्रिमंडळात नव्याने दाखल होणाऱ्या नावांमध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, डॉ. भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. पशुपती पारस, अनुप्रिया पटेल, मीनाक्षी लेखी, भूपेंद्र यादव, सर्बानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा यात समावेश असल्याचे कळते.

नव्याने तयार झाले सहकार खाते

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथमच सहकार खाते तयार करण्यात आले आहे. सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सहकारी आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे खाते काम करेल. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना याची घोषणा केली होती. नव्याने तयार झालेल्या या खात्याचा कारभार नारायण राणे यांना दिला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सहकाराचे फार मोठे जाळे आहे. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नियंत्रण आहे. या दोन्ही पक्षांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला येथूनच बळकटी मिळते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी राणे यांचा महाराष्ट्रातला अनुभव उपयोगाला आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आणि खास करून कोकणात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी राणे या खात्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकतील, असे जाणकारांना वाटते.

नारायण राणे यांची कारकीर्द

नारायण राणे ऐन तारूण्यातच शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्यात आले. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर राणे १९९० सालापासून सलग २०१४ सालापर्यंत विधानसभेवर निवडून आले आहेत. १९९६ साली शिवसेना-भाजपा युतीत ते मंत्री होते. महसूल, दुग्धविकास, पशू संवर्धन, मत्स्योद्योग, खारभूमी, विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन अशी विविध खाती त्यांनी सांभाळली. १९९९ साली ते मुख्यमंत्री झाले. १९९९ ते २००५ सालापर्यंत ते विधानसभेत विरोधी पक्षनेता होते.

२००५ साली ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारमध्ये  महसूल व उद्योग खात्याची जबाबदारी पार पाडली. २०१७ साली त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. पुढे तो भाजपात विलीन करून ते भाजपावासी झाले. त्यांनतर त्यांना भाजपाने राज्यसभेवर निवडून आणले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content