मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा केंद्राच्या गोखले सभागृहात नुकताच थाटात पार पडला. दरवर्षीप्रमाणे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमधे विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या ह्रद्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी होत्या शशिकला कैकिणी. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत नीला भागवत, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे, उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक नीरज शिरवईकर, उत्कृष्ट प्रवासवर्णनाच्या पुस्तकाचे लेखक रवि वाळेकर (इजिप्सी या पुस्तकासाठी), उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री वनिता खरात, उत्कृष्ट संगीत नाट्य क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री डॅा. गौरी पंडित, संगीत विशारदच्या परिक्षेत दादर माटुंगा भागातून प्रथम आलेले विद्यार्थी डॅा. प्रबोध चोबे आणि अदिती करंबेळकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
नीला भागवत, इला भाटे, डॅा. चोबे यांनी आवर्जून उल्लेख केला की त्यांचे या संस्थेशी अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याकडून होणारा हृद्य सत्कार आणि पुरस्कार हा आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण आहे. यावेळी ‘नायजेरियावर बोलू काही’ हा नायजेरियाच्या वास्तव्यातील रंजक किस्से सांगणारा मेधा अलकरी यांचा दृक्श्राव्य कार्यक्रमदेखील झाला. त्याला उपस्थितांनी दाद देत आणि प्रश्नोतराच्या माध्यमातून शंकानिरसन करून घेतले. कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन विद्या धामणकर यांनी केले.