Homeटॉप स्टोरीअमित शाहंच्या उपस्थितीत...

अमित शाहंच्या उपस्थितीत गुरूवारी अशोक चव्हाण भाजपात!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसमधील मातब्बर नेते अशोक चव्हाण यांनी आज सकाळी आपल्या आमदारकीचा व त्यापाठोपाठ काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. येत्या गुरूवारी, १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्तावित महाराष्ट्र दौऱ्यात ते आपल्या समर्थक आमदारांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सोपविला. नार्वेकर यांनी लगेचच तो मंजूर केला. यानंतर चव्हाण यांनी समाज माध्यमाद्वारे आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर करत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

चव्हाण

यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. प्रत्येक गोष्टीला कारण असलेच पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेसचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत मी पुढची दिशा ठरवेन. मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मला पक्षांतर्गत कोणत्याही गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असे चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिले हे खरे आहे, पण चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केले आहे. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाने मला मोठे केले असेल तर मीही पक्षासाठी काही कमी केले नाही, असे अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. विरोधी पक्षात असूनही राज्य सरकारने तुमच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी दिला, यावर अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी म्हटले की, मी राज्याचा मंत्री असताना भाजपसहित सर्वपक्षीयांना विकासाच्या कामात मदत केली. मंत्री शेवटी सर्व राज्याचा असतो, एका पक्षाचा नसतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळात मी सर्वांना निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराशी आपण संपर्क केलेला नाही. हा आपला वैयक्तिक निर्णय आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य केले आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकत आहे. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्षे काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटते की मुख्य प्रवाहात यायला हवे. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकेच सांगेन की, आगे आगे देखीए, होता है क्या!, असे फडणवीस म्हणाले.

गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता अशोक चव्हाण यांनी ही भूमिका घेतल्याने महाराष्ट्रात काँग्रेस आणखी खिळखिळा होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Continue reading

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...
Skip to content