आमदार प्रताप सरनाईक यांनी ९ जून रोजी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. वास्तविक ते पत्र त्यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धवजी यांना द्यावे असे अनेकांना वाटत असताना सरनाईक यांनी मुख्यमंत्री सचिवालयात ते पत्र सादर केले. एकतर सर्वप्रथम ही चौकशी व्हायलाच हवी की अशी महत्त्वाची खाजगी पत्रे मुख्यमंत्री सचिवालयातून कशी बाहेर येतात?
उद्या आणखी असे एखादे पत्र बाहेर येऊन थेट मुख्यमंत्री अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे आधी चौकशी व्हायला हवी की हे पत्र बाहेर कसे आले? त्यानंतर सदर पत्र फोडणाऱ्याला योग्य ते शासन व्हावे. अर्थात थेट उद्धव ठाकरे यांनीच जर ते पत्र जाणूनबुजून मीडियासमोर यायला हवे म्हणून फोडण्याचे आदेश दिले असतील तर.. याचा सरळ अर्थ असा की उद्धव ठाकरे यांना प्रताप सरनाईक नकोसे झाले आहेत.
पण ती शक्यतादेखील तशी कमी. कारण, बसताउठता विशेषतः शिवसेना गोटातून मुख्यमंत्री त्या एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे कायम सांगितले जाते. किंबहुना एकनाथ शिंदे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी शिवसेनेतली एक फळी कायम त्यांना बदनाम करण्याचा किंवा ते उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीपासून कसे दूर गेले.. या पद्धतीच्या बातम्या पेरण्यात कायम व्यस्त असते. हेच अनेकदा प्रताप सरनाईक यांच्याही बाबतीत कानावर पडते की उद्धवजी त्यांच्यावर नाराज आहेत.
तेच मिलिंद नार्वेकर यांच्याही बाबतीत घडते. म्हणजे मिलिंद नार्वेकर यांना उद्धव तसेच मातोश्रीवर आता अजिबात स्थान नाही, असे आश्वासक शब्द सहज व कायम ऐकायला मिळत असताना दुसरीकडे मात्र हेच मिलिंद नार्वेकर कसे व केवढे महत्त्वाचे ते आपल्या लक्षात येते. कारण, थेट राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात समेट, मैत्री, घरोबा घडवून आणण्यासाठी याच मिलिंद नार्वेकर यांना राजभवनावर धाडण्यात येते.
हे तर नक्की आहे की मिलिंद आपणहून माननीय राज्यपालांना भेटण्याचा आगाऊपणा नक्की करणार नाहीत. त्यांनी आधी उद्धव यांच्याशी सखोल चर्चा करूनच राज्यपालांना भेटून बाजू मांडण्याची मोठी भूमिका पार पाडलेली असेल. थोडक्यात, या अफवांवर विश्वास ठेवण्यात अजिबात अर्थ नाही. याउलट शिवसेना आणि भाजपा हे कडवे हिंदुत्व मानणाऱ्या या पक्षांत अलीकडे मोठी फूट पाडून, त्यांना नेस्तनाबूत करण्याचे कुभांड काहींनी रचल्याचे आणि त्यादृष्टीने बातम्या पेरण्याचे मोठे काम त्यांच्याच हितशत्रूकडून सुरू आहे.
त्यात मीडियातले काही भामटे सामील असल्याची पण माझी माहिती आहे. अत्यंत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेत सत्तेत असलेल्यांची कायम वाट्यावरून भांडणे होतात किंवा एकमेकांविरोधात कारस्थाने मुद्दाम रचली जातात. त्यामुळे एकमेकांना मातोश्रीवर बदनाम करणे असे तेथे हमखास घडते. त्यातले नेमके काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे याची अत्यंत चतुर अशा उद्धवजींना सुरुवातीपासून म्हणजे ते शिवसेनेत व्यस्त झाल्यापासूनची सवय आहे..
आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठवलेले पत्र म्हणजे त्यांनी स्वतः डोके वापरून खेळलेली खेळी असे अजिबात वाटत नाही. किंबहुना संजय राऊत यांनी त्यांना हा सल्ला दिलेला असल्याची माझी माहिती आहे. अर्थात मनातली अस्वस्थता आणि भीती हा भाग त्या पत्रात खुबीने व्यक्त झाला आहेच. कारण नेते असोत वा अधिकारी, ते इतर कोणत्याही चौकशांना फारसे कधी घाबरताना मी बघितलेले नाही. पण थेट छगन भुजबळ यांनीच या पद्धतीच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटीदरम्यान नक्की सांगितलेले आहे की इतर कोणत्याही चौकशांना तुम्ही न घाबरणे ठीक, पण ईडीच्या भानगडीत कधी पडू नका.
ईडी म्हणजे थेट बांबू, एकदा का घुसला कि निघता निघत नाही. आणि प्रताप सरनाईक व छगन भुजबळ ही मैत्री तशी फार फार जुनी. त्यामुळे ईडीचे मोठे संकट आल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ प्रताप सरनाईक यांना असे पत्र लिहिण्याचा मौलिक सल्ला संजय राऊत यांनी दिलेला दिसतो. आमदार प्रताप सरनाईक तर एकदम लहान माणूस. त्यांच्यासमोर अविनाश भोसले म्हणजे विटीसमोर दांडू.. पण, आयुष्यात पहिल्यांदा छगन भुजबळ किंवा अविनाश भोसले जेथे ईडीच्या चौकशीसमोर हतबल ठरले, काहीसे अस्वस्थ किंवा विचलित झाले तेथे प्रताप सरनाईक घाबरून जाणे अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणून त्यांनी म्हणे एखाद्या महाराजांसारखे प्रकट झाल्यानंतर सामना दैनिकाच्या कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेऊन त्यानंतर उद्धवजींना पत्र लिहिण्याचे धारिष्ट्य दाखवले.
पत्र लांबलचक आहे. पण पत्रात उद्धवजींची मुख्यमंत्री या नात्याने अधिक तारीफ केलेली आहे. त्यानंतर तुम्ही भाजपाशी कसे जुळवून घ्यावे हे सांगितले आहे. प्रताप यांनी पत्रात तसा उल्लेख केला नसला तरी माझी माहिती अशी की जे ईडीचे गंडांतर आज माझ्यावर आलेले आहे एक दिवस ते तुमच्यावर येण्याचीपण अधिक शक्यता आहे. माझी तशी माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे किरीट सोमय्या यांनी त्यापद्धतीने पुरावे जमा करण्याचे मोठे काम हाती घेतले आहे. हा निरोपदेखील प्रताप यांनी ठाकरे यांच्याकडे पोहोचविल्याची माझी माहिती आहे.
या अशा सततच्या कुरघोड्या सध्याच्या दिवसांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आणि हा प्रकार शिवसेनेत अगदी १९९०पासून कायम सतत घडत आला आहे. त्यातूनच तेव्हापासून शिवसेनेत अनेकदा फूट पडली आहे, ज्याची उद्धव यांना आता सवय झालेली आहे. त्यांना हेदेखील माहित आहे की, प्रताप सरनाईक जसे संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे आहेत तसे मेतकूट एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात आहे. त्यातून उद्धव शिवसेनेतल्या या गटबाजीकडे गमतीने बघत असतात. पण, त्यांनी वेळीच सावध व्हावे आणि ठाणे जिल्ह्यातली आजची अत्यंत प्रभावी शिवसेना नजीकच्या काळात खिळखिळी होणार नाही याची काळजी घ्यावी..