मुंबई अग्निशमन दलातील सहा अधिकारी – कर्मचारी यांना माननीय राष्ट्रपती महोदय यांचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक काल जाहीर करण्यात आली. त्यात उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी (परिमंडळ ३) हरिश्चंद्र रघू शेट्टी, विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील, दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्ती कुदळे, प्रमुख अग्निशामक किशोर जयराम म्हात्रे, प्रमुख अग्निशामक मुरलीधर अनाजी आंधळे यांचा समावेश आहे.
“शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग: ” हे ब्रीदवाक्य असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातील ६ जवानांना माननीय राष्ट्रपती महोदय यांचे ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ जाहीर झाले आहे. त्याचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणेः-
१) उप प्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल वसंत परब, हे ३० वर्षे ६ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत ते अग्निशमन दलातील प्रस्ताव विभाग व कार्यशाळेचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
२) उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र रघू शेट्टी हेदेखील मागील ३० वर्षे ६ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. नैसर्गिक आपत्तींसह मानवनिर्मित आपत्तीतदेखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सद्यस्थितीत मरोळ प्रादेशिक समादेश केंद्राचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांना यापूर्वी विविध संस्था – संघटनांकडून गौरविण्यात आले आहे.
३) विभागीय अधिकारी देवेंद्र शिवाजी पाटील हे गत ३२ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत मुंबई अग्निशमन दलातील विभागीय अग्निशमन अधिकारी (प्रशासन) या पदावर कार्यरत आहेत. त्यांना महानगरपालिका आयुक्तांच्या उत्कृष्ट अग्निशामक पारितोषिकाने यापूर्वी तीनवेळा गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र्र शासनानेदेखील त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले आहे.
४) भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी राजाराम निवृत्ती कुदळे हे ३१ वर्षे ४ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांना खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे.
५) प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) किशोर जयराम म्हात्रे हे सध्या दादर अग्निशमन केंद्रात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई अग्निशमन दलात ३२ वर्षे ९ महिने सेवा बजाविली आहे. त्यांनादेखील खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे.
६) विक्रोळी येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) मुरलीधर अनाजी आंधळे हे २७ वर्षे ९ महिने मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांना खाते अंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे.