Homeटॉप स्टोरीमहर्षि वाल्मिकी विमानतळ...

महर्षि वाल्मिकी विमानतळ हाताळणार दरवर्षी 10 लाख प्रवासी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात हा विमानतळ दरवर्षी 10 लाख प्रवाशांना हाताळू शकेल आणि दुसऱ्या टप्प्यानंतर महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ वार्षिक 60 लाख प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असेल.

यानंतर, एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की महर्षी वाल्मिकी यांनी रचलेले रामायण हा ज्ञानाचा मार्ग असून तो आपल्याला श्रीरामाशी जोडतो. आधुनिक भारतातील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला अयोध्या धाम आणि दैवी-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल.

या अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळाच्या (एकीकृत) टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असून हा विमानतळ दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असेल. या एकीकृत (टर्मिनल) इमारतीचा दर्शनी भाग अयोध्येच्या आगामी श्री राम मंदिराच्या वास्तूकलेचे चित्रण दर्शवतो. या एकीकृत (टर्मिनल) इमारतीचा आतील भाग भगवान श्री राम यांचे जीवन चरित्र दर्शविणारी स्थानिक कला, चित्रे आणि भित्तीचित्रे यांनी सजवलेला आहे. अयोध्या विमानतळाच्या एकीकृत (टर्मिनल) इमारतीमध्ये विजेची बचत प्रणाली असलेली छते (इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम), एलईडी प्रकाश योजना, पर्जन्य जल संधारण, कारंजे, लँडस्केपिंग, पाण्यावर प्रक्रिया करणारी सुविधा, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (सीवेज ट्रीटमेंट प्लांट), सौर ऊर्जा यंत्रणा अशा इतर अनेक गृह-5 (GRIHA – 5) मानके वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. या नव्या विमानतळामुळे या प्रदेशातील दळणवळण सुविधेत सुधारणा होईल, ज्यामुळे पर्यटन तसेच व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळून रोजगाराच्या संधीं उपलब्ध होतील.

पंतप्रधानांनी केले अयोध्या धाम जंक्शन रेल्वेस्थानकाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुनर्विकसित अयोध्या रेल्वेस्थानकाचेही उद्घाटन केले आणि नव्या अमृत भारत रेल्वेगाड्या आणि वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी इतर अनेक रेल्वे प्रकल्पांचेदेखील लोकार्पण केले. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की अयोध्या धाम रेल्वेस्थानक दररोज 10 हजार लोकांची हाताळणी करू शकते आणि त्याचा पुनर्विकास पूर्ण झाल्यावर त्याची क्षमता आता 60,000पर्यंत पोहोचणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी वंदे भारत आणि नमो भारत या रेल्वेगाड्यांनंतर सुरू होत असलेल्या ‘अमृत भारत’ या नव्या रेल्वेगाड्यांच्या मालिकेबद्दल माहिती दिली. त्यांनी उत्तर प्रदेश दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकच्या जनतेचे या रेल्वेगाड्या मिळत असल्याबद्दल अभिनंदन केले.

ज्या लोकांना बऱ्याचदा आपल्या कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागतो आणि ज्या लोकांचे तितक्या प्रमाणात उत्पन्न नसते अशा लोकांनादेखील आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. वारसास्थळांच्या विकासामध्ये वंदे भारत ट्रेन बजावत असलेली भूमिकादेखील पंतप्रधानांनी अधोरेखित केली. देशाची पहिली वंदे भारत ट्रेन काशीमधून धावली. आज वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्या देशातील 34 मार्गांवर धावत आहेत. वंदे भारत काशी, उज्जैन, कटरा, पुष्कर, तिरुपती, शिर्डी, अमृतसर, मदुराई अशा भाविकांच्या प्रत्येक मोठ्या तीर्थस्थानाला जोडत आहेत, असे ते म्हणाले. या मालिकेत आज अयोध्येलादेखील वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

अयोध्या धाम जंक्शन रेल्वेस्थानक म्हणून ओळखला जाणारा अयोध्या रेल्वेस्थानकाचा पहिला टप्पा 240 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. या तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानकात लिफ्ट, सरकते जिने, फूड प्लाझा, पूजा सामग्रीची दुकाने, स्वच्छता गृहे, बालकांची काळजी घेण्यासाठी कक्ष, प्रतीक्षालय यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत. या रेल्वेस्थानकाची इमारत सर्वांना वापरण्यासाठी उपलब्ध आहे आणि आयजीबीसी प्रमाणित हरित स्थानक इमारत आहे. 

अयोध्या धाम जंक्शन रेल्वेस्थानकावरील कार्यक्रमात पंतप्रधानांनी नव्या प्रकारची सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे गाडी अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. अमृत भारत रेल्वे गाडी ही एलएचबी पुश-पुल तंत्रज्ञानावर आधारित असलेली बिगर वातानुकूलित डबे असलेली गाडी आहे. या गाडीमध्ये दोन्ही बाजूला इंजिन असून त्यामुळे तिला अधिक गती प्राप्त होते. रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय आकर्षक आणि सुंदर रचना करण्यात आलेली आसने, सामानाचे चांगले रॅक, मोबाईल होल्डरसह मोबाईल चार्जिंग पॉइंट, एलईडी दिवे, पब्लिक इन्फर्मेशन सिस्टिम अशा सुविधा या गाडीमध्ये आहेत.

दरभंगा-अयोध्या-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्स्प्रेस आणि मालदा टाऊन- सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनस (बंगळूरु) अमृत भारत एक्स्प्रेस या दोन नव्या अमृत भारत रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांनी रवाना केले. यावेळी पंतप्रधानांनी अमृत ट्रेनच्या उद्घाटनाच्या प्रवासात शालेय विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधला. पंतप्रधानांनी सहा नव्या वंदे भारत ट्रेननाही रवाना केले. यामध्ये माता वैष्णोदेवी कटरा – न्यू दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, अमृतसर दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, कोईंबतूर बंगळूरू कॅन्ट वंदे भारत एक्स्प्रेस, मंगलोर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आणि अयोध्या आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी यावेळी या भागातील रेल्वे पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या 2300 कोटी रुपयांच्या तीन रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रुमा चाकेरी- चंदेरी तिसरी मार्गिका, जौनपूर-तुलसी नगर, अकबरपूर अयोध्या, सोहावाल-पतरंगा आणि जौनपूर बाराबंकी दुहेरीकरण प्रकल्पाचा सफदरजंग-रसौली विभाग आणि मलहौर-दालिगंज रेल्वे सेक्शन प्रकल्पाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण यांचा समावेश आहे.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content