Skip to content
Wednesday, January 22, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटसुवर्ण मयूर पुरस्कारासाठी...

सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी 15 चित्रपटांमध्ये चुरस!

गोव्यात सुरू असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर, या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी 15 निवडक चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय तर तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

चित्रपट निर्मितीतील  उत्कृष्टतेला दाद देणारा सुवर्ण मयूर पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित चित्रपट सन्मानांपैकी एक आहे. या वर्षीच्या ज्युरीमध्ये स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन, फ्रेंच चित्रपट निर्माते जेरोम पेलार्ड आणि कॅथरीन दुसार्ट, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्या हेलन लीक यांच्यासह बनलेल्या ज्युरी पॅनेलचे अध्यक्ष प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आहेत. 

या स्पर्धेत यावेळचे चित्रपट आहेत-

1. वुमन ऑफ (मूळ नाव- कोबिटा झेड)

वुमन ऑफ हा 2023चा पोलिश-स्वीडिश नाट्यमय चित्रपट आहे जो माल्गोरझाटा स्झुमोव्स्का आणि मायकेल एंगलर्ट यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. यातील नाट्य साम्यवादातून भांडवलशाहीकडे पोलंडच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे चित्रण आहे.

2. द अदर विडो (मूळ नाव- पिलेगेश)

इस्रायली दिग्दर्शक मायान रीप या चित्रपटाद्वारे पदार्पण करत असून आधुनिक अविवाहित महिलेची गडद, विनोदी झालर असलेली कथा आहे. एला 34 वर्षांची थिएटर वेशभूषाकार आणि शिक्षिका आहे, तिच्या प्रियकराचा अचानक मृत्यू होतो. ती त्याच्या शिवाह (ज्यू लोकांचे शोकविधी) वारंवार करू लागते आणि तिच्यासाठी निषिद्ध असलेले जीवन जगते. शोक करण्याची गरज अधूनमधून जागृत होते. शेवटी ती शोक करण्याचा तिचा न्याय्यहक्क मागते.

3. द पार्टी ऑफ फूल्स (मूळ नाव- कॅप्टिव्ज)

अरनॉड देस पॅलिएर्स दिग्दर्शित “पार्टी ऑफ फूल्स” ही स्त्रीच्या एकजुटीची कथा आहे, ज्यात अशा स्त्रीचे चित्रण आहे जी नियतीने न आखलेल्या नशिबाची स्वप्ने पाहते. आपल्या इच्छेविरुद्ध अन्यायकारकपणे ‘पार्टी ऑफ फूल्स’मध्ये प्रवेश घेतलेल्या इतर स्त्रियांपेक्षा फॅन्नी वेगळी आहे. ती स्वेच्छेने येथे आली आहे. आईचा शोध घेणे आणि एकत्र सुटून बाहेर जाणे हे तिचे एकमेव ध्येय आहे. या फ्रेंच चित्रपटाची निर्मिती फिलिप रौसेलेट आणि जोनाथन ब्लुमेंटल यांची आहे.

4. मेजर्स ऑफ मेन (मूळ नाव- डेर वर्मेसेन मेन्श)

जर्मन दिग्दर्शक लार्स क्रौमे यांनी 19व्या शतकातील बर्लिनमधील हेरेरो आणि नामा जमातींच्या नरसंहारावर एक थरारक चित्रपट बनवला आहे. जर्मन वांशशास्त्रज्ञ अलेक्झांडर हॉफमन बर्लिन एथनॉलॉजिकल म्युझियमसाठी कला साहित्य आणि कवट्या गोळा करण्यासाठी पूर्वीची वसाहत “जर्मन दक्षिण-पश्चिम आफ्रिका (आता नामिबिया)” मध्ये प्रवास करतात आणि जर्मनीच्या इतिहासात श्वेत वर्चस्वाला विरोध करण्यात अयशस्वी होऊन करिअरच्या लाभासाठी हळूहळू आपली नैतिकता गमावू लागतात.

5. लुबो

लुबो हा जियोर्जिओ दिरिट्टी दिग्दर्शित 2023चा इटालियन-स्विस नाट्यमय चित्रपट आहे. लुबो हा एक भटक्या, बसकर आहे ज्याला 1939मध्ये जर्मन आक्रमणाच्या जोखमीपासून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी स्विस सैन्यात बोलावण्यात आले होते. थोड्याच वेळात त्याला कळते की त्यांच्या लहान मुलांना घेऊन जाण्यापासून लिंगभेदांना रोखण्याच्या प्रयत्नात त्याची पत्नी मरण पावली आहे. लुबोला माहित आहे की जोपर्यंत तो त्याच्या मुलांना परत मिळवून देत नाही आणि त्याला आणि त्याच्या सारख्या इतरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याला कधीही शांती मिळणार नाही.

6. हॉफमन्स फेरीटेल्स (मूळ नाव- स्काझकी गोफमाना)

हा चित्रपट जॉर्जियन वंशाच्या रशियन दिग्दर्शिका टीना बरकालाया यांनी दिग्दर्शित केला आहे. 2000च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ यात दाखवला आहे. सोव्हिएत युगाचा पाश्चिमात्य विडंबनात अंत होत असताना, हा चित्रपट नाडेझदा भोवती फिरतो जी व्हिटालीबरोबर विवाहबंधनात अडकलेली एक भयभीत महिला आहे, जिचे तो अपार्टमेंटसाठी शोषण करतो. मात्र नंतर ती आपल्या जीवनाला आकार देत एक लोकप्रिय मॉडेल म्हणून उदयाला येते.

7. एंडलेस बॉर्डर्स (मूळ नाव- मरझाये बाय पायन)

अब्बास अमिनी दिग्दर्शित एंडलेस बॉर्डर्स हा एक खिळवून ठेवणारा सिनेमा आहे ज्यामध्ये अक्षरशः सर्वत्र धोका आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या उदयाने भटक्या जमातीय आणि जनजाती दरम्यानच्या युद्धाची आग पुन्हा प्रज्वलित केली. अहमद, एक निर्वासित इराणी शिक्षक आहे, ज्याची अफगाणिस्तानमधील हजारा कुटुंबाशी ओळख होते आणि त्याला या प्रदेशातील पूर्वग्रह आणि कट्टरतेचा खरा चेहरा दिसतो. निषिद्ध प्रेम त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यात प्रेम आणि शौर्याचा अभाव शोधायला भाग पाडते.

8. डाय बिफोर डेथ (मूळ नाव- उमरी प्रिजे स्म्र्ती)

हा चित्रपट अहमद इमामोविक (बोस्निया आणि हर्झेगोविना) यांनी दिग्दर्शित केला आहे. सुंदर स्त्रीरोगतज्ज्ञ झ्लाटनला गंभीर आजार होतो आणि त्याच्याकडे अगदी कमी वेळ शिल्लक असतो. त्याने केलेल्या गर्भपाताची ही शिक्षा आहे याची खात्री पटल्याने तो त्याच्या संघर्षांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवासाला निघतो. शेवटी मृत्यूवर जीवनाचा विजय होतो, एक मूल जन्माला येते कारण झ्लाटन एक अद्याप जन्माला न आलेला जीव वाचवतो.

9. बोस्नियन पॉट (मूळ नाव- बोसान्स्की लोनाक)

क्रोएशियन दिग्दर्शक पावो मारिन्कोविच त्यांच्या उत्कृष्ट निर्मितीसह इफ्फीमध्ये परतले आहेत. ऑस्ट्रियामध्ये राहणार्‍या एका बोस्नियन लेखकाची ही कथा आहे ज्याला इमिग्रेशनचे कठोर नियम आणि स्वतःच्या निष्काळजीपणामुळे अचानक निवासी परवान्याशिवाय सोडले जाते. हद्दपार न होण्यासाठी, फारुकने ऑस्ट्रियन समाजासाठी सांस्कृतिक योगदान दिल्याचे अधिकाऱ्यांना सिद्ध करायचे असते. अनिच्छेने फारुक नाटकाकडे परत वळल्यामुळे पुढले साहस त्याचे जीवन बदलून टाकते आणि त्याला खरोखर महत्त्वाचे काय आहे हे समजण्यास भाग पाडते.

10. ब्लागा’ज लेसन्स (मूळ नाव- उरोतसीते ना ब्लागा)

अनेक पुरस्कार विजेते चित्रपट आणि माहितीपट बनवणारे बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमांडारेव्ह हे ब्लागा’ज लेसन्स घेऊन इफ्फीमध्ये येत आहेत. ब्लागा ही सत्तर वर्षांची नुकतीच विधवा झालेली माजी शिक्षिका आणि ठोस मूल्ये असलेली स्त्री आहे.जेव्हा पतीच्या थडग्यासाठी वाचवलेल्या पैशांसाठी टेलिफोन घोटाळेबाज तिला फसवतात, तेव्हा ती तिची नैतिक मूल्ये हळूहळू गमावू लागते आणि ती स्वत: एक घोटाळेबाज बनते.

11. असोग

सिआन डेव्हलीन हा पहिल्या पिढीतील फिलिपिनी-चिनी-आयरिश कॅनेडियन चित्रपट निर्माता आणि विनोदी कलाकार आहे. असोग ही अनोखी कथा आहे, ज्यात 40 वर्षीय नॉन-बायनरी शिक्षक आणि वादळातून वाचलेला रे प्रसिद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. अतिवास्तव कॉमेडी आणि सामाजिक वास्तव चित्रित करणारे चित्रपट निर्माते सिआन डेव्हलिन हवामान बदल, एलजीबीटीक्यू समस्याचा शोध घेतात.

12. आंद्रागोगी (मूळ नाव- बुडी पेकेर्ति)

आंद्रागोगी हा 2023चा नाट्यमय चित्रपट व्रेगास भानुतेजा यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शा ईने फेब्रियंती ही शाळेतील शिक्षिकेच्या भूमिकेत आहेत जिचा वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधातील संघर्षाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिची प्रतिष्ठा आणि करिअरच्या संधी धोक्यात आल्या आहेत.

13. कंतारा (2022)

ऋषभ शेट्टी हा कन्नड चित्रपट उद्योगातील अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्याचा समीक्षकांनी प्रशंसा केलेला ब्लॉकबस्टर, ‘कंतारा’ दक्षिण कन्नड जिल्ह्यातील काल्पनिक गावात चित्रित केला आहे. हा चित्रपट मानव आणि निसर्ग यांच्यातील वैचारिक संघर्षाचा शोध घेतो. जंगलासोबत राहणाऱ्या जमातीच्या सह-अस्तित्वाला वनअधिकाऱ्यामुळे बाधा येते, ज्याला असे वाटते की या जमाती पाळत असलेल्या काही प्रथा आणि रीतिरिवाज यामुळे निसर्गाला धोका निर्माण झाला आहे. मुख्य पात्र शिवा त्याचे अस्तित्त्व राखत गावातील शांतता आणि एकोपा पुन्हा प्रस्थापित करू शकेल का हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

14. सना (2023)

सुधांशू सारिया हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आहेत. ‘लव्ह’ नावाच्या विचित्र रोड-ट्रिप रोमान्सद्वारे त्याने चित्रपटात पदार्पण केले ज्याची चित्रपट महोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली. या चित्रपटात, मुंबईत काम करणारी 28 वर्षीय आर्थिक सल्लागार सना हिला ती  गर्भवती असल्याचे समजते. गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या तिच्या निर्णयावर ती ठाम आहे, गर्भपात करण्याची वास्तविक प्रक्रिया सनाला तिच्या जीवनाचे पुनर्मूल्यांकन करण्यास भाग पाडते आणि तिने घेतलेला निर्णय खरोखरच तिचा स्वत: चा आहे  का याचा सखोल विचार करते.

15. मिरबीन (2023)

मीरबीन, मृदुल गुप्ताद्वारा दिग्दर्शित आणि धनिराम टिसो द्वारा निर्मित कार्बी चित्रपट फीचर फिल्म श्रेणीमध्ये निवडण्यात आला असून प्रतिष्ठित महोत्सवात स्थान मिळविणारा आसाममधील एकमेव चित्रपट आहे.

मीरबीन हे या कथेचे मध्यवर्ती पात्र आहे. तिच्या बालपणी तिची आजी तिच्या मनात सर्दीहुन (कार्बी आदिवासी समजुतींमधील कापडाचा देव)च्या परीकथांप्रमाणे काहीतरी करण्याचे स्वप्न रुजवते, ज्यामुळे तिच्या मनात जीवन अर्थपूर्ण बनवण्याची इच्छा निर्माण होते. मात्र 2005मध्ये भ्रातृहत्या आणि जातीय संघर्षांमुळे संपूर्ण कार्बी भूमी रक्तरंजित झाली आणि तिचा जीवही धोक्यात आला.

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...