Wednesday, January 15, 2025
Homeमुंबई स्पेशलडिलाईल पुलाच्या पोहोच...

डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्यांचे उद्या लोकार्पण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण प्रभाग अंतर्गत ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळ येथील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्यांचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे भूमिपूजन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची या समारंभास प्रमुख उपस्थिती असणार आहे.

स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, आमदार आशीष शेलार यांच्यासह आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह यांनाही सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू असतील. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, पूल विभागाचे प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर आदी मान्यवरांचीही उपस्थिती असेल.

डिलाईल पुलामुळे प्रवास होणार सुखकर

ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल पुलामध्ये दोन्ही दिशेने प्रत्येकी तीन मार्गिका तर गणपतराव कदम मार्गावर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. जुन्या पुलाच्या तुलनेत गणपतराव कदम मार्ग आणि ना. म. जोशी मार्गावर अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. नवीन बांधण्यात आलेल्या पुलामध्ये ४ नवीन जिने बांधण्यात येणार आहेत. तसेच २ सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. सेवा मार्गांची रूंदी वाढल्यामुळे तसेच पुलाखालील मोकळ्या जागेमुळे पादचाऱ्यांची वहिवाट पूर्वीपेक्षा जास्त सुरळीत होणार आहे.

 डिलाईल

डिलाईल पुलाच्या बांधणीमध्ये रेल्वे परिसराला जोडून असणारे ना. म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर स्थापित करण्याचे काम ऑगस्ट २०२३ महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठच मास्टिक, रॅम्प, कॉंक्रिटीकरण, पथदिव्याची, सिग्नल यंत्रणा आदी कामे हाती घेण्यात आली होती. रोमन लिपीतील ‘टी’ आकारात असलेल्या डिलाईल पुलाच्या लोअर परळ स्थानकाच्या पश्चिम दिशेची गणपतराव कदम मार्ग ते ना. म. जोशी मार्ग असा वाहतुकीचा पर्याय देणारी बाजू याआधीच (जून २०२३) महिन्यात खुली करण्यात आली होती. डिलाईल पुलाच्या एका मार्गिकेचे काम दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले. व ती मार्गिका दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. दुसरी मार्गिकादेखील पूर्ण झाल्याने उद्या गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ पासून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होत आहे.

लोअर परळ पुलाची पूरक माहिती 

१. आयआयटी मुंबईच्या अहवालानंतर पश्चिम रेल्वेने हा पूल वाहतुकीसाठी जुलै २०१८मध्ये बंद केला.

२. फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे भागातील बांधकाम निष्कासित करण्यात आले.

३. पश्चिम रेल्वेच्या भागात सप्टेंबर २०१९मध्ये कामाला सुरूवात.

४. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कामाला फेब्रुवारी २०२०मध्ये सुरुवात.

५. पश्चिम रेल्वेमार्फत करीरोडच्या पोहोच रस्त्याच्या दिशेने गर्डर स्थापित करण्याच्या कामाला सुरूवात.

६. जून २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेमार्फत पहिला गर्डर स्थापन करण्यात आला.

७. ऑक्टोबर २०२२ मध्ये पश्चिम रेल्वेमार्फत दुसरा गर्डर टाकण्यात आला.

प्रकल्पातील आव्हाने 

लोअर परळ पूलाच्या पुनर्बांधणीच्या कामात ९० मीटर लांबीचे आणि ११०० टन वजनाचे दोन गर्डर हे पश्चिम रेल्वेच्या रूळांवर स्थापित करणे हे संपूर्ण प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हानाचे काम होते. त्यानंतर दक्षिण दिशेकडील भाग हा तोडकामासाठी ऑक्टोबर २०२२मध्ये महानगरपालिकेकडे सोपविण्यात आला. पश्चिम रेल्वेने याठिकाणी २२ जून २०२२ रोजी पहिला स्टील गर्डर तर दुसरा गर्डर ऑक्टोबर २०२२ मध्ये स्थापित केला. कोविडच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत पुलाचे काम सातत्याने सुरू राहण्यासाठी पूल विभागाच्या चमूने मेहनत घेतली. ऑक्सिजनचा तुटवडा, रेल्वेच्या भागातील कामामध्ये येणारी आव्हाने अशा अनेक अडथळ्यांचा सामना करत या पुलाचे काम वेगाने सुरू राहील यासाठी पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व अभियंत्यांनी मेहनत घेतली. पश्चिम रेल्वेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत पश्चिम रेल्वे रूळांवर सुमारे ११०० टन वजनाचे ९० मीटर लांबीचे दोन ओपन वेब गर्डर स्थापित करण्यात आले आहेत.

एन. एम. जोशी मार्ग गणपतराव कदम मार्ग दरम्यानची मार्गिका १ जून २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तर पूर्व पश्चिम एक मार्गिकेचा पर्याय १७ सप्टेंबर २०२३ पासून खुला करून देण्यात आला. तर दुसऱ्या मार्गिकेचा पर्याय उद्या, २३ नोव्हेंबर २०२३ पासून वाहनचालकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content