Sunday, September 8, 2024
Homeटॉप स्टोरीयंदाचा गानसम्राज्ञी लता...

यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकर यांना जाहीर

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे.

गानसम्राज्ञी

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असून राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे यासाठी तत्पर असल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

गानसम्राज्ञी

घोषित झालेल्या पुरस्कारांचा तपशील पुढीलप्रमाणे-

२०२३चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2022 पुरस्कारासाठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असून, 2023च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना) मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीतक्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराच्या 2022 साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर 2023 साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2022चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला असून, 2023च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे. ज्या कलाकारांनी संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान दिले आहे त्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये दोन वर्षांचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाटक विभागासाठी 2022चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर 2023चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2022चा पुरस्कार मोरेश्वर निस्ताने यांना जाहीर झाला असून, 23चा पुरस्कार ऋषिकेश बोडस यांना जाहीर झाला आहे. कंठ संगीत प्रकारातील 2022चा पुरस्कार अपर्णा मयेकर यांना घोषित झाला असून, 2023चा पुरस्कार रघुनंदन पणशीकर यांना मिळाला आहे.

लोककला क्षेत्रातील 2022चा पुरस्कार हिरालाल सहारे यांना जाहीर झाला असून, 2023चा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहिरी क्षेत्रातील 2022चा पुरस्कार जयंत रणदिवे यांना तर, 2023चा पुरस्कार राजू राऊत यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील 2022चा पुरस्कार लता सुरेंद्र यांना जाहीर झाला असून, 2023साठी सदानंद राणे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी 2022चा पुरस्कार चेतन दळवी यांना तर, 2023चा पुरस्कार निशिगंधा वाड यांना घोषित झाला आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2022चा  पुरस्कार संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी यांना जाहीर झाला असून, 2023चा पुरस्कार अमृत महाराज जोशी यांना घोषित झाला आहे.

वाद्य संगीत क्षेत्रातील 2022चा पुरस्कार पं. अनंत केमकर यांना मिळाला असून, 2023साठी शशिकांत सुरेश भोसले यांची घोषणा झाली आहे. कलादान या प्रकारासाठी 2022साठी संगीता राजेंद्र टेकाडे यांचे नाव घोषित झाले आहे तर, 2023साठी यशवंत तेंडोलकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) यांना तर, 2023चा पुरस्कार उमा खुडे यांना घोषित झाला आहे. आदिवासी  गिरीजन वर्गवारीमध्ये 2022साठी भिकल्या धिंडा तर, 2023साठी सुरेश रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ

सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी विविध पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पंणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लक्ष रुपये होती, ती यापुढे दहा लक्ष रुपये होईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची जी एक लाखाची रक्कम होती ती रक्कम तीन लाखांची करण्यात येत आहे असेही त्यांनी जाहीर केले.

राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या क्षेत्रामधील व पुरस्कारांमधील वाढ

सध्या ५० वर्षे वयावरील पुरुष कलाकारांना व 40 वर्षांवरील महीला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत 12 विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. यापुढे पन्नास वर्षांवरील पुरुष आणि महिला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या सध्याच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यात येत असून, ही क्षेत्रे 24 करण्यात आलेली आहेत. वाढ करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार, लोकनृत्य, लावणी / संगीतबारी, भारुड / गवळण  / विधेनाट्य, वाद्यनिर्मिती करणारे कलाकार, झाडीपट्टी / खडीगंमत / दंडार, दशावतार / नमन खेळे / वही गायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणाऱ्या व त्यांचे जतन वहन संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय / संस्था, ध्वनी तंत्रज्ञ / संकलक, संगीत संयोजक, वाईस ओवर आर्टिस्ट / निवेदक अशा विविध बारा क्षेत्राची वाढ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये करण्यात आली आहे. या पुरस्काराची रक्कमही तीन लक्ष रुपये असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

युवा पुरस्कार

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत युवक कलाकारांसाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी अशी अनेक संघटनांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील संग्रहालय वगळता इतर सर्व २३ क्षेत्रांमध्ये युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी वयाची मर्यादा 25 ते 50 एव्हढी राहणार असून, या पुरस्कारांची रक्कम एक लक्ष एवढी असेल.

निवड प्रक्रियेसाठी समिती

उपरोक्त सर्व प्रकारच्या पुरस्कारासाठी निवड समितीची निवड समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या निवड समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुंनगंटीवार असून त्यामध्ये प्रधान सचिव विकास खारगे व इतर नामवंत अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे सचिव संचालक, सांस्कृतिक कार्य आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या शिफारसी व सदस्यांनी सुचवलेल्या शिफारसी यामधून पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content