कोविड-19मुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर आयुष आधारित दृष्टीकोन आणि उपाय सुचवणारी समर्पित सामुदायिक सहाय्यता हेल्पलाईन केंद्रीय आयुष मंत्रालयाने कार्यान्वित केली आहे. 14443 असा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे. संपूर्ण देशभरात आठवड्यातले सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही हेल्पलाईन सुरू राहील.
14443 या हेल्पलाईनद्वारे आयुष म्हणजेच आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, युनानी आणि सिद्ध या विविध उपचार पद्धतीमधले तज्ज्ञ, जनतेचे प्रश्न आणि शंकांचे समाधान करतील. हे तज्ज्ञ मार्गदर्शन आणि उपचार सुचवण्याबरोबरच जवळच्या आयुष सुविधाबाबतही मार्गदर्शन करणार आहेत.
कोविड-19 पश्चात काळजी आणि व्यवस्थापन याबाबतही हे तज्ज्ञ माहिती देतील. आयव्हीआर सुसज्ज असलेली ही हेल्पलाईन सध्या हिंदी आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. येत्या काळात ती इतर भाषातही उपलब्ध होईल. या हेल्पलाईनवर एकाचवेळी 100 कॉल घेता येतील. आवश्यकतेनुसार भविष्यात ही क्षमता वाढवण्यात येईल.
या हेल्पलाईनच्या माध्यमातून, कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांना हातभार लावण्याचा आयुष मंत्रालयाचा उद्देश आहे. स्टेप वन या स्वयंसेवी प्रकल्पाचे सहाय्य यासाठी लाभले आहे.