Friday, November 22, 2024
Homeमाय व्हॉईसठाण्यात बाईकवाल्यांची पोलीसदादाशी...

ठाण्यात बाईकवाल्यांची पोलीसदादाशी हुज्जत!

आठवडाअखेरच्या लॉकडाऊनला ठाण्यात, ठाणे शहरात कसा काय प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सर्व खबरदारी घेऊन घराबाहेर पडलो. रस्त्यावर पाहिले तर सर्व दुकाने इमानदारीत बंद होती. फक्त औषध, अन्नधान्य आणि दुधाची दुकाने उघडी दिसली. गॅरेज आणि पंक्चर काढणाऱ्या दुकानांची शटर्स बंद होती. पण, त्यांचे एक-दोन कारागीर ग्राहकांच्या सेवेसाठी हजर होते.

ढोकाली नाका परिसरातील एकविरा मंदिरावरून जाणाऱ्या रोडवरही शुकशुकाट होता. तेथेही औषध आणि दुधाची दुकाने उघडी होती.  कापूरबावडी व माजीवडा परिसर एरवी खूपच गजबजलेला असतो. गेल्या रविवारी बऱ्यापैकी वर्दळ होती. विशेष म्हणजे पोलिसांची गाडी आज सकाळपासूनच फिरून लॉकडाऊनची घोषणा करत होती. ढोकाली परिसरात तसेच कोलशेत रोडवर फेरीवाल्यांनी गाडी लावायचा प्रयत्न करताच त्याला झापले होते. एक बिडी-सिगरेटवालाही आगाऊपणा करण्याच्या बेतात होता. परंतु पोलिसांच्या आवाजनेच त्याचा उत्साह कुठल्याकुठे पळून गेला.

गोकुळ नगर, मुक्ताई नगर परिसरातही शुकशुकाट होता. चहाची एकही टपरी उघडी दिसली नाही. मीनाताई चौकातही शांतता होती. नेहमी गजबजलेला परिसर म्हणून ओळख असलेला कोर्ट नाका परिसर जणू निपचित पडला होता. ना कुठला काळा कोट, ना कुठला नेता. सर्व गुडूप!

कोर्टनाका रोड तर बॅरिकेड टाकून बंद केलेला दिसला. कदाचित रस्त्याचे काम चालू असावे. तेथून पुढे तलावपाली परिसराजवळ येताच काही बाईकवाले तरुण वाहतूक पोलीसदादांशी हुज्जत घालताना दिसले. विशेष म्हणजे एकाही बाईकवाल्याकडे हेल्मेट नव्हते. सर्वजण सुशिक्षित होते. पहिल्यांदा त्यांनी आम्हाला काही माहीत नव्हते.. हा सूर आळवला. पण दादा काही बघत नव्हता. नंतर आम्हाला रुग्णाला बघायला जायचे आहे, भाजी घ्यायची आहे, आमचे नातेवाईक ठाणे स्थानकात येणार आहेत, आदी अनेक पुड्या बाईकवाल्यांनी सोडल्या. परंतु, काहीच परिणाम झाला नाही.

ठाण्यात

शेवटी हुकमी एक्का म्हणजे राजकीय नेत्याची ओळख सांगण्याचाही केविलवाणा प्रताप पाहिला. एका- दोघांनी नेत्यांना फोन लावण्याचा प्रयत्नही केला. मग मात्र सर्वांचाच चेहरा पाहण्यासारखा झाला. आवाज चढवले गेले. एक-दोघांकडे तर लायसन्सही नव्हते. अखेर भक्कम दंड आकारून त्या सर्वांची घरी पाठवणी केली गेली. घरातील ज्येष्ठ मंडळींनी घरातील युवकांना लॉकडाऊनमध्ये उगाचच बाईक घेऊन बाहेर जाऊ नका असे खडसावले पाहिजे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आज बाईक घेऊन घरी पाठवले. येत्या आठवड्यापासून बाईक जप्त केली जाईल आणि चार-पाच दिवसांनी हमीपत्र घेऊन परत केली जाईल, अशी पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली.

ठाणे रेल्वेस्थानक परिसर आणि नौपाडा गोखले रोड तर कमालीचे शांत होते. रेल्वेस्थानक परिसर तर कधी नव्हे इतका शांत आणि जवळजवळ निर्मनुष्य होता. रिक्षावाल्यांचे ते रोजचे आवाज- माजीवडा.. माजीवडा.. कापूरबावडी.. आनंद नगर.. चेक नाका.. वगैरे काहीच कानांवर आदळत नव्हते. अनेक रिक्षावाले तर वाहतूक पोलीस चौकीसमोरच चेकाळून आवाज काढत असतात. रिक्षा रांगेचे तर नेहमीच बारा वाजलेले असतात. रांग मोडून मनाला वाटेल तशा  रिक्षा उभ्या केल्या जातात आणि समस्त ठाणेकर आणि पोलीस हे मुकाट्याने पाहात असतात. या रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर अशा चेकाळून घोषणा देता येतील का? याचा ठाणेकरांनी गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते.

रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या मॅकडोनाल्ड परिसरात तर कोरोनाचे नियम धुडकावून अनेक प्रवासी रिक्षात घेतले जातात, हे समस्त ठाणेकर रोज उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. रेल्वेस्थानकात प्रवेश करताच आश्चर्य वाटले की, रविवार असून भरदुपारी नेहमीच प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असलेल्या ठाणे स्थानकात अत्यंत कमी प्रवासी गाडीच्या प्रतीक्षेत होते. तिकिटे देत असतानाच छाननी होत असल्याने प्रवाशांचे प्रमाण कमी होते.

स्थानक परिसरातील फेरीवालेही गायब होते. एक दोन आगाऊ पट्टेवाले मात्र पोलिसांना आजमावण्यासाठी उभे होते. हे जाणवले दोन-तीन तासांत. एक मात्र प्रकर्षाने जाणवले की, आज मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची संख्या फारच कमी होती. वर्तक नगर, हिरानंदानी मेडोज,  मानपाडा.. दोन्ही बाजूला अनेक दुकाने बंद होती. छोटी गॅरेजस मात्र अर्धवट उघडी होती. फारच कमी हॉटेल्सनी पार्सल सेवा चालू ठेवली होती. पार्सल सेवा सुरू ठेवून एका कर्मचाऱ्याचाही पगार निघत नाही म्हणून आम्ही हॉटेल्स बंदच ठेवली आहेत, असे हॉटेलिअर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. एकूण आजचा लॉकडाऊन बहुतांशी यशस्वी झाला, असेच म्हणावे लागेल!

Continue reading

प्रचारसभा की बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावर आधारीत अपशब्दांची मालिका?

येत्या बुधवारी आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे.अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर काय लिहिणार हा खरं तर यक्षप्रश्न आहे. सुमारे दहा-बारा प्रमुख राजकीय पक्ष गेले तीन-चार महिने राज्य घुसळून काढत आहेत. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे, वचननामे वेगळे....

बाबा सिद्दीकी हत्त्या प्रकरणात पोलिसांचे घूमजाव?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येस एक महिना पूर्ण होत असताना पोलिसांनी अचानक घुमजाव केल्याचे दिसतंय! कालच पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, "सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी पकडलेल्या संशयिताच्या...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी पोलीस अजूनही शक्यतेवरच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येला आज १५ दिवस पूर्ण होत असतानाच पोलीस मात्र अद्यापी विविध शक्यतांचीच पडताळणी करत असल्याचे दिसत आहे. वांद्रे खेरवाडी येथे बाबांची हत्त्या झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पोलीस सर्वत्र 'सुपारी'चा अँगल सांगत आहेत...
Skip to content