Sunday, November 10, 2024
Homeडेली पल्सपरमबीरः त्यांनी काय...

परमबीरः त्यांनी काय चिंचोके गोळा केले?

काल परमबीर यांच्या लेटर बॉम्बचा आढावा घेतला होता. आठ पानांमधील 23 मुद्द्यांचा किस काढताना डोक्याचा भुगा होत होता. एकूणच व्यवस्थेबद्दलचा वांझोटा संताप अनावर होत होता. मग विचार करू लागलो की मला हे वाचताना इतका संताप येऊ शकतो तर तत्कालीन आयुक्त परमबीर यांनी हा सर्व अत्याचार दीड वर्षं का बरे सहन केला? त्यांनी  पत्रात नमूद केले आहे की, एक-दोन वेळा मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावर या गोष्टी घातल्या. गोष्टी कानावर घालणे आणि लेखी पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना सजग करणे यात मोठा आहे, हे सनदी पोलीस अधिकाऱ्याला कळू नये याचे आश्चर्य वाटले. या पत्राच्या आधीच परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी लिखित स्वरूपात घालणे आवश्यक होते, असे वाटते.

जसा परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे, अगदी तसाच लेटर बॉम्ब गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त गृह सचिव यांना एक पत्र लिहून टाकला आहे. परमबीर यांच्या पत्रात अनिल देशमुख यांचे कारनामे आहेत तर डांगे यांच्या पत्रात परमबीर आणि त्यांचे मित्र तसेच त्यांच्या एका नातेवाईकांचे कारनामे विशद केलेले आहेत. परमबीर यांच्या पत्रात 100/50 कोटी रुपयांचा उल्लेख आहे तर डांगे यांच्या पत्रात 2 कोटी, नंतर 1 कोटी आणि शेवटी 50 लाख रुपयांचा उल्लेख आहे. म्हणजे दोन्ही पत्रात कोटीच्या कोटी उड्डाणे आहेतच.

डांगे यांनी आपल्या पत्रात बीच कँडी परिसरातील “डर्टी बर्नस सोबो” या अति उच्चभ्रू पबचा उल्लेख केला आहे. पब म्हणजे नाचणे, गाणे आणि पिणे आणि या त्रिगुण योगाने उन्मनी अवस्थेपर्यंत जाणे, असा माझा ‘भाबडा’ समज आहे. मात्र, या भाबड्या समजाचा अनुभव घ्यायचा असेल तर खिशात गुलाबी गांधींची मोठी गड्डी असावी लागते. नगद नसेल तर कुठल्याही बँकेचे गोल्डन कार्ड असायलाच हवे.

अशा या पबने 22 नोव्हेंबर 2017च्या रात्री व 23 नोव्हेंबर सुरुवातीच्या प्रहरात कालमर्यादेच्या बाहेर पब सुरू ठेवला होता. कोणा जितू नवलानी यांचा हा पब आहे. प्रथम या जितूने पब बंद करण्यास नकार दिला. जा, जो करनेका है, कर ले. मेरा बाल भी बाका नही होगा, या मस्तवाल उत्तरानंतर हमरीतुमरी झाली नसती तरच नवल! अगदी कॉलरला हात घालण्यापर्यंत वेळ आली. अखेर त्या जितूने पब बंद केला, पण धमकी देऊनच. ‘आज रात तुम तुम्हारा पॉवर दिखालो, कल सुबह देखो तुम्हारा क्या हाल होता है..’

जितूने मित्र असलेल्या परमबीर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. डांगे यांनी काही जणांना कोठडीत ठेवण्यासाठी पोलीसठाण्यात आणले होते. त्यात भरत शाह यांचा नातूही होता. त्याला सोडण्यावरून पोलीसठाण्यात हाणामारीही झाली. हा गुन्हा नोंदवू नका, असा दबाव परमबीर यांनी टाकला. आपण ते मानले नाही म्हणून आपली नियंत्रण कक्षात बदली करून विभागीय चौकशीचे आदेश काढायला लावले.

परमबीर

खरी मजा पुढेच आहे. परमबीर यांचा कोणी बायस नावाचा नातेवाईक डांगे यांच्या संपर्कात आला आणि मी या प्रकरणात परमबीर साहेब आणि तुमची मांडवली करतो. फक्त 2 कोटी रुपये ढिले करा. डांगे बधले नाहीत तेव्हा आकडा कमी करून प्रथम एक कोटी व नंतर 50 लाख रुपयांपर्यंत खाली आणला. नंतर डांगे यांनी माहिती काढली असता जितू हा पार पोहोचलेला इसम असून तो पैशाच्या हेराफेरीत तसेच हवाला रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळाली. याचा थेट संबंध छोटा शकील व इकबाल मिर्चीशी निघाला. अशा गुंड टोळ्यांशी परमबीर यांचा थेट संबंध असल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे.

हे विस्ताराने अशासाठी दिले की काल परमबीर यांनीही विस्ताराने देशमुख यांच्यावर आरोप केलेले होते. आता, पुन्हा परमबीर यांच्या पत्राकडे. परमबीर यांचे पत्र काल दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास लिक झाले. जवळजवळ सर्वांना ते पत्र पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचले. हे पत्र ज्या त्वरेने पत्रकारांना मिळाले, त्याअर्थी याकामी परमबीर यांना कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या जनसंपर्क खात्याने मदत केली असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.  याबद्दल काहीच बोलायचे नाही. यावर प्रतिक्रिया देण्यास महाविकास आघाडीने बराच विलंब केला. गृहमंत्री अनिल देशमुख रात्री साडेदहा वाजल्यानंतर जागे झाले. मुख्यमंत्री कार्यालय तर खरेखोटेपणा शोधण्याच्या मागे लागले.

परमबीर यांना देशमुख यांची कार्यपद्धती कळण्यास दीड वर्ष लागावे, हे न पटणारे आहे. खरे दुःख त्यांच्या बदलीचे आहे. ही बदली झाली नसती तर परमबीर यांना हे 100 कोटी आठवले तरी असते का? देशमुख यांची बाजू घेण्याचा प्रश्न मुळीच नाही. त्यांची बाजू मांडायला ते आणि राष्ट्रवादी पक्ष खंबीर आहेत. परंतु याप्रकरणी राळ उठवण्यात पुढाकार घेणारे तरी पुरेसे स्वच्छ आहेत का? त्यांचे मंत्री, त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात काय फक्त चिंचोके जमा करत होते काय?

मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रूतगती मार्गालगत होणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पात प्रत्येक चौरस फुटामागे शेकडो कोटी जमवणारेसुद्धा मैदानात आले पाहिजेत. आपला बंगल्याची अंतर्गत सजावट, बॉलिवूडच्या नायकाच्या पत्नीच्या महागड्या कंपनीस कोणी दिली हेही जनतेला कळले पाहिजे. जनतेला हिशेबच द्यायचे आहेत ना? मग ते सर्वांनीच द्या ना! “politics is an excellent career, unless you get caught” असे उगाच म्हणत नाहीत.

वात्रटिकाकार म्हणतात-

“रात्री एकत्र बसतात

दिवसा फक्त चिखलफेक आहे

ठग्स म्हणाले गॅंगला

आपला धंदा एक आहे

आजकालचे राजकारण

आश्वासनांचा डोह आहे 

सत्तासुंदरीच्या सहवासाचा

प्रत्येकाला मोह आहे”

1 COMMENT

  1. He has now moved the Supreme Court and asked for CBI inquiry and other types of relief. Let’s wait and see what happens! It’s turning into a big ‘Rada’!

Comments are closed.

Continue reading

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी पोलीस अजूनही शक्यतेवरच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येला आज १५ दिवस पूर्ण होत असतानाच पोलीस मात्र अद्यापी विविध शक्यतांचीच पडताळणी करत असल्याचे दिसत आहे. वांद्रे खेरवाडी येथे बाबांची हत्त्या झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पोलीस सर्वत्र 'सुपारी'चा अँगल सांगत आहेत...

बाबा सिद्दीकींची हत्त्या नेमकी झाली तरी कशासाठी?

गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्त्या करण्यात आली. दुर्दैवी हत्त्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले असले तरी पोलिसी सूत्रांनुसार जे चित्र जनतेपुढे आले आहे ते मात्र पूर्ण निराशाजनक आहे,...

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू 'आहेरा'सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार...
Skip to content