देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. (या वर्षी ११ मार्च २०२१ या दिवशी महाशिवरात्र आहे.) उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची ३ अंगे आहेत. ‘माघ कृष्ण पक्ष त्रयोदशीला एकभुक्त राहवे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशेआठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी, असे महाशिवरात्रीचे व्रत आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे? महाशिवरात्रीला शिवतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.
(टीप: ही सूत्रे ज्या ठिकाणी महाशिवरात्रीचे व्रत नेहमीप्रमाणे आचरण्यास निर्बंध अथवा मर्यादा आहेत, अशांसाठीच आहेत. ज्या ठिकाणी प्रशासनाचे सर्व नियम पाळून नेहमीप्रमाणे व्रत आणि देवदर्शन करता येणे शक्य आहे, त्या ठिकाणी नेहमीच्या प्रथेप्रमाणे ते करावे.)
१. शिवपूजेसाठीचे पर्याय
अ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ज्यांना महाशिवरात्रीला शिवमंदिरात जाणे शक्य नाही, त्यांनी आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.
आ. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.
इ. शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.
ई. यापैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.’
श्रावणी सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करू इच्छिणार्यांनाही ही सूत्रे लागू आहेत.
उ. मानसपूजा: ‘स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हा अध्यात्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. जसे साध्या बॉम्बपेक्षा अणूबॉम्ब आणि त्यापेक्षा परमाणूबॉम्ब हा अधिक शक्तीशाली असतो, त्याप्रमाणे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म गोष्टींमध्ये अधिक सामर्थ्य असते. या तत्त्वानुसार प्रत्यक्ष शिवपूजा करणे शक्य नसल्यास शिवाची मानसपूजाही करू शकतो. शिवाची मानसपूजा सनातनच्या www.sanatan.org या संकेतस्थळावर https://www.sanatan.org/mr/a/719.html या लिंकवरही उपलब्ध आहे.
२. ‘ॐ नम: शिवाय।’ हा नामजप अधिकाधिक करा!
कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी १ सहस्रपट कार्यरत असणार्या शिवतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय।’ हा नामजप अधिकाधिक करावा. यावेळी ‘आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत’, असा भाव ठेवावा.
३. शिवतत्त्व आकर्षित करणारी रांगोळी काढा!
शिवतत्त्व ग्रहण होण्यासाठी आपण त्या दिवशी दारासमोर शिवतत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी काढावी. सनातनच्या साधकांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरू डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि संशोधन करून कोणत्या प्रकारच्या रांगोळीतून शिवतत्त्व अधिकाधिक आकर्षित केले जाऊ शकते, हे शोधून काढले आहे.
शिवाच्या उपासनेच्या संदर्भात ‘शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन’ आणि ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’ हे ग्रंथ, तसेच ‘शिव’ हा लघुग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. हे ग्रंथ www.sanatanshop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
४. दृष्टीकोन
सध्या सर्वत्र कोरोनाच्या दुसर्या लाटेची भीती आहे. जगभरात अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रकोपाच्या घटना घडत आहेत. भारत आणि चीन संबंध तणावपूर्ण आहेत. या घटना म्हणजे आपत्काळाचीच चिन्हे आहेत. अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितल्याप्रमाणे आपत्काळाला आरंभ झाला आहे. आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेचेच बळ आवश्यक आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे व्रत करण्यास मर्यादा असल्या, तरी त्याने निराश न होता अधिकाधिक आणि झोकून देऊन साधना करण्याकडे लक्ष द्यावे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण भगवान शिवाला शरण जाऊन प्रार्थना करूया, ‘हे शिवशंभो, साधना करण्यासाठी आम्हाला शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा द्या. आमच्या साधनेत येणार्या अडचणी आणि बाधा यांचा लय होऊ दे, अशी आम्ही शरणागतभावाने प्रार्थना करतो.’