Homeकल्चर +कथ्थक नृत्याविष्कारातून कुसुमाग्रजांना...

कथ्थक नृत्याविष्कारातून कुसुमाग्रजांना अभिवादन!

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी रूपबंधाने नटलेला नृत्याविष्कार सादर करीत पुण्यातील नृत्यांगना नेहा मुथियान यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या ‘अहि-नकुल’ आणि ‘आगगाडी व जमीन’ या कविता नृत्यभाषेतून सादर करून अभिवादन केले आहे.

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितावाचन उपक्रमांतर्गत कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठी साहित्य रसिकांसाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ही अनोखी भेटही ठरली आहे.

नेहा मुथियान यांचे कथ्थक नृत्य खालील लिंकवर

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत परिचय केंद्राने त्यांच्या कविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले. १३ फेब्रुवारी २०२१पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत मलेशिया, ऑस्ट्रेलिया या देशांसह कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली या राज्यांतून आणि महाराष्ट्रातून गडचिरोली ते सिंधुदूर्ग अशा विविध भागांतून सहभागी ५० साहित्य रसिकांनी कविता वाचन केले. कार्यालयाच्या ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं समाज माध्यमांद्वारे यास प्रसिध्दी देण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील साडेतीन वर्षांची विनंती झाडे हिच्यासह लहान मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कला, साहित्य, नाट्य, शिक्षण आदी क्षेत्रातील ८५ वर्षांच्या साहित्य रसिक या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला.

नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या बहुप्रसिध्द ‘विशाखा’ काव्य संग्रहातील ‘अहि-नकुल’ आणि ‘आगगाडी व जमीन’ या कवितांवर आधारीत कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. कधी नागाने घातलेला विळखा तर कधी नकुलाने अर्थात मुंगुसाने त्याच्यावर केलेला प्रहार आणि आगगाडीच्या गर्वाला अचानक मातीने दाखविलेले सामर्थ्य या दृष्यातून जन्मलेली नृत्यभाषा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सोशल मीडियावर अवतरली आहे.

कथ्थकच्या माध्यमातून रंगला संग्राम

कुसुमाग्रजांनी ‘अहि नकुल’ या कवितेतून ब्रिटिश राजसत्ता आणि भारतीय जनता असा संघर्ष नाग आणि मुंगुसाचे प्रतिक वापरून मांडले आहे. कुसुमाग्रजांच्या भारदस्त शब्दांनी मनामनांमध्ये निर्माण केलेल्या या संग्रामाचे चित्र या कलाकारांनी नृत्याविष्काराच्या माध्यमातून दृष्य स्वरूपात समर्थपणे मांडले आहे. अन्यायाची सीमा गाठली जाते तेव्हा हतबलताही बलवान ठरते आणि मदांध सत्तेविरूध्द विद्रोह करते हा भाव कलाकारांनी उत्तम पदन्यासातून दर्शविला आहे.

ओतीव विखारी वातावरणी आग!

हा वळसे घालीत आला मंथर नाग.. या ओळींतून प्रतीत होणारी नागाची प्रक्षोभक वृत्ती नृत्याविष्कारातून उत्तमरित्या मांडली आहे. कुसुमाग्रजांनी या कवितेत वज्र, गर्भरेशमी पोत, मादक वस्त्र, अग्नीचा ओघळ, कनकाची कटयार, मल्हारतान अशा एकापेक्षा एक सकस कल्पना योजल्या आहेत व कथ्थक नृत्याच्या माध्यमातून कलाकारांनी या कल्पना हुबेहूब साकारल्या आहेत.

आगगाडी व जमीनच्या माध्यमातून अन्यायाविरुध्दचे बंड

जीवन लहरी छंदात बांधलेल्या ‘आगगाडी व जमीन’ या कवितेतून कुसुमाग्रजांच्या विशिष्ट शैलीचा प्रत्यय येतो आणि याच शब्दछटा नृत्याविष्कारात प्रतिबिंबीत झाल्या आहेत. ही कविता रूपकात्मक आहे. समाजात उच्चवर्गाकडून होणारे शोषण आणि या शोषणाविरूध्द निम्नवर्गीयांनी उभारलेले बंड ही या कवितेतील मध्यवर्ती कल्पना पदन्यास व रूपबंधातून नृत्याविष्कारात अवतरली आहे. या दोन्ही नृत्याची मूळ संरचना नेहा मुथियान यांच्या गुरू शांभवी दांडेकर यांची आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content