Friday, September 20, 2024
Homeमाय व्हॉईसशिवसेनेचा बुरखा फाटला!

शिवसेनेचा बुरखा फाटला!

केवळ दोन मतांच्या भिकेसाठी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणार्‍या आणि रामभक्तांवर अमानुष गोळीबार करणार्‍यांचे उंबरठे झिजवणाऱ्या; तळवे चाटण्यापर्यंतची पातळी गाठून आमचे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही; आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये…, असे वारंवार सांगणार्‍या किंबहुना अलीकडे सांगावे लागत असणार्‍या शिवसेनेचा बुरखा पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने फाटल्याचे बघायला मिळाले. ऐकेकाळी सत्तेसाठी मुस्लिम लिगशी हातमिळवणी करणार्‍या शिवसेनकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?

छत्रपतींच्या नावाने आपली राजकीय पोळी शेकणार्‍या शिवसेनेने पहिले त्याच छत्रपतींच्या वारसांना पुरावा मागितला होता. त्यानंतर पुन्हा दुसर्‍या वंशजाला राज्यसभेसाठी बिनशर्त पाठिंबा द्यायचे सोडून, अखेर त्यांचा अवमान केला. हा अवमान केवळ त्या वंशजाचा नसून छत्रपतींच्या गादीचा, राज परिवाराचाच म्हणावा लागेल. तेव्हाही यांचे बेगडी हिंदुत्व आणि छत्रपतींविषयीचा आदर महाराष्ट्रातील जनतेने बघितलाच. भाजपाकडे तिसरी जागा निवडून आणण्यासाठीची मते नसताना, भाजपाने जाणीवपूर्वक उमेदवार देऊन उगाच निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडले, असे हेच लोक सांगत होते. नेमके हेच तर कारण होते ना, संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारी लढण्याचे. संख्याबळ नाही आणि भाजपाच्या तिकिटावर उमेदवार लढाल, तर अन्य पक्ष मदत करणार नाहीत. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय संभाजी राजेंनी घेतला. भाजपाची भूमिका उघड होती. आमच्याकडे असलेली 22 मतं राजेंना देऊ किंवा त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवू. पण भाजपाने संभाजी राजेंची कोंडी केल्याचा डांगोरा पिटणार्‍या शिवसेनेने संभाजी राजेंसोबत आधी बोलणी केली आणि ते कोल्हापूरला पोहोचण्याआधीच कोल्हापूरचाच उमेदवार जाहीर करून खर्‍या अर्थाने पाठीत खंजीर खुपसला, हेदेखील अवघ्या महाराष्ट्राने बघितले.

औरंगाबादेत सभा घेऊन तेथील स्थानिक खासदार एमआयएमचा असताना, त्या पक्षाबद्दल, त्या खासदाराबद्दल आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणार्‍यांबद्दल अवाक्षरही काढण्याची हिंमत, धमक यांची झाली नाही. संभाजीनगरचे नाव बदलणार नाही, असे एकप्रकारे त्याच भूमीत जाहीर करून टाकण्याची भाषा करताना दिसलेला यांचा दयनीय चेहराच त्यांच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडत होता. बरं, हे सगळं टाळलं कशासाठी, तर केवळ दोन मतांच्या भिकेसाठी… एमआयएमकडे दोन मतं होती. शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराला निवडून येण्यासाठी मतांची गरज होती आणि एमआयएमने आपली भूमिका उघड केली नव्हती. एकएका मताचे महत्त्व असलेल्या निवडणुकीत एमआयएमची दोन मतंदेखील महत्त्वपूर्ण होती. मग या पृष्ठभूमीवर जर एमआयएमला दुखवावं, तर दोन मतं मिळणार नाहीत. त्यामुळेच शिवसेनेचा उमेदवार पाडून शिवसेनेच्या नाकावर टिच्चून निवडून आलेल्या एमआयएमच्या खासदाराचा उल्लेख करणे टाळले शिवसेना पक्षप्रमुखाने! यातूनच मतांसाठी शिवसेनेने किती लाचारी पत्करली, हे महाराष्ट्राला दिसले.

हा ‘ए’, ‘बी’, ‘सी’ टीम वगैरेचा ओझरता उल्लेख केला पक्षप्रमुखाने; पण यावेळी आता एमआयएमने महाविकास आघाडीला मतदान केले; तेही विशेषत्वाने काँग्रेसला! त्यामुळे आता एमआयएम कोणाची ‘ए’, ‘बी’, ‘सी’ टीम आहे हेदेखील अवघ्या महाराष्ट्राला कळले. त्यामुळे शिवसेनेने कितीही स्वप्नातले इमले बनवले तरी आता काही लपून राहण्यासारखी आणि लोकांना उल्लू बनविण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही, हे शिवसेना पक्षप्रमुखांनी समजून घेतले पाहिजे. नाहीतर असेच प्रत्येक सभेत आम्ही मर्द आहोत आणि आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, हे वारंवार सांगावं लागण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवेल.

शिवसेने

रस्ते आणि पाण्याचा प्रश्न सोडवू शकलो नाही आणि औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले तर संभाजी महाराज मला टकमक टोक दाखवतील, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आपल्या भाषणात म्हणाले होते. दुसरीकडे विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. ते नाव बदलण्याचा आग्रह करीत होते. मग रस्ते, पाणी विकास आणि शहराचे नाव सोडून विमानतळाचे नाव बदलणे हा शिवसेनेचा प्राधान्यक्रम आहे का, असा सवाल यावेळी उपस्थित लोक करत होते. एवढेच नव्हे, तर सार्‍याच बाबतीत केंद्राच्या नावाने बोटं मोडताना औरंगाबादला मेट्रो सुरू करण्याचे आश्वासन कोणाच्या जिवावर दिले? तद्दन खोटारडेपणा आणि दिशाभूल करण्याची यांची वृत्ती यात उघडी पडते.

तब्बल अडीच वर्षांपासून नामांतरणाचा विषय प्रलंबित ठेवला. याचा अर्थ अडीच वर्षांपासून औरंगाबादच्या समस्या प्रलंबितच आहेत. त्यांची सोडवणूक झाली नाही आणि ही एवढी साधी गोष्ट सांगण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले. कोट्यवधींचा खर्च केला. शेवटी काय झालं… सारा पैसा पाण्यात गेला ना! एक तर तोंड उघडताच टराटरा बुरखा फाटला आणि सभेमधून लोक उठून जाताना, ती का जात होती, हे सांगितल्यानंतर तर भाड्यानं कोणी आलं आहे का, हे मंचावरून जाहीरपणे विचारणार्‍या पक्षप्रमुखांना उत्तरपण मिळालं.

एका राज्यसभेच्या खासदाराला निवडून आणून काही केंद्रात सरकार बनणार नाही किंवा देशाचा आणि राज्याचा फार मोठा फायदादेखील होणार नाही. मग संख्याबळ नसताना, मुस्लिम मतांसाठी लाचारी पत्करून त्यांना चुचकारणे; एवढेच नव्हे, तर औरंगजेब नावाचा सैनिक सैन्यात होता आणि तो देशासाठी शहीद झाला, हे उदाहरण देऊन… केवळ नामसाधर्म्य साधून आता औरंगजेबाचीदेखील भलावण करण्याइतके सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेचे अध:पतन झालेले दिसते.

एकेकाळी बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशी ओळख असणारे मोरेश्वर सावे कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. तेव्हा असे पक्ष वगैरे काही विषय नव्हता. ते शिवसेना म्हणून किंवा पक्षादेश म्हणून गेले नव्हते. प्रखर हिंदुत्ववादी लोक; मग ते भाजपाचे असोत किंवा शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सनातन धर्म मानणारे असे सगळे हिंदुत्ववादी नागरिक औरंगाबादहून गेले होते. तिथे जाऊन आल्यानंतर ते प्रखर हिंदुत्व मांडत होते. पण हे शिवसेनेतील नेत्यांना आवडलं नाही. म्हणून त्यांनी त्यांचे खच्चीकरण केलं. त्यांना साधं लोकसभेचं तिकीटही दिलं नाही. शिवसेनेला जर एवढा अभिमान होता त्यांचा तर लोकसभेचं तिकीट का नाकारलं? लोकांनी त्यांना दिलेली ‘धर्मवीर’ पदवी का स्वीकारली नाही? का शिवसेनेच्या नेत्यांना ती पचनी पडली नाही? असे प्रश्न उपस्थित करून सावेंचे पुत्र अतुल सावेंनी पक्षप्रमुख आणि शिवसेनेला उघडे पाडले. पुन्हा एकदा खोटा इतिहास सांगणारे तोंडावर आपटले. पक्षप्रमुख तर सोडा; रोज टीव्हीसमोर येऊन तोंड वाजवणारेदेखील उत्तर देऊ शकले नाहीत. बाकी दोन मतांसाठी शेपूट घालणार्‍यांच्या तोंडून मर्दुमकीच्या गप्पा हास्यास्पदच म्हणाव्या लागतील.

Continue reading

निर्लज्जम् सदा सुखी!

अलिकडेच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात ‘लंगोटी पेपर’ असा उल्लेख केला होता. त्याच लंगोटी पेपरच्या एका उपकृत पदावर असलेला विश्‍वप्रवक्ता म्हणतो, महाराष्ट्रातील राजकारणातून नैतिकतेचे अधःपतन झाले आहे. पंजाबात फौजासिंग नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देतो आणि...

दिशा मृत्यू प्रकरणात अब होगा न्याय!

अभिनेता सुशांतिंसह राजपूत आणि त्याची माजी पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन यांचा संशयास्पद, गूढ मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप त्यावेळी होऊ लागला होता. जेव्हा त्या इमारतीचे सीसीटीव्ही चित्रिकरण गहाळ झाल्याचे समोर आले; सोबतच तिचं...

…. म्हणे महाराष्ट्र थंड का?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्... तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे पुरोगामी, सेक्युलर आणि महाराष्ट्राचे स्वयंघोषित ठेकेदार करताना दिसत आहेत. बरोबरही आहे त्यांचं. महाराज हे महाराष्ट्राचे...
error: Content is protected !!
Skip to content