क्रीडाविश्वात बऱ्याचदा विविध खेळांच्या नवनव्या स्पर्धांचे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असते. सुरुवातीला या स्पर्धांबाबत आयोजकांचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळे काही काळ या स्पर्धा सुरू राहतात. नंतर मात्र आयोजकांचा उत्साह कमी झाल्यानंतर अनेक स्पर्धा बंद पडल्याची बरीच उदाहरणं आहेत. परंतु त्याला गेली ३१ वर्षे नियमित होणारी गिरनार चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा मात्र अपवाद ठरली आहे. मुंबईतील रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, कर्मचारी यांना क्रिकेट खेळातील आपले प्राविण्य दाखविण्यासाठी आणि खेळाचा आनंद घेता यावा यासाठी एस. एच. जाफरी आणि मिलिंद सावंत या दोन शिलेदारांनी या स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी घेतली. १९९४ साली मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता स्पर्धेला मिळाली तेव्हा मुबई क्रिकेट संघटनेचे रशिद कुद्रोली, प्रविण बर्वे, प्रो. रत्नाकर शेट्टी यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यानंतर पहिल्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यावेळी एस. एच. जाफरी आणि मिलिंद सावंत यांनी पुढाकार घेऊन एका समितीची स्थापना केली. त्यामध्ये सीताराम वंद्रे, प्रदीप परब, प्रमोद पाताडे, अविनाश दुधाणे, मोहन पवार यांचा समावेश होता.

त्यानंतर सलग ३१ वर्षं या स्पर्धेच्या आयोजनात कधीच खंड पडला नाही. गिरनार चहाचे हरेंद्रभाई आणि विद्युतभाई यांना स्पर्धेचे पुरस्कर्ते व्हावे महणून प्रस्ताव देण्यात आला. अवघ्या एका दिवसात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आणि गिरनार चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला. गेली ३१ वर्षे गिरनार चहा भक्कमपणे या स्पर्धेच्या पाठीशी उभा असल्यामुळे आयोजकांनी इतर कोणाचीच पुरस्कर्ते म्हणून मदत घेतली नाही. ४५ षटकांच्या सामन्यांनी स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धेच्या सुरुवातीलाच टाटा, हिंदुजा, नानावटी, जे.जे., केईएम, नायर, सायन, मुंबई या आठ संघांनी भाग घेतला. नंतर हरकिसनदास, भाभा, कस्तुरबा, लीलावती, जसलोक, कोकीलाबेन, रहेजा, डी. वाय. पाटील, भाटिया, सेवन हिल्स, ग्लेनेलगेस या हॉस्पिटलचे संघदेखील स्पर्धेत सहभागी होऊ लागले.

१९९४ ते २०१५ यादरम्यान या स्पर्धेतील सामने ४५ षटकांचे होत असत. परंतु २०१६मध्ये षटकांची संख्या कमी करून ती प्रत्येकी २०-२० अशी करण्यात आली. २०२०मध्ये स्पर्धेत थोडा बदल करुन एलाईट आणि प्लेट अशा दोन गटात संघांची विभागणी करुन दोन्ही संघांना जेतेपदाची संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला. १९९४ साली झालेली पहिली स्पर्धा टाटा हॉस्पिटलने जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात नानावटी हॉस्पिटलचा पराभव केला होता. या स्पर्धेवर पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलने आपल्या जबरदस्त खेळाची छाप उमटवली. ३१ पैकी १८ स्पर्धा पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलने जिंकल्या. तसेच तब्बल २२ वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी हिंदुजा हॉस्पिटलनी गाठली होती. हिंदुजाव्यतिरिक्त टाटा, जे. जे., लीलावती, नानापटी, ब्रीच कँडी, कोकिलाबेन या हॉस्पिटलच्या संघांनीदेखील जेतेपदाचा मान मिळवला. स्पर्धेच्या सुरुवातीपासून आजतागायत गिरनार चहातर्फ सर्व सहभागी संघांना क्रिकेट कीट, टिशर्ट, टोप्या दिल्या जातात.

या स्पर्धेवर अविनाश जाधव, जितेंद्र परदेशी, नंदु पाटील, चंद्रकांत नाईक (दाजी), अवी दुधाने, मदीप क्षीरसागर, रुपेश कोंढाळकर (वामन), तुषार राणे यांनी फलंदाजीचा दमदार ठसा उमटवला. सर्वांनी शानदार शतके ठोकली आहेत. शशी वैद्य, प्रशांत हिरोजी, खिमजी मकवाना, दशरथ वलडोरा, डॉ. एस. एच. जाफरी, प्रफुल्ल तांबे, विशाल शिंदे, योगेश जांभळे, संदीप पवार, नितिन सोळंकी, विशाल चतुर्वेदी, जॉन मेननझीस यांनी सुरेख मारा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेतील एकमेव हॅटट्रिकची नोंद टाटा हॉस्पिटलच्या डॉ. एस. एच. जाफरी मांच्या नावावर आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे विविध हॉस्पिटलमध्ये ३००पेक्षा जास्त खेळाडूंना क्रिकेटपटू म्हणून नोकऱ्या मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार, मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी उपाध्यक्ष रवी सावंत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर, दिलिप वेंगसरकर, माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ, शैलीदार फलंदाज अमोल मुजुमदार, माजी कसोटीवीर लालचंद राजपूत, प्रवीण आमरे, विनोद कांबळी, अजित आगरकर, मुंबईवा माजी वेगवान गोलंदाज एबे कुरवीला, नामवंत क्रिकेट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त रमाकांत आचरेकर या दिग्गजांनी स्पर्धेच्या व्यासपीठावर उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले आहे.

यंदाच्या या स्पर्धेत एलाईट गटात कोकिलाबेनने टाटाचा पराभव करुन जेतेपद पटकावले, तर प्लेट गटात हा मान हिंदुजा हॉस्पिटलने ग्लेनेलगेस हॉस्पिटलचा पराभव करून मिळवला. एलाईट गटात डॉ. शैलेश श्रीखंडे (टाटा) उत्कृष्ट फलंदाज, दीपक सिंग, उत्कृष्ट गोलंदाज, संकेत केणी मालिकावीर (दोघे कोकिलाबेन) यांची निवड करण्यात आली. प्लेट गटात सर्वोत्तम फलंदाज म्हणून ग्लेनेलगेसचा यश जाधव, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून हिंदुजाचा प्रशांत हिरोजी आणि मालिकावीर म्हणूनदेखील हिंदुजाच्याच नंदु पाटीलची निवड करण्यात आली. यंदाचा बक्षिस समारंभ पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये संपन्न झाला. एम. सी. ए.चे उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, सरचिटणीस दीपक पाटील, खजिनदार अरमान मलिक, गिरनार चहाचे विद्युतभाई, मिलिंद पुरंदरे, बारोटभाई आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. रत्नाकर शेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जॉय चक्रवर्ती, डॉ. शैलेश श्रीखंडे, ए. डी. दुबे, डॉ. एस. एच. जाफरी, अनिक बायकर, मिलिंद सावंत, योगेश जांभळे, प्रमोद पाताडे, प्रतीप क्षीरसागर, चेतन सुर्वे, अवि दुधाने, किशोर कुयेस्कर, श्रीकांत दुधवडकर यांनी मेहनत घेतली. येणाऱ्या काळात राज्यस्तरीय अथवा अखिल भारतीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
