Friday, November 8, 2024
Homeटॉप स्टोरीलसीकरणासाठी पुढच्या महिन्यात...

लसीकरणासाठी पुढच्या महिन्यात 20 ते 22 कोटी मात्रा!

कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवठ्याबाबत कोणतीही समस्या आता येणार नाही. आपल्याकडे सुमारे 20 ते 22 कोटी लसींच्या मात्रा पुढच्या महिन्यात उपलब्ध होतील. लसीकरण मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात, अगदी दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली आरोग्ययंत्रणा सर्वदूर पसरली आहे. देशातील कोविड लसीकरण मोहीम सुधारित मार्गदर्शक धोरणांनुसार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, भारताने 81 लाखांपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्याचे काम पूर्ण केले आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिले आहे.

21 जूनची उद्दिष्टपूर्ती भारताची लसीकरण क्षमता दर्शवणारी

डीडी न्यूज वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, पहिल्याच दिवशी भारताने केलेल्या लसीकरणावरून भारताची लसीकरण करण्याची क्षमता सिध्द झाली आहे. एवढ्या व्यापक पातळीवर इतक्या मोठ्या संख्येने कित्येक दिवस आणि आठवडे आपण लसीकरण करू शकतो. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये योग्य नियोजन आणि समन्वय असल्यामुळेच हे लसीकरण मिशन मोडवर करणे शक्य झाले.

दररोज 1.25 कोटी लसींच्या मात्र देण्याची भारताची क्षमता

भारतातील लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लगार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरादेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आज आपण लसीकरणाचे जे लक्ष्य पूर्ण केले, ती एक मोठी उपलब्धी आहे. दररोज किमान एक कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे आपले उद्दिष्ट आहे आणि आपली एवढी क्षमता आहे की आपण सहज दररोज 1.25 कोटी लसींच्या मात्रा देऊ शकतो, असे ते म्हणाले.

खाजगी क्षेत्रांकडून चांगले सहकार्य मिळाल्यास हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल. आज नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पहिल्याच दिवशी आपण ज्या संख्येने लसीकरण केले गेले, त्यातच हे सिद्ध झाले, असेही अरोरा म्हणाले.

आज झालेली कामगिरी अभूतपूर्व नाही. याआधी आपण एका आठवड्यात 17 कोटी मुलांना पोलिओची लस दिली आहे. म्हणजेच, ज्यावेळी भारत काहीतरी साध्य करण्याचा निश्चय करतो, त्यावेळी, आपण ते साध्य करू शकतो. भारताची कोविड लसीकरण मोहीम म्हणजे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्र येऊन काम केल्यास, देशाला भेडसावणाऱ्या समस्या कशा सोडवता येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आहे, असे ते पुढे म्हणाले.

कोविशिल्ड लसींच्या मात्रांमधील सध्याचा कालावधी योग्यच

कोविशिल्ड लसींच्या दोन मात्रांमधील अंतराचा कालावधी बदलण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. पॉल यांनी सांगितले की हा कालावधी बदलण्याची काहीही गरज नाही. आम्ही राष्ट्रीय लस मागोवा व्यवस्थेकडून वेळोवेळी माहिती आणि आकडेवारी संकलित करत आहोत. तसेच, लसींची प्रभावक्षमता, दोन मात्रांमधील अंतर, प्रदेशांनुसार प्रभाव, विषाणूचे बदलते स्वरूप या सगळ्याचे सातत्याने अध्ययन आणि पाठपुरावा करत आहोत. त्यावरून कोविशिल्ड लसींच्या मात्रांमधील कालावधी बदलण्याची गरज वाटत नाही.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना लसीच्या प्रत्येक मात्रेचा संपूर्ण लाभ मिळावा असे प्रयत्न आहेत. सध्या दिल्या जात असलेल्या मात्रा, त्यादृष्टीने लाभदायक असल्याचे जाणवत आहे. मात्र, विज्ञानाचा कोणताही नियम काळ्या दगडावरची रेष नसते, असेही त्यांनी नमूद केले.

तिसरी लाट आपल्याच हातात

आपण सर्वांनीच कोविडविषयक नियम आणि वर्तणुकीचे पालन केले तसेच, अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाले तर तिसरी लाट टाळता येऊ शकेल. असे अनेक देश आहेत, जिथे दुसरी लाटही आली नाही. आपण नियमांचे पालन केले तर हा काळदेखील निघून जाईल, असे ते म्हणाले.

लस हाच सर्वोत्तम उपाय

डॉ. पॉल यांनी यावेळी जलद लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. भारताची अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करत सगळे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी जलद लसीकरण आवश्यक आहे. आपल्याला आपली दैनंदिन कामे पुन्हा सुरू करायची आहेत. सामाजिक जीवन पूर्ववत करणे, शाळा उघडणे, व्यवहार आणि आपल्या अर्थव्यवस्थेची गती वाढवयाची आहे. आपण जलद लसीकरण केले तरच या सर्व गोष्टी पूर्ववत करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

लस घेण्याचा हा सर्वोत्तम काळ

लस असुरक्षित आहे, असे समजणे सर्वात मोठी चूक आहे. जगातील सर्वच लसींना सध्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतातही पण तेच केले आहे. समाजातील विविध स्तरातल्या लोकांनी लस घेतली आहे. आता दुसरी लाट कमी होत आहे आणि कोविड लस घेण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे, असे त्यांनी सांगितले.

लसीविषयीची भीती आणि उदासीनता दूर व्हावी

लसीकरण मोहिमेबाबत सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content