Thursday, November 7, 2024
Homeटॉप स्टोरीदहावीच्या विद्यार्थ्यांना दोन...

दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन परीक्षांचीही संधी!

अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने तयार केलेला निकाल ज्या विद्यार्थ्यांना समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-१९ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध असेल, असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.

यंदा म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये इ. १०वीच्या परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येईल. ही प्रवेशपरीक्षा राज्य मंडळाच्या इ. १०वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

कोविड-१९मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे सदर धोरण तयार करताना विभागातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ विविध बैठकांद्वारे चर्चा केली आहे. सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इ. १०वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-१९चा प्रादुर्भाव मार्च २०२१पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इ. १०वी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इ. १०वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने इ. ९वी व इ. १०वीसाठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली आहे, असे प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

इ. १०वी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष

• विद्यार्थ्यांचे इ. १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण.

• विद्यार्थ्यांचे इ. १०वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण.

• विद्यार्थ्यांचा इ. ९वीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण ( इ. ९वी संपादणूक यासाठी ५०% भारांश व इ. १०वी संपादणूक यासाठी ५०% भारांश.)

हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोविड-१९पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इ. १०वीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (इ. ९वीचा) निकाल कोविडपूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे, असे त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले.

जूनअखेर लागेल निकाल

मंडळामार्फत जून २०२१अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे.

पुनर्परीक्षा आणि श्रेणीसुधार

पुनर्परीक्षार्थी (Repeater Student), खाजगी (Form no. १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठीदेखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने (Class Improvement) अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील, असे त्या म्हणाल्या.

अकरावी परीक्षेसाठी प्रवेशपरीक्षा

विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इ. १०वी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इ. ११वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इ. ११वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेणार आहोत. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १०वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

इ. ११वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १०वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content