Homeब्लॅक अँड व्हाईटपंतप्रधान मोदींकडून तेलंगणाला...

पंतप्रधान मोदींकडून तेलंगणाला 13 हजार कोटींची भेट! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

पंतप्रधानांनी या प्रदेशातील जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक रस्ते जोडणी प्रकल्पांची पायाभरणी करताना आनंद व्यक्त केला. नागपूर-विजयवाडा आर्थिक मार्गिकेमुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील वाहतूक आणि व्यवसाय सुलभ होईल यसेच या राज्यांमधील व्यापार, पर्यटन आणि उद्योगांना चालना मिळेल. या मार्गिकेवर 8 विशेष आर्थिक क्षेत्र, 5 मेगा फूड पार्क, 4 फिशिंग सीफूड क्लस्टर, 3 फार्मा आणि मेडिकल क्लस्टर आणि 1 टेक्सटाइल क्लस्टर यासह प्रमुख आर्थिक केंद्रांचा समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे हनमकोंडा, महबूबाबाद, वारंगल आणि खम्मम जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी खुल्या होतील. तेलंगणासारख्या भूभागांतर्गत असलेल्या राज्यातला उत्पादित माल बंदरांपर्यंत नेण्यासाठी रेल्वे आणि रस्ते जोडणीची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

देशातील अनेक महत्त्वाचे आर्थिक कॉरिडॉर तेलंगणामधून जातात असे त्यांनी सांगितले. या सर्व माध्यमांमुळे हे राज्य पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीशी जोडण्यास मदत होईल. हैदराबाद विशाखापट्टणम कॉरिडॉरचा सूर्यापेट-खम्मम विभागही यासाठी सहाय्यभूत ठरेल तसेच पूर्व किनारपट्टीपर्यंत पोहोचण्यास यामुळे मदत होईल असे ते म्हणाले. याशिवाय उद्योग आणि व्यवसायांचे वाहतुकीचे खर्चही कमी होतील. जकलेर ते कृष्णा क्षेत्रादरम्यान बांधण्यात येत असलेला रेल्वे मार्गही इथल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी सांगितले.

तेलंगणातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. पुरवठा साखळीतील मूल्यवर्धनावर राष्ट्रीय हळद मंडळ लक्ष केंद्रित करेल आणि शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा सुधारायला मदत करेल त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेबद्दल तेलंगणा आणि संपूर्ण देशातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील अलीकडच्या घडामोडींबद्दल सांगताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की सरकारने केवळ उद्योगांसाठीच नाही तर घरांसाठीही ऊर्जा सुरक्षित केली आहे. एलपीजी सिलेंडरची संख्या 2014 मधल्या 14 कोटींवरून 2023 मध्ये 32 कोटींपर्यंत वाढल्याचे उदाहरण त्यांनी दिले तसेच गॅसच्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीचाही त्यांनी उल्लेख केला. देशातील एलपीजी वितरण नेटवर्क विस्तारायला सरकार चालना देत आहे, असं सांगत हसन-चेर्लापल्ली एलपीजी पाइपलाइन प्रकल्प हा प्रदेशातील लोकांना ऊर्जा सुरक्षा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे पंतप्रधानांनी नमूद केले. 

कृष्णापट्टणम ते हैदराबाद दरम्यान बहुउत्पादक पेट्रोलियम पाइपलाइनची पायाभरणी करण्याचाही उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की यामुळे तेलंगणामध्ये हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण व्हायला मदत होईल. त्याआधी पंतप्रधानांनी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ परिसरातील विविध इमारतींचे उद्घाटन केले. केंद्र सरकारने हैदराबाद विद्यापीठाला नामवंत संस्थेचा दर्जा(स्टेटस ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनेन्स) दिला आहे आणि विशेष निधीचा पुरवठा देखील केला आहे.

मुळुगु जिल्ह्यात केंद्र सरकार केंद्रीय आदिवासी विद्यापीठ उभारणार आहे. आदिवासी समाजाला पूज्यनीय असणाऱ्या सम्माक्का आणि सारक्का या देवींचे नाव या विद्यापीठाला देण्यात येईल. या सम्माक्का-सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठा करता 900 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. हे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ मिळत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातल्या नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सौंदर राजन, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि लोकसभेचे खासदार बंडी संजय कुमार हे सुद्धा या कार्यक्रमाला इतर मान्यवरांसह उपस्थित होते.

पार्श्वभूमी:-

देशभरात आधुनिक रस्ते पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला चालना देण्यासाठी एक पाऊल म्हणून, या कार्यक्रमात विविध रस्तेप्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आणि पूर्ण झालेले रस्ते प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. नागपूर-विजयवाडा आर्थिक पट्ट्याचा एक भाग असलेल्या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

राष्ट्रीय महामार्ग-163G चा भाग असलेले, वारंगळ ते खम्मम या 108 किलोमीटर लांबीचा, प्रवेश नियंत्रित असलेला ‘चार-मार्गिकांचा ग्रीनफील्ड महामार्ग’ आणि खम्मम ते विजयवाडा या 90 किलोमीटर लांबीचा, प्रवेश नियंत्रित असलेला ‘चार-मार्गिकांचा ग्रीनफील्ड महामार्ग’, या प्रकल्पांमध्ये समाविष्ट आहेत. हे रस्ते प्रकल्प एकूण 6400 कोटी रुपये खर्चून विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे वारंगळ आणि खम्मममधील प्रवासाचे अंतर सुमारे 14 किलोमीटरने, तर खम्मम आणि विजयवाडा दरम्यानचे अंतर सुमारे 27 किलोमीटरने कमी होईल.

राष्ट्रीय महामार्ग-365BB च्या सूर्यपेठ ते खम्मम या 59 किलोमीटर लांब टप्प्यातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचा रस्ते प्रकल्पही, पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला.  सुमारे 2,460 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प, हैदराबाद-विशाखापट्टणम आर्थिक पट्ट्याचा  एक भाग आहे आणि भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित करण्यात आला आहे.  हा प्रकल्प, खम्मम जिल्हा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशांना देखील चांगली दळणवळण सुविधा प्रदान करेल. या प्रकल्पादरम्यान, पंतप्रधानांनी जकलेर – कृष्णा नवीन रेल्वे मार्गाचा 37 किमी भाग राष्ट्राला समर्पित केला. 500 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेल्या या नवीन रेल्वे मार्गामुळे नारायणपेठ या मागास जिल्ह्याचा भाग प्रथमच रेल्वेच्या नकाशावर आला आहे. यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत कृष्णा स्थानकावरून हैदराबाद (काचीगुडा)- रायचूर- हैदराबाद (काचीगुडा) रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे सेवा तेलंगणातील हैदराबाद, रंगारेड्डी, महबूबनगर आणि नारायणपेट जिल्ह्यांना कर्नाटकातील रायचूर जिल्ह्याशी जोडेल. ही सेवा महबूबनगर आणि नारायणपेट या मागास जिल्ह्यांतील अनेक भागात प्रथमच नव्याने रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करेल. या रेल्वे सेवेमुळे विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी, मजूर आणि या भागातील स्थानिक हातमाग उद्योगाला फायदा होईल.

देशातील लॉजिस्टिक कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, या कार्यक्रमादरम्यान महत्त्वपूर्ण तेल आणि वायू पाइपलाइन प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधानांनी ‘हासन-चेर्लापल्ली एलपीजी पाइपलाइन प्रकल्प’ राष्ट्राला समर्पित केला. सुमारे 2170 कोटी रुपये खर्चून बांधलेली, एलपीजी पाइपलाइन, कर्नाटकातील हसन ते चेर्लापल्ली (हैदराबादचे उपनगर), या प्रदेशात एलपीजी वाहतूक आणि वितरणासाठी सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय प्रदान करते. पंतप्रधानांनी कृष्णपट्टणम ते हैदराबाद (मलकापूर) दरम्यान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) च्या मल्टीप्रॉडक्ट पेट्रोलियम पाइपलाइनची पायाभरणीही केली. 425 किलोमीटर लांबीची ही पाइपलाइन 1940 कोटी रुपये खर्चून बांधली जाणार आहे. ही पाइपलाइन या भागात पेट्रोलियम उत्पादनांचा सुरक्षित, जलद, कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय प्रदान करेल. पंतप्रधानांनी हैदराबाद विद्यापीठाच्या पाच नवीन इमारतींचे उद्घाटन केले. यामध्ये अर्थशास्त्र महाविद्यालय, गणित आणि सांख्यिकी महाविद्यालय, व्यवस्थापन अभ्यास महाविद्यालय, व्याख्यान कक्ष संकुल–III, आणि सरोजिनी नायडू कला आणि संप्रेषण महाविद्यालय (अ‍ॅनेक्सी) यांचा समावेश आहे. हैदराबाद विद्यापीठातील पायाभूत सुविधांचे अद्यतनीकरण विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सुधारित सोयी आणि सुविधा प्रदान करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content