Sunday, April 13, 2025
Homeएनसर्कलभारतीय सैन्य दलांतील...

भारतीय सैन्य दलांतील 12 महिला निघाल्या 55 दिवसांच्या सागरी परिक्रमेला

भारताच्या तीनही सैन्य दलांतील (भूदल, नौदल आणि वायूदल) महिलांच्या ‘समुद्र प्रदक्षिणा’ या मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मूळ ठिकाणी परत अशा सागरी परिक्रमा मोहिमेला कालपासून मुंबईतून सुरूवात झाली. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगचे कमांडंट लेफ्ट. जनरल ए. के. रमेश यांनी मुंबईत कुलाब्यातल्या भारतीय नौदल जलक्रीडा प्रशिक्षण केंद्रातून या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या मोहिमेत 12 सदस्यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत आयएएसव्ही त्रिवेणी, हे जहाज मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मुंबईला परत असा 4,000 सागरी मैलांचा 55 दिवसांचा आव्हानात्मक प्रवास करणार आहे.

ही एक पथदर्शी मोहिम असून या मोहिमेतून नारीशक्तीची क्षमता अधोरेखित करण्यात येणार आहे. त्यासोबतच सागरी उपक्रमांमध्ये लिंगभाव समानतेला चालना देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. 2026साठीही अशाच प्रकारच्या महत्त्वाकांक्षी सागरी परिक्रमा मोहिमांचे नियोजन करण्यात आले असून त्या दिशेनेच पूर्वतयारीचा एक टप्पा म्हणून ही मोहीम आखण्यात आली आहे.

या मोहिमेसाठी तीनही सैन्यदलांतील 41 महिला प्रतिनिधींमधून 12 अधिकार्‍यांची निवड केली गेली. या सर्वांनी सागरी जलपर्यटनाचे दोन वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. या सर्व अधिकारी, समुद्रातील धोकादायक जलप्रवास करून त्यांच्यातील लवचिकपणा, धैर्य आणि निर्धाराचे दर्शन घडवतील. या चमूने हवामानाशी संबंधित आव्हाने, जहाजातील यांत्रिक समस्या आणि शारीरिक आव्हानांसारख्या अनेक प्रशिक्षण मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

मुंबई-सेशेल्स-मुंबई, या मोहिमेच्या माध्यमातून सशस्त्र दलातील महिलांच्या सक्षमीकरणाची प्रचिती येईल आणि त्यासोबतच अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार्‍या राणी वेलू नचियार, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या भारताच्या महान वीरांगनाना आदरांजलीही अर्पण करणारी ही मोहीम असेल. 30 मे 2025 रोजी या मोहिमेची सांगता होईल. त्यानिमित्ताने एका सांगता समारंभाचेही नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी...

तव्वहूर राणाचा बोलविता धनी कोण? १२ वाजता होणार चौकशी सुरू!

मुंबईत झालेल्या २६ / ११चा मास्टरमाईंड तव्वहूर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात असून साधारण १२ वाजल्यापासून त्याच्या चौकशीला सुरूवात होईल. या चौकशीत राणाचा पाकिस्तानमधला बोलविता धनी कोण, त्याला पैसा पुरवणारा कोण तसेच त्याचे भारतातले जाळे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार...
Skip to content