Details
किरण हेगडे
kiranhegde17@gmail.com
“सरकारी रूग्णालयांमध्ये औषधोपचारांची कशी बोंब आहे हे आपण पाहिले. मुंबईत कोरोनाचे हजारो रूग्ण आहेत ज्यांना रूग्णालयात जागा नाही. केईएम, नायर, राजावाडी अशा बड्या सरकारी व पालिका रूग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना चक्क घरी पाठवले जात आहे. आज महाराष्ट्राची रूग्णसंख्या ५० हजारांच्या पुढे आहे. त्यात मुंबईची संख्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के आहे. ही आहे रूग्णालयात दाखल झालेल्या आथवा ज्यांची तपासणी झाली आहे अशा रूग्णांची. जे तपासणी अभावी रूग्णालयाच्या उंबऱ्यापर्यंत खेटे मारून गेले अशा रूग्णांची मोजदाद यामध्ये नाही. ती संख्या धरली तर मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी व्हायला वेळ लागणार नाही. कोरोनाची लक्षणे असली तरी कोणत्या ना कोणत्या डॉक्टरच्या शिफारशीशिवाय रूग्णाची चाचणी केली जात नाही. खाजगी लॅबमधून चाचणी करून घ्यायची असेल तर त्यासाठीही चार ते पाच हजार रूपये भरावे लागतात. त्यामुळे एका कुटुंबातले दोन किंवा तीन जण खाजगी लॅबमध्ये तपासणीला गेले तर त्यांना साधारण १०-१५ हजार मोजावे लागतील. खाजगी रूग्णालयांमध्ये जागा नाही आणि मिळाली तर उपचाराचा खर्च प्रत्येकी किमान लाख ते दीड लाख रूपये आहे. तेही सरकारी चौकटीत. त्याच्याबाहेरची रक्कम विचार करता येणार नाही. आता अलीकडे ज्यांनी आरोग्य विमा कवच घेतले आहे त्यांना कोरोनावरील उपचाराचा खर्च मिळू शकेल. परंतु आधी विमा कवच घेतलेल्यांना कोरोनावरील उपचारांचा खर्च मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीयांचे हाल कुत्रा खात नाही, अशी परिस्थिती आहे.”
“मध्यंतरी मुंबईतल्या काळबादेवी परिसरातील एक छायाचित्र व्हायरल झाले होते. एका व्यक्तीची मृतदेह पदपथावर जवळजवळ १४ तास पडून होता. मेट्रो सिनेमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या परिसरात पोलिसांचे एक पथकही तैनात होते. एका माणसाने हा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने मुंबई महापालिकेच्या तसेच शासनाच्या सर्व संबंधित विभागांना कळवले. परंतु कोण फिरकले नाही. पोलिसांना कळवून झाले. पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर त्याने आपल्या आवाजातील कॉमेंट्री देत त्याचे व्हिडिओ चित्रण केले आणि ते व्हायरल केले. रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीचा हा मृतदेह होता. तो जिथे पडला होता त्याच्या बाजूलाच माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राज पुरोहित यांचे व त्यांचे चिरंजीव नगरसेवक आकाश राज पुरोहित यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. परंतु मृतदेह उचलण्यास कोण तयार नाही. पोलीस म्हणतात रूग्णवाहिका किंवा शववाहिकाच उपलब्ध नाही. आम्ही तरी तो कसा हलवणार? ती व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली आहे का हे सांगणारे कोणी नाही. त्यामुळे मृताला हात लावायला कोणी तयार नाही. रस्त्यावरील भटके कुत्रे अधूनमधून तेथे जायचे. आपण अनेकदा त्यांना हाकलले. पण किती वेळा हाकलणार, असा सवाल यावर कॉमेंट्री करणारी व्यक्ती करत होती.”
“रूग्णवाहिका मागवून त्यातून एखाद्याने जावे असे म्हटले तर रूग्णाला रूग्णवाहिका मिळत नाही. रूग्णवाहिकेसाठी फोन केला तर त्याला विचारले जाते की, तुमचा बेड कोणत्या रूग्णालयात कन्फर्म आहे ते सांगा. बेड कन्फर्म नसेल तर आम्ही येत नाही. कारण रूग्णालयात जागा शोधत फिरायला रूग्णवाहिका तयार नाही. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी यावर भरपूर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या मते कोरोना माहामारीच्या या भयंकर संकटात मुंबईतील रूग्णांना रूग्णवाहिकेसाठी ५ ते १५ तास मोजावे लागत आहेत. २० मार्चपर्यंत मुंबई आरटीओकडे रजिस्टर असलेल्या २९२० खाजगी एमब्युलन्सेस सेवा देत होत्या. पण, गेल्या दोन महिन्यांपासून त्या अचानक गायब झाल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सीअंतर्गत ठाकरे सरकार खाजगी एम्ब्युलन्सच्या मालकांवर का कारवाई करत नाही असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत ५ एप्रिल २०२०ला आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. मात्र अद्यापही पेशंटला यासाठी झगडावे लागत आहे. दीड महिन्यानंतरही राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली नाही. १०८ क्रमाकांच्या सेवेवर निव्वळ ९३ रूग्णवाहिका सध्या कार्यरत आहेत.”
“धारावीसारखी झोपडपट्टी म्हणा किंवा दाट वस्तीतल्या लोकांचा विषय घ्या. तेथे एका लहानशा खोलीत ८-१० जण राहतात. त्यांना विलगीकृत राहणे निव्वळ अशक्य आहे. अशा ठिकाणच्या रूग्णांना संस्थाच्या आवारात विलगीकरण कक्षात राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात तेथे काय परिस्थिती आहे याचीही पाहणी सोमैया यांनी केली आहे. त्यांनी कोरोना रूग्णांना ठेवण्यासाठी तयार केलेल्या मुंबईतील बारापेक्षा अधिक क्वारंटाईन सेंटर्सना भेट दिली असता तेथे स्वच्छतागृहांची दुरवस्था, पाण्याची अपुरी सोय, निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पुरवठा होत असल्याचे आढळले.”
“क्वारंन्टाईन सेंटर ‘जेल’ वाटत असल्याची तक्रार रूग्णांनी केली, असे ते म्हणाले. या सर्व बाबी आपण संबंधितांच्या निदर्शनाला आणूनही काही सुधारणा झाली नाही. तेथे जेवणासाठी प्रति व्यक्ती १७२ रूपये महापालिका ठेकेदाराला देत असूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न कोरोना रूग्णांना मिळते. कोरोनावर औषध नसल्याने असे रूग्ण बरे होणे हे पूर्णपणे त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी रूग्णांना पोषक आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. तरीही जेवणाबाबत हेळसांड केली जाते हे धोकादायक आहे.”
“मुंबईत पवईत हिरानंदानी येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटरच्या मागे असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतींमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. २२ मजली असलेल्या या इमारतींमध्ये १६५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. या सेंटरमध्ये एस वार्डमधील विक्रोळी, भांडुप, कांजूर मार्ग, पवई या भागातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. याआधी क्वारंनटाईन सेंटरमध्ये खराब जेवण येत असल्याने सेंटरला जेवण पुरवणारा कंत्राटदार बदलण्यात आला होता. मात्र नवा कंत्राटदार असलेला महिला बचत गट पहिल्याच दिवशी जेवण देण्यात अपयशी ठरला. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांचे मात्र हाल झाले. अशाप्रकारे मुंबईतल्या जवळपास सर्वच क्वारंटाईन सेंटरची अवस्था अत्यंत वाईट असून, यामुळे रूग्णांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. याला जबाबदार कोण असा सवाल सोमैया यांनी केला आहे.”
“पाटील नावाची व्यक्ती वरळीच्या बी.डी.डी. चाळीत राहते. गेले ५ दिवस ती n.s.c.i डोममध्ये एडमिट आहे. इथे टॉयलेट स्वछ नाही. इथे माक्स, सेनेटायझर लिक्वीड, साबण, टूथपेस्ट हे सर्व पॅकेजमध्ये असूनसुद्धा मिळत नाही. औषधाचा म्हणजे हायड्रोक्लोरिक गोळी व कफ सिरफचा नेहमी तुटवडा असतो. येथे ३०० ते ३५० पेशन्ट असतात. A.B.C.D. हे चार वॉर्ड आहेत. त्यांना लोखंडी बांबू व पडदा याचे पार्टीशन आहे. त्यात विजेचा करंट येतो. येथे पॉजिटिव्ह पेशंटला जर लक्षणे दिसत नसतील आणि रिपोर्ट पॉजिटिव्ह असला तरी त्याला घरी जायचे असेल तर पाठवतात. येथे ३०० पेशन्टमध्ये एका शिफ्टला ४ नर्स व ३ शिफ्ट आहेत. रूग्णांना तपासायला ४ डॉक्टर व ३ शिफ्ट असतात. त्यामुळे त्यांचावर खूप ताण पडतो. एका टॉयलेटमध्ये ४ संडास. त्यातले २ बंद. २ मध्ये पाण्याचा नळ लिकेज असल्यामुळे पाणी तुंबलेले. अशी अवस्था या पाटील यांनी सांगितल्याचे सोमैया यांचे म्हणणे आहे.”
“वेगवेगळ्या क्वारन्टाईन सेंटरमध्ये कंत्राटदाराला वेगवेगळे जेवणाचे दर दिले जातात. पूर्व उपनगरात दिवसाचे १७२ रू., धारावी-दादरमध्ये ३७२ रू., ठाण्यात ४१५ रू. असा दर दिला जातो. सत्ताधाऱ्यांमध्ये कंत्राट मिळवण्याची स्पर्धा चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला.”
“मुंबईतल्या ऑर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशाप्रकारची बाधा इतर कैद्यांना होऊ नये, याकरिता शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. मात्र, ऑर्थर रोड कारागृहातील स्थिती फार वेगळी आहे असे हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर यांचा दावा आहे. ‘कैद्यांना लागण झाली’, ‘तुरूंग कर्मचारी कर्तव्य सोडून पळून गेले’ आणि ‘तुरूंगामध्ये आरोग्यविषयक कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत’, अशा अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ११ मे यादिवशी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार तुरूंग कर्मचारी आणि कैदी मिळून १८० जणांची तपासणी केली असता, त्यातील तब्बल १५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले; परंतु त्यापुढे तपासण्याच झालेल्या नाहीत, असा त्याचा अर्थ निघतो. हे अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर साधारण १८ मार्चपासून कैद्यांना त्यांचे नातेवाईक आणि अधिवक्ता यांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना दूरभाषवरूनदेखील संपर्क बंद करण्यात आले आहेत. आता तर तुरूंग प्रशासनही बाहेरून आलेले दूरभाष घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कैद्यांना त्यांच्या नातेवाईंकाबाबत आणि नातेवाईकांना कैद्यांबाबत चिंता असणे स्वाभाविक आहे. तुरूंग प्रशासन तुरूंगातील गंभीर परिस्थिती लपवून ठेवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. असे चालू राहिल्यास कैद्यांचे मृतदेहच बाहेर आणावे लागतील. हे त्यांच्या मानवाधिकारांचे हनन असून जर त्यांचे मृत्यू झाले, तर ते मृत्यू नसून खूनच असतील, असे इचलकरंजीकर म्हणतात.”
“त्यांच्या फेसबुकवरील पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या लक्ष्मी राऊत (अटकेत असलेले गोरक्षक वैभव राऊत यांच्या पत्नी) म्हणाल्या की, त्यांची शेवटची भेट होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ गेला आहे. राऊत यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?”
“गीतांजली गोंधळेकर (अटकेत असलेले सुधन्वा गोंधळेकर, सातारा यांच्या पत्नी) यांनी आपली व्यथा मांडतांना सांगितले की, माझे पती निर्दोष आहेत. अटक होऊन दोन वर्षे झाली तरी, अद्याप खटलाही चालू झालेला नाही. यांसह अटकेत असलेले गणेश मिस्किन यांचे भाऊ रवी मिस्किन यांनीही त्यांची व्यथा व्यक्त केली. या सर्व नातेवाईकांनी हेही सांगितले की, प्रशासन आणि गृहमंत्री यांना पत्रे लिहूनही त्यावर काहीही झालेले नाही.”