Friday, October 18, 2024
HomeArchiveनागपूरच्या पीचवर पवारांची...

नागपूरच्या पीचवर पवारांची फटकेबाजी..

Details

 
 
 
 
शैलेंद्र परांजपे
shailendra.paranjpe@gmail.com
 
 
“महाराष्ट्रात सत्तापालट करून दिल्लीला गेल्यानंतर अगदी भाजपच्या खासदारांनीही कुणी बघत नाही ना, याची खातरजमा करत आपले अभिनंदनच केले, असे शरद पवार यांनी बुधवारी सांगितले आणि चक्क असे अभिनंदन करणाऱ्यांची अॅक्शनही करून दाखवली, तेव्हा पत्रकारांमधे हास्यकल्लोळ उडाला.”
 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नागपूरमधे मंगळवारी आगमन झालं आणि बुधवारी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. महाराष्ट्रातला विजय आणि सत्तास्थापना यामुळे पवार भलतेच मूडमध्ये होते आणि त्यांनी त्यांच्या खास तिरकस शैलीत दाद मिळवणाऱ्या काही कॉमेन्ट्सही केल्या. अनेकदा तेही हास्यकल्लोळात सहभागी झाले. 
 
 
“राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर सत्तास्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काही बदल जाणवतो का, असे विचारताच पवार यांनी षटकारच ठोकला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दिल्लीतल्या हिंसाचारावरचे जालियनवाला बागेशी तुलना करणारे विधान ऐकल्यावर गाडी रूळावर आली आहे, याची खात्री पटलीय. ”
 
 
“अशीच एक टिप्पणी पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही केली. राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांना पर्याय तयार होतोय का आणि पर्याय म्हणून दाखवले जाणारेच वीर सावरकर यांच्यावर विधान करून अडचणी निर्माण करताहेत, यासंदर्भात विचारलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, मुळात पर्याय निर्माण व्हावा लागतो आणि असलाच तर तो देशात असावा लागतो. ”
 
 
“सावरकर यांच्या विक्षाननिष्ठेचे विचार मला आवडतात असे सांगून पवार म्हणाले, सावरकर यांच्यावर अलिकडेच पुस्तके आली आहेत आणि त्यात येऊ लागलेले तपशील लक्षात घेता, कदाचित सावरकर यांनाच हा विषय फार वाढवू नये असे वाटेल, अशी टिप्पणीही पवार यांनी केली. सावरकर यांच्या संदर्भात सावरकर स्मारकाच्या कार्यक्रमालाच नव्हे तर अगदी संसदेमध्येही आपण गौरव करणारे भाषण केले आहे, असेही पवार यांनी सांगितले. ”
 
 
“मुंबई आणि नागपूरच्या पत्रकारांना नागपूरमध्ये तुम्ही १९९१नंतर पहिल्यांदाच भेटत आहात आणि १९९१मध्ये छगन भुजबळ यांचा विषय गाजला होता, याची आठवण एका पत्रकाराने पवार यांना करून दिली. त्यावेळी पवार उत्तरले, तेव्हा भुजबळ सेनेतून आले होते, आता उद्धव ठाकरेच आलेत.”
 
 
 
“उद्धव ठाकरेंचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर!
 
 
वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही थराला गेलो, पण भारतीय जनता पक्षाची पालखी यापुढे वाहणार नाही हा शब्दही वडिलांना दिला होता, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३६ मिनिटांच्या भाषणात भाजपाच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. 
 
 
राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिशंकू सरकार, अशी टीका करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भारूडाचा उल्लेख केला होता. या त्रिशंकू सरकारचे तीन पाय तीन दिशांना हे सांगताना भारूडातील यमक दिसेचि ना, शिजेचि ना, होईची ना, भाजेचि ना.. याचा वापर केला होता. नेमकी तीच लय पकडत ठाकरे यांनी अच्छे दिन आता येईची ना, १५ लाख रूपये खात्यात जमा होईची ना, २ कोटी लोकांना रोजगार मिळेचि ना, नोटाबंदीनंतरचे ५० दिवस संपेचि ना, आर्थिक मंदी हटेचि ना, असे प्रत्युत्तर दिले आणि सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांना दाद दिली.
 
 
नागरिकता कायदा आणि त्यावरून देशभर उसळलेल्या आगडोंबाचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, शेजारी देशातल्या हिंदूंना सामावून घेण्याची भाषा बोलणाऱ्या केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत कायम कर्नाटकची बाजू घेतली आहे आणि त्यावेळी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राच्या सीमा भागातल्या हिंदूंचा आक्रोश मात्र त्यांना दिसलेला नाही. एकीकडे सावरकरांच्या प्रेमाची भाषा करतात, पण गायीबद्दलची सावरकरांची भूमिका मान्य आहे काय, हेही स्पष्ट करायला हवे. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात माता म्हणता आणि शेजारी राज्यात जाऊन खाता?
 
 
मोदींचा फोटो लावून शिवसेनेला मतं मिळाली असं म्हणणाऱ्या अमित शाहांनी सेनाप्रमुखांचा फोटो लावून भाजपाला मतं मिळाली नाहीत, हेही सांगावे, असा प्रतिटोलाही ठाकरे यांनी हाणला. संत तुकडोजी महाराजांच्या शब्दात आपले भाषण संपवताना ठाकरे यांनी लाखो जीवांना उद्धारितो, हा शब्द आपण पाळू आणि राज्याचं कल्याण करू असा शब्द दिला.
 
 
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे..
 
 
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या.. या संत तुकडोजी महाराजांच्या ओळी उद्धृत करत ठाकरे यांनी आपलं सरकार हे बुलेट ट्रेनवाल्यांचं नाही तर गरीबांचं आहे आणि त्यामुळे रिक्षातून जाणाऱ्यांचं सरकार आहे, असंही आवर्जून सांगितलं. टाईमपास सिनेमातल्या नया है वह, या शब्दप्रयोगाचा स्वतःसाठी वापर करत आपण मुरब्बी असल्याचंही ठाकरे यांनी दाखवून दिलं.
 
 
ग. दि. माडगूळकरांच्या गीताचा दाखला देत, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धवा अजब तुझे सरकार अशी टीका केली होती. त्याची आठवण करू देत ठाकरे म्हणाले, मी सुधीरभाऊंना सांगू इच्छितो की, सुधीर तुम्ही नका होऊ अधीर, तुम्ही झालाय बेकार म्हणून तुम्हाला वाटते अजब सरकार.. असे प्रत्युत्तर देताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
 
 
ज्येष्ठ अभिनेते दिवंगत डॉ. श्रीराम लागू यांच्या सामना चित्रपटातल्या कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.. या गाण्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, गेली २५ वर्षे आम्ही भाजपाचे ओझे खांद्यावर वाहिलेय आणि आता यापुढे हे ओझे वाहणार नाही. ते खांद्यावरून उतरवून टाकले आहे.
 “

Continue reading

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...
Skip to content