Wednesday, March 12, 2025
HomeArchiveकेंद्राची नाराजीः राज्यपालांनी...

केंद्राची नाराजीः राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावले!

Details

 
किरण हेगडे
 
महाराष्ट्रात कोरोनाची लागण रोखण्यात येत असलेल्या मर्यादित यशाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून सोमवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही उपाययोजनांबाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवले तर राजभवनाबाहेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राला एक पत्र पाठवत २५ हजार कोटी रूपयांच्या विशेष पॅकेजची मागणी केली.
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही महाराष्ट्रात ज्या पद्धतीने याची अंमलबजावणी झाली ती पाहता केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. या आठवड्याभरातच राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. काल ही संख्या २२० पर्यंत पोहोचली. महाराष्ट्रात अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सातत्याने उडणारी झुंबड, स्थलांतरीत होत असलेल्या मजुरांच्या आश्रयाचा कायम राहिलेला प्रश्न आणि अशा विविध कारणांमुळे सोशल डिस्टेसिंग पाळण्यात येत असलेले अपयश व पर्यायाने कोरोनाची लागण वाढण्याची निर्माण झालेली शक्यता लक्षात घेऊन सोमवारी संध्याकाळी राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे व इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावून एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास, अतिरिक्त मुख्य सचिव (कामगार) राजेश कुमार व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते.”
 
“राज्यातील आरोग्य सेवक, पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षिततेची देखील पुरेशी खबरदारी घ्यावी असे राज्यपालांनी सांगितले. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, स्थलांतरित लोकांच्या भोजन व निवासाची योग्य व्यवस्था करण्यात येत आहे. अतिरिक्त वैयक्तिक सुरक्षा किट केंद्राकडून उपलब्ध झाल्यावर आवश्यक त्या लोकांना देण्यात येतील. राज्यात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी केलेली व्यवस्था, रूग्ण तपासणीची क्षमता, विलगीकरणाची सुविधा, व्यक्तिगत सुरक्षेसाठी आवश्यक किट्सची उपलब्धता याबाबत राज्यपालांनी यावेळी माहिती करून घेतली.”
 
कोरोनाशी लढण्यासाठी २५ हजार कोटींची मागणी

 
 
“दरम्यान, राजभवनावरच्या बैठकीला हजर नसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारीच एक पत्र केंद्र सरकारला पाठवून कोरोनाशी लढण्यासाठी २५ हजार कोटी रूपयांच्या विशेष पॅकेजची मागणी केली. राज्यावर आलेले ‘कोरोना’चे संकट. लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था. राज्य उत्पन्नात सातत्याने होत आलेली घट. या पार्श्वभूमीवर आगामी काळात ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकाने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज तातडीने द्यावे अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली.”
 

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content