Details
काँग्रेसचे प्रियंकास्त्र भाजपाच्या वर्मी!
01-Jul-2019
”
संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई
[email protected]
काँग्रेसने प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवून भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा सत्ता मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावला आहे. शिवाय राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणेही विस्कटून टाकली आहेत. मायावती आणि अखिलेश अर्थात बुवा-बबुआ यांच्यापुढे नवे आव्हान उभे केले आहे. प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार हे निश्चित आहे. प्रियंका गांधींची लोकप्रियता पाहता वाराणसीमधूनही त्यांना दुसरी उमेदवारी देऊन काँग्रेस शेवटचा फासा टाकू शकते. नरेंद्र मोदींना मतदारसंघात जखडून ठेवण्याची त्यामागील काँग्रेसची व्यूहरचना असेल..
भारतीय राजकारणात इंदिरा गांधी यांचा कालखंड एक सोनेरी पर्व मानला जातो. अर्थात त्याला आणीबाणीची काळी किनार होती, हा भाग अलहिदा. परंतु त्यांनी आपल्या कणखर नेतृत्त्वाने भारताला जगात मानाचे स्थान मिळवून दिले. भारताच्या कुरापती काढण्यात कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानची दोन शकले करून आशिया खंडात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. आपल्या कृतीतून भारतीयांचा स्वाभिमान जागवणाऱ्या इंदिरा गांधी यांचे गारुड त्यांच्या पश्चात आज ३५ वर्षांनंतरही कायम आहे. इंदिरा गांधी यांना तीन वेळा देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे त्यांची पंतप्रधानपदाची प्रत्येक कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पोलादी इरादे ठेवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पश्चात आजतागायत त्यांची पोकळी भरून काढणारे एकही नेतृत्त्व भारताला गवसले नाही. शत्रुराष्ट्रांना धडकी भरवणाऱ्या आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांना भीक न घालणाऱ्या या निधड्या नेतृत्त्वाची भारतातील जनतेवर आजही भुरळ आहे. मागील तीन दशकांत गांधी घराण्यात असे नेतृत्त्व उपजले नाही.
राजीव गांधी आणि त्यांच्या पश्चात राहुल गांधी राजकारणात सक्रिय असले तरी देशातील जनतेला त्यांच्यात तो ‘स्पार्क’ जाणवला नाही. याऊलट इंदिरा गांधी यांची हुबेहूब छबी असणाऱ्या प्रियंका गांधी यांच्यात ते नेतृत्त्व शोधण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. कौटुंबिक राजकीय वारसा असतानाही त्यांनी नेहमीच सक्रिय राजकारणापासून दूर राहणेच पसंत केले. काँग्रेसजनांनी अनेकदा दबाव टाकूनही त्या बधल्या नाहीत. त्यामागील निश्चित कारण कधीच पुढे आले नाही. अगदी काँग्रेस संकटात असतानाही त्यांनी राजकारणापासून चार हात लांब राहणेच पसंत केले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीला काही आठवडेच उरले असताना अचानक प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय राजकारण ढवळून निघाले आहे. प्रति इंदिरा गांधी म्हणून त्यांच्याकडे लोकांच्या पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे त्यांना राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा निर्णय सर्वच राजकीय पक्षांची विशेषत: सत्ताधारी भाजपाची झोप उडवणारा ठरला आहे. प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपा नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्याचाच प्रत्यय देतात. काँग्रेसकडे असलेला नेतृत्त्वाचा अभाव ही भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू होती. प्रियंका गांधींच्या एण्ट्रीने त्याला छेद मिळाला आहे.
राहुल गांधी मागील दोन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु ते म्हणावा तसा आपला प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. त्यांचा राजकीय आलेख पाहता भारतीय जनतेने त्यांना मर्यादित स्वरूपात स्वीकारले आहे. भारतात आयडिऑलॉजीच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी येथील राजकारण हे व्यक्तीनिष्ठ आहे, हे मान्यच करावे लागेल. मागील सात दशकांच्या इतिहासावर नजर टाकल्यास भारतातील राजकीय पक्षांची वाटचाल त्यांच्या विचारधारेवर नव्हे प्रभावी नेतृत्त्वावर सुरू आहे, हेच लक्षात येईल. नेतृत्त्वहीन झालेले अनेक राजकीय पक्ष आपले अस्तित्त्व गमावून बसल्याचे दिसून येईल. कम्युनिस्टांचे भारतात आता अस्तित्व कुठे उरले आहे? एकेकाळी देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळालेली जनता पार्टी इतिहासजमा झाली आहे. जनता दलाचाही अस्तित्त्वासाठी संघर्ष सुरू आहे. प्रभावी नेतृत्त्व नसणे हेच या राजकीय पक्षांच्या अधोगतीचे कारण ठरले आहे. दक्षिणेत एन. टी. रामाराव, एम. जी. रामचंद्रन, जयललिता, करुणानिधी, के. करुणाकरण यांसारखे नेते आपल्या नेतृत्त्वगुणक्षमतेवर दीर्घकाळ सत्तेत टिकून होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय पक्षांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय जनमानसावर नेतृत्त्वाचा असलेल्या पगड्याचा साकल्याने विचार करून भाजपाने मागील १० वर्षांत नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व पद्धतशीरपणे उदयास आणले. काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्त्वाच्या पोकळीचा पुरेपूर लाभ उठवत नरेंद्र मोदींना देशभर प्रोजेक्ट करीत भाजपाने २०१४ साली केंद्रात पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली.
सन २०१९ च्या निवडणुकीतही काँग्रेसची मदार राहुल गांधी यांच्यावरच असल्याचे मानून नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाताना भाजपा निश्चिंत होती. परंतु प्रियंका गांधी यांची अचानक एण्ट्री झाल्याने राजकारणाचा क्लायमॅक्स बदलला आहे. राजकीयदृष्ट्या त्या किती परिपक्व आहेत किंवा त्यांची निर्णयक्षमता कितपत आहे, याचा कोणालाच अंदाज नाही. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असल्याचे दाखले दिले जात आहेत. त्यापेक्षाही जनता त्यांच्याकडे इंदिरा गांधींचे प्रतिबिंब म्हणून पाहते, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्या जोरावरच काँग्रेसने भाजपाला नामोहरम करण्यासाठी प्रियंकास्त्र बाहेर काढल्याचे दिसून येत आहे.
साडेचार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळवल्यानंतर संपूर्ण देशावर आपल्या नेतृत्त्वाचा करिश्मा केला होता. काही धाडसी निर्णय घेत जनमानसामध्ये आपला प्रभाव दाखवून दिला होता. नरेंद्र मोदी नावाचे वादळ आणखी दहा वर्षे तरी देशावर घोंगावत राहील, अशी भाजपाकडून परिस्थिती निर्माण केली गेली. त्यामुळे काँग्रेसला कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता. परंतु गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतील निकालाने त्यांच्या आशा जागवल्या. त्यानंतर भाजपाचा गड असलेल्या हिंदीभाषिक तीन राज्यांतील निवडणुकांतील मिळालेल्या विजयाने काँग्रेसला नवा आत्मविश्वास दिला आहे. नरेंद्र मोदी नावाचा वारू रोखणे आता अवघड नसल्याचे त्यांनी जाणले. लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे राजकीय सारीपाटावर नवनवे फासे टाकण्यास काँग्रेसने सुरूवात केली. राफेल, नोटबंदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी यांसारख्या प्रकरणांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे. सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनेच भाजपाला पराभवाकडे खेचून नेताना दिसत असल्याचे काँग्रेसच्या लक्षात येताच त्यांनी ही आश्वासनेच निवडणूक मुद्दे करण्यास सुरूवात केली आहे.
कोंडीत पकडलेल्या भाजपावर त्यांनी चोहोबाजूंनी आघात करण्यास सुरूवात केली आहे. प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याची खेळी त्याचाच भाग आहे. इंदिरा गांधींची लोकप्रियता प्रियंका गांधी यांच्या रूपात एनकॅश करण्याचा त्यामागील उद्देश आहे. देशाच्या सत्तास्थापनेत उत्तर प्रदेशचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ५४३ पैकी एकट्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. उत्तर प्रदेश ज्याच्याकडे त्याच्याकडेच देशाची सत्ता, असे आतापर्यंत समीकरण आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशचीच जबाबदारी देण्यात आली आहे. येथे भाजपाबरोबरच सपा आणि बसपाचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. प्रियंका गांधी यांच्या रूपात उत्तर भारतातील जनतेला आकृष्ट करण्याचा काँग्रेसचा त्यामागे हेतू आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी रायबरेलीतून लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत, हे स्पष्ट आहे. त्याऐवजी प्रियंका गांधी तेथून निवडणुकीला उभ्या राहतील, हे उघड आहे. प्रियंका गांधी यांची लोकप्रियता पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जखडून ठेवण्यासाठी त्यांच्याविरोधात वाराणसी या आणखी एका मतदारसंघातून उभे करण्याची काँग्रेसची रणनीती असू शकते. तसे झाल्यास उत्तर प्रदेशचे नव्हे तर देशाचे राजकारण ढवळून निघेल आणि लोकसभा निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळेल. इंदिरा गांधींसारखा भासणारा चेहरा मतांमध्ये किती परावर्तित होतो यावरच काँग्रेसचे यश अवलंबून असेल.”
“संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई