मराठा आरक्षणावर बोलणारे हे नेते किती संवेदनशील आहेत हे सर्वांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. उच्च न्यायालयातही ते टिकले. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? तेव्हा मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे प्रमुख कोण होते? त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाही. मराठा आरक्षणाचे तुम्ही मारेकरी आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता समाचार घेतला.
मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे तुम्ही… आता मराठा आरक्षणावर भाष्य करताय? सरकारने दिलेले आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे द्यायला तुम्ही अपयशी ठरलात. मुद्दाम तुम्ही या आरक्षणाकडे लक्ष दिले नाही. त्यांनी आता मराठा समाजाला भडकवण्याचे काम करू नये, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणावर 58 मोर्चे निघाले. हे सर्व मोर्चे अत्यंत शिस्तीत आणि शांततेत काढले गेले. मराठा समाजच मुळात शांतताप्रिय समाज आहे. परंतु आता या आंदोलनाच्या माध्यमातून काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. मराठा समाजाने त्यांच्या शांतताप्रिय परंपरेला गालबोट लागेल असे काही करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.